आकाशनिंब: (बुचाचे झाड गु. लटक चमेली क. बिरटू इं. ट्री जॅस्मिन, इंडियन कॉर्क ट्री लॅ. मिलिंग्टोनिया हॉटसिस, कुल- बिग्नोनिएसी). एक खूप उंच (अदमासे १२—१५ मी.), आकाशनिंबजलद व सरळ रेषेत वाढणारा पानझडी वृक्ष. हा मूळचा ब्रह्मदेशातील व मलायातील असून भारतात सर्वत्र उद्यानात व रस्त्याच्या दुतर्फा शोभेकरिता लावलेला आढळतो. साल जाड व त्वक्षायुक्त असून कमी प्रतीच्या बुचाकरिता वापरतात. पाने गर्द हिरवी, मोठी, संयुक्त व दोनदा विभागलेली असून दलांची संख्या विषम असते. दलांचे सुटे भाग म्हणजेच दलके अंडाकृती भाल्यासारखी ऑक्टोबर-डिसेंबरात लांबट, पांढरी, सुवासिक फुले फांद्यांच्या टोकांस परिमंजऱ्यांवर विपुल येतात. संवर्त घंटेसारखा व लहान पुष्पमुकुट खाली नळीसारखा व टोकास पाच पसरट पाकळ्यांचा असून जून झाल्यावर पिवळट होऊन लोंबत राहतो. केसरदले ४-५, दीर्घद्वयी (दोन लांब व दोन आखूड केसरदले) व पुष्पमुकुटाबाहेर डोकावणारी किंजपुटात अनेक बीजके, किंजल लांब व किंजल्क द्विभिन्न (निम्मा विभागलेला) असतो [→ फूल]. फळे (बोंडे) पसरट व फुटीर बिया अनेक, पंखयुक्त व सपाट पश्चिम भारतात बिया क्वचितच उपलब्ध असल्याने नवीन वृक्षांची उत्पत्ती व लागवड मुळांच्या फुटव्यापासून (अधश्चरापासून) करतात. लाकूड ठिसूळ असल्याने सोसाट्याच्या वाऱ्याने झाडे मोडून पडण्याचा संभव फार असतो. लाकडापासून ब्रशांच्या फळ्या, चहाच्या पेट्या, ड्रॉइंग बोर्ड इ. वस्तू करतात. इंडोनेशियात याची साल तापावर देतात.

पहा : बिग्नोनिएसी.

देशपांडे, सु. रा.