पाम हेंप (ट्रॅकिकार्पस एक्सेल्सा)

हेंप, पाम : [इं. फॉर्च्यून् पाम, चायनीज विंडमिल पाम, चायनीज कॉइर पाम; लॅ. ट्रॅकिकार्पस एक्सेल्सा, ट्रॅ. फॉर्च्युनेई; कुल-पामी ( ॲरेकेसी)]. एकदलिकित फुलझाडांपैकी हा मध्यम आकाराचा ताल वृक्ष मूळचा मध्य व पूर्व चीनमधील असून ईशान्य भारत, ब्रह्मदेश व जपान या ठिकाणी आढळतो. त्याचा आढळ सस.पासून १००–२,४०० मी. उंचीपर्यंत आहे. याच्या प्रजातीत ४–८ जाती असून त्यांचा प्रसार हिमालयात व पूर्व आशियात आहे. 

पाम, हेंप वनस्पतीचे खोड बिनकाटेरी, भक्कम, जाड, सरळ व १०–१२ मी. उंच असून त्यावर जुन्या पर्णावरकांचे आच्छा-दन असते. याला साधी, गोलसर, अंशतः विभागलेली, हस्ताकृती, पंख्यासारखी, सु. २ मी. व्यासाची चूणित (चुण्या पडलेली) पाने असतात; त्यांना अनेक खड्गाकृती खंड असतात. पानाची वरील बाजू हिरवी व खालील बाजू करडसर हिरवी असते. फुलोरे (स्थूलकणिशे) पानांमधून येेतात त्यावर सुगंधी, लहान, एकलिंगी (नर व मादी फुले स्वतंत्र वृक्षावर) फुले लहान उंचवट्यावर २–४ च्या गुच्छांनी एप्रिलमध्ये येतात; फुलांची संरचना व इतर शारीरिक लक्षणेपामी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. नर फुले पिवळी व मादी फुले हिरवट रंगांची असतात. मादी वृक्षावर लांबट किंवा मूत्रपिंडाकृती निळसर-काळी अश्मगर्भी फळे येतात. खोडाच्या सालीपासून धागा काढतात व त्यापासून दोर, घासण्याचे ब्रश व पायपुसणी तयार करतात. पानांचा हॅटमध्ये व पावसाळी कोटात वापर करतात.  

ट्रॅ. मार्टियाना ही उंच व भव्य जाती हिमालयात सस.पासून सु. १,८६० मी. उंचीपर्यंत आढळते तिचे खोड बहुतांशी गुळगुळीत व बारीक असून त्यावर वलयाकृती व्रण आढळतात. अशा अनेक वृक्षांचे संघ बनलेले दिसतात

 

परांडेकर, शं. आ.