माठ : पाने, खोड व कणिशेमाठ : (हिं. बडी चौलाई क. हरिवे सं. मारिष, मार्ष इं. जोसेफ्स कोट लॅ. ॲ‌मरँथस ट्रायकलर कुल-ॲ‌मरँटेसी). ही वर्षायू (एका हंगामात जीवनक्रम पूर्ण करणारी) ⇨ ओषधी भारतात आढळते व पालेभाजीकरिता लागवडीत आहे. उष्ण कटिबंधात आशिया, आफ्रिका व अमेरिकेत ही आढळते. हिचे हिरवा व तांबडा माठ असे दोन प्रकार आहेत. ⇨ राजगिरा, ⇨ तांदुळजा व ⇨ पोकळा यांच्या ॲमरँथस या प्रजातीतील असल्याने हिचे अनेक लक्षणांत त्यांच्याशी‌ साम्य आहे. हिची सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ ॲ‌मरँटेसी कुलात (आघाडा कुलात) वर्णिल्याप्रमाणे आहेत. तांबडा माठ पुष्कळसा पोकळ्यासारखाच दिसतो. त्याची उंची १५० ते १८० सेंमी. असूनही खोड मऊ असते. हिरवा माठ ९० ते १२० सेंमी वाढतो. निबरपणा तांबड्या माठापेक्षा जरा लवकर येतो. पांढुरकी छटा दिसते म्हणून त्यास पांढरा माठ असेही म्हणतात. परिदले व केसरदले [⟶ फूल] प्रत्येकी तीन आणि फळे करंड्यासारखी असतात बी फार लहान, काळे, चकचकीत व मसुरासारखे असते. ही वनस्पती स्तंभक (आकुंचन करणारी), वेदनाहारक असून घशातील आणि तोंडातील व्रणावर गुणकारी असते.

श्रावण महिन्यात दर शनिवारी हिंदू लोक पंच-भेळी-भाजी नावाची भाजी करतात. त्यातील पाच भाज्यांत माठाचा समावेश असतो. ही भाजी देवांना आवडते अशी समजूत आहे. इतर चार भाज्या उपलब्ध नसल्या, तरीही फक्त माठाची भाजी करतात, एवढे त्या भाजीचे महत्त्व आहे.

काटे माठ : (इं. प्रिक्ली ॲ‌मरँथ लॅ. ॲ‌. स्पिनोसस). ही माठाची दुसरी जाती कोठेही रुक्ष व ओसाड जागी उगवते. हिचा रंग हिरवा ते लाल किंवा जांभळा असतो. हिला कक्षास्थ (पानांच्या बगलेत) काटे व अनेक पसरट फांद्या असतात. परिदले व केसरदले प्रत्येकी पाच असतात फळे द्विबीजी इतर लक्षणे सामान्यपणे माठाप्रमाणे असतात. हिची लागवड नाही तथापि गरीब लोक पानांची भाजी करतात. माठाची मुळे मासिक अतिस्त्राव, परमा, पोटशूळ, इसब इत्यादींवर उपयुक्त असून जनावरांना दूध कमी असल्यास डाळीबरोबर शिजवून ती खाऊ घालतात.

चौगले, द. सी.

लागवड, मशागत इ. : माठाला मध्यम काळी व निचऱ्याची जमीन लागते. ती दोनदा नांगरून हेक्टरी सु. वीस टन शेणखत घालून, कुळवून तिच्यात ३·६ X १·८ मी. चे वाफे करतात. बी फार बारीक असल्यामुळे ते वाफ्यात सर्वत्र एकसारखे पसरविण्यासाठी त्याच्यामध्ये बारीक, कोरडी माती समभाग मिसळून ते मुठीने वाफ्यात हेक्टरी ४·५ किग्रॅ. प्रमाणात फोकतात. दाताळ्याने वाफ्याच्या मातीत मिसळून घेतात. पहिले पाणी फार काळजीपूर्वक देतात. दुसरे पाणी ३–४ दिवसांनी आणि पुढे ६–७ दिवसांनी देतात. बी टाकल्यापासून ४–५ आठवड्यांत रोपे भाजीसाठी काढतात. हेक्टरी ५०,००० ते ६०,००० किग्रॅ. पालेभाजी मिळते. तांबड्या माठास ७ ते ८ महिन्यांनंतर, तर हिरव्या माठास ५ ते ६ महिन्यांतच बी येते. पेरणीपासून भाजी ६ आठवड्यांत तयार होते. वनस्पतीची वाढ बारमाही असल्याने दर तीन आठवड्यांनी खुडणी करून ५ ते १० वेळा खुडण्या घेता येतात. वर्षभर भरपूर उत्पन्न देणारी ही भाजी आहे. ही जास्त पावसाच्या प्रदेशात पावसाळ्यानंतर पेरतात.

वरचेवर पेरणी करावी लागू नये व एकदा पेरल्यावर बऱ्याच खुडण्या व्हाव्यात म्हणून माठाचा को–३ हा परसबागेसाठी योग्य असा प्रकार मिळविण्यात आला आहे. त्याचे पीक वर्षभर घेता येते व ते ९० दिवसांपर्यंत टिकते. तो ९०–११० सेंमी. उंच वाढतो व त्याला १२–१५ फांद्या येतात. त्याची पेरणी दोन ओळींत २० सेंमी. अंतर ठेवून करतात व १५–२० दिवसांनी २० सेंमी अंतरावर एक झाड ठेवून विरळणी करतात. पहिली खुडणी २० दिवसांनी करतात व पुढे दर आठवड्याला एक याप्रमाणे किमान १० खुडण्या होतात. ९० दिवसांत बी तयार होते व एका झाडापासून १५–२० ग्रॅ.बी मिळते. या प्रकाराचे हेक्टरी ३०,००० किग्रॅ. पालेभाजीचे उत्पन्न येते.

को–३ जातीच्या पाल्यात १७–३५% भरड तंतू, १२% प्रथिने, ३·२% पोटॅशियम, २·४८% कॅल्शियम, ९·८४% लोह व ०·४७% फॉस्फरस तसेच १०० ग्रॅ. पाल्यात ३५·९९ मिग्रॅ. क जीवनसत्त्व व ११·०४ मिग्रॅ. कॅरोटीन ही असतात.

पाटील, ह. चिं जमदाडे, ज. वि.