सिलांग : पानाफुलांसह फांदी

सिलांग : (लॅ. ऑस्मँथस फ्रॅग्रॅन्स कुल-ओलिएसी). एक मध्यम आकाराचा सदापर्णी वृक्ष. मूळचा चीन व जपानमधील असून हिमालयात सस.पासून १,०००–२,९०० मी. उंचीपर्यंत व आसामातील टेकड्यांत आढळतो. खोडावरची साल गर्द भुरी ते काळसर पाने गर्द हिरवी व चिवट फुले पांढरी किंवा पिवळसर (५-६ मिमी. व्यास), सुगंधी व दाट झुबक्यांनी थंडीच्या मोसमात येतात. अश्मगर्भी फळे लंबगोल, गर्द जांभळी व खाद्य असतात. [ ⟶ ओलिएसी].

सुवासिक फुलांकरिता कलमांची सावलीत लागवड करतात. चीनमध्ये चहाला स्वाद आणण्याकरिता, औषधात व तिळाच्या तेलात सौंदर्यप्रसाधनार्थ ही फुले वापरतात, तसेच ती मिठाईत व बेकरीतील खाद्यपदार्थांतही घालतात. कुमाऊँमध्ये कपड्यांचे कसरीपासून संरक्षण करण्याकरिता फुले घालून ठेवतात. लाकूड पांढरे ते फिकट पिवळे किंवा भुरे, कठीण व जड असून खेळणी, हत्यारांच्या मुठी, दांडे, फण्या व कातीव कामास उपयुक्त असते.

जमदाडे, ज. वि.