निस्यंदन : (गटेशन). इजा वा जखम न झालेल्या वनस्पतीच्या भागांपासून व सामान्यपणे पानांमधील मुख्य शिरांच्या टोकांपासून थेंबांच्या रूपात होणारा द्रायूचा (विशेषतः पाण्याचा) स्राव. काही उच्च दर्जाच्या वनस्पतींच्या बाबतीत जखम झाल्यास तिच्यातून पाण्यासारखा द्रव वाहतो, त्याला ⇨ रसस्राव म्हणतात. निस्यंदन व रसस्राव यांचा निकटचा संबंध आहे. या दोन्हींचा समावेश निर्यास या एकाच प्रक्रियेत केला जातो. काही कवकांच्या (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींच्या) तंतूंपासून किंवा बीजुककोशाच्या (प्रजोत्पादक भागाच्या कोशाच्या) आवरणातून पाण्याचे थेंब याच प्रकारे येतात (उदा., पायलोबोलस ).

निस्यंदन : (अ) स्ट्रॉबेरीच्या पानांतून ठिबकणारे पाण्याचे थेंब (आ) जलप्रपिंड : (१) रक्षक कोशिका, (२) हरितद्रव्यहीन कोशिका, (३) वाहिन्या.सर्व स्थलवासी (जमिनीवर वाढणाऱ्या) वनस्पतींच्या शरीरांतील पाण्याचा बराचसा भाग वाफेच्या रूपाने (बाष्पीभवनाने) नैसर्गिक रीत्याच बाहेर पडून नाहीसा होत असतो तथापि बाहेरील हवामानाच्या संदर्भात होणाऱ्या या प्रक्रियेचे वनस्पती आपल्या गरजेनुरूप कमीअधिक नियंत्रण करीत असतात. वनस्पतींच्या अनेक जीवनावश्यक कार्यांमध्ये या प्रक्रियेचा अंर्तभाव असून तिला बाष्पोच्छ्‌वास अशी विशिष्ट संज्ञा आहे [⟶ वनस्पति व पाणी]. काही वनस्पतींत बाहेरच्या विशिष्ट परिस्थितीत ही प्रक्रिया पूर्णपणे थांबते, अशा वेळी थेंबांच्या रूपात प्रत्यक्ष पाणीच बाहेर टाकले जाते व त्याला निस्यंदन म्हणतात. दमट व उबदार अशी रात्र संपल्यावर (या काळात भरपूर पाणी घेतले जाते पण ते बाहेर टाकण्याची यंत्रणा कार्यक्षम नसते) सकाळी काही वनस्पतींच्या पानांच्या टोकांतून (उदा., काही गवते) व काहींच्या (उदा., सदाफुली, गार्डन नॅस्टर्शियम, स्ट्रॉबेरी इ.) पानांच्या किनारीतून पाण्याचे लहान थेंब ठिबकताना दिसतात. ते दवबिंदू असावेत असे वाटले, तरी तसे ते नसून पानांवरच्या जलरंध्रांतून (पाणी बाहेर टाकणाऱ्या विशिष्ट छिद्रांतून) बाहेर पडलेले पाण्याचे थेंब आहेत, हे प्रयोगाने सिद्ध करता येते. घनदाट जंगलात वाढणाऱ्या एका जातीच्या अळूच्या पानांतून एका रात्रीत सु. १०० मिलि. पाणी ठिबकून पडल्याचे आढळले आहे. इतर वनस्पतींत अशा पाण्याचे प्रमाण बरेच कमी असते. कित्येक वनस्पतींत ही प्रक्रिया आढळत नाही तथापि सु. ३०० वंशांतील वनस्पतींत ती आढळल्याचे नमूद आहे. समशीतोष्ण कटिबंधात वसंत ऋतूच्या शेवटी सापेक्षतः रात्री अधिक थंडी व दिवसा उबदार हवामान असताना हा प्रकार अधिक वारंवार दिसतो.

निस्यंदनाने जलरंध्रांतून बाहेर पडणारे पाणी उच्च दर्जाच्या वनस्पतींतील वाहिन्यांतून मुळांतील पाण्याच्या दाबामुळे वनस्पती व पाणी प्रथम कोशिकांमधील (पेशींमधील) मोकळ्या जागांत येते व नंतर जलरंध्रातून बाहेर खेचले जाते. काही वनस्पतींत (उदा., काही गवते, गार्डन नॅस्टर्शियम, फुक्सिया, अल्केमिला इ.) जलरंध्रांखाली काही हरितद्रव्यहीन व पातळ आवरणाच्या सजीव कोशिकांचा समूह असून त्याच्याकरवी वनस्पतीतील वाजवीपेक्षा जास्त जमलेले पाणी जलरंध्रांतून बाहेर टाकले जाते. जलरंध्राभोवती दोन रक्षक कोशिका असतात या संरचनेला जलप्रपिंड (प्रपिंड म्हणजे ग्रंथी) म्हणतात [⟶ शारीर, वनस्पतींचे].

बाहेर येणारे पाणी पूर्णपणे शुद्ध नसून त्यात निदान अंशमात्र शर्करा, ॲमिनो अम्ले व खनिज लवणे यांसारखे विद्राव्य (विरघळणारे) पदार्थ असतात.

पहा : रक्तस्राव.

परांडेकर, शं. आ.