करवंद : (हिं. करोंदा गु. करमरडा क. कारेकाई सं. कंचुका इं. बेंगॉल करांट लॅ. कॅरिसा करंडास कुल- ॲपोसायनेसी). या मोठ्या काटेरी व सदापर्णी झुडुपाचा प्रसार भारतात सर्वत्र जंगली अवस्थेत आढळतो विशेषतः शुष्क व खडकाळ ठिकाणी सर्वत्र आहे.

करवंद (फुले व फळांसह फांदी)

शिवाय श्रीलंका, जावा, तिमोर येथेही ते आढळते. खोड आखूड असून फांद्या व लांब काटे द्विभक्त (एका कडेला थोडेसे चिकटून दोन समान भागांचे तयार झालेले) लहान फांद्या एकांतरित (एकाआड एक). पाने साधी, संमुख (समोरासमोर), लहान, चिवट, लंबगोल किंवा व्यस्त अंडाकृती, गुळगुळीत व चकचकीत फुले पांढरी, अपछत्राकृती (खालचा भाग नळीसारखा व वरचा भाग तबकासारखा असलेला पुष्पमुकुट), लोमश (लवदार) असून गुलुच्छ वल्लरीत [→पुष्पबंध] ती शेंड्याकडे जानेवारी-एप्रिलमध्ये येतात [→फूल]. मृदुफळ गोल किंवा किंचित लंबगोल, पिकल्यावर जांभळट काळे, गोटीसारखे, गुळगुळीत असते. बिया बहुधा चार. सामान्य शारीरिक लक्षणे पोसायनेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे. फळ स्कर्व्हीनाशक. कच्चे फळ स्तंभक (आकुंचन करणारे), पक्‍व फळ शीतकर (थंडावा आणणारे) व आंबट गोड मूळ कडू, दीपक (भूक वाढविणारे) व कृमिनाशक. पानांचा काढा पाळीच्या तापावर प्रारंभी देतात. कच्च्या फळांचे लोणचे करतात, पिकलेली फळे खातात टार्ट व पुडिंग नावाच्या पाश्चात्य खाद्य पदार्थांत घालतात. लाकूड कठीण व गुळगुळीत असून त्यापासून कातीव वस्तू, फण्या, चमचे वगैरे करतात.

जमदाडे, ज. वि.