जुगुरू : (जग्गम हिं. पनि-आम्ला, तालिसपत्री क. अब्लू सं. तालिश इं. पुनिआला प्लम लॅ. फ्लॅकोर्टिया कॅटफ्रॅक्टा कुल-फ्लॅकोर्टिएसी). हा लहान, पानझडी, मध्यम, मध्यम आकाराचा (९–१५ मी. उंच व ०·९-१·५ मी. घेराचा) वृक्ष ब्रह्मदेश, मलाया आणि सिंगापूर येथे आणि भारतात बहुतेक सर्वत्र जंगली अवस्थेत आढळतो. कोकणात व उ. भारतात त्याची लागवडही करतात. खोडावर मोठे संयुक्त काटे असतात फांद्या अनेक व कोवळेपणी बिनकाटेरी असून पाने साधी, लहान, अंडाकृती व टोकास निमुळती, दोन्ही बाजूंस चकचकीत असतात ती उन्हाळ्यात गळतात. बारीक डहाळ्यांवर पाच ते दहा एकलिंगी फुले, विभक्त झाडांवर, जानेवारी- फेब्रुवारीत येतात त्यांना पाकळ्या नसतात. मृदुफळ लांबट गोलसर, लिंबोणीएवढे, निळसर काळे व आंबट असून बिया दहा ते चौदा व चापट असतात.

जुगुरू : फळासह फांदी

पित्ताधिक्य व यकृताच्या विकारावर फळे चांगली पाने स्वेदकारी (घाम आणणारी) आणि अतिसारावर उपयुक्त. सालीचा काढा पित्तविकारांवर देतात. लाकूड लालसर, कठीण, जड व ठिसूळ असून त्याला चांगली झिलई होते. विशेषेकरून त्यापासून शेतीची अवजारे बनवितात.

पहा : फ्लॅकोर्टिएसी.                                                            

जमदाडे, ज. वि.