मुचकुंद : कळ्या व फुले यांसह फांदी

मुचकुंद : (लॅ. टेरोस्पर्मम सुबरिफोलियम टे. कॅनेसेन्स कुल-स्टर्क्युलिएसी). हा एका मध्यम आकाराचा आणि सरळ खोडाचा वृक्ष असून तो श्रीलंकेत व भारतात (कोकण, कर्नाटक, तमिळनाडू व ओरिसा) जंगलात व सु. ९०० मी. उंचीपर्यंत आढळतो. याच्या टेरोस्पर्मम या प्रजातीत एकूण ४० जाती असून त्यांपैकी सु. १२ जाती भारतात आढळतात. सुगंधी फुलांसाठी मुचकुंदाची लागवड उद्यानांत करतात. कोवळ्या भागांवर तारकाकृती केसांची लव असते. खोडावरची साल करडी आणि गुळगुळीत असते. पाने साधी, सोपपर्ण (तळाशी लहान उपांगे असलेली), तळाशी काहीशी तिरपी, गोलसर (५–१५·५ X २·५–५ सेंमी.), टोकाकडे साधारण दातेरी वा काहीशी खंडित, आयत-अंडाकृती, एकाआड एक पण दोन रांगांत असतात ती कोवळेपणी लालसर आणि जून झाल्यावर वरच्या बाजूस गुळगुळीत आणि खाली पांढरट लवदार असतात. जाडजूड, मोठी, लवदार फुले २·५–५ सेंमी. व्यासाची संवर्त पाच संदलांचा व पाकळ्याही पाच असतात. केसरदलाची नलिका आखूड व तीवर पाच वंध्य तंतू आणि त्यांमधून पाच गटांत एकूण पंधरा परागधारक तंतू असतात [⟶ फूल]. फुलोऱ्याच देठ पानांच्या देठांच्या दुप्पट लांब असून फुलोरे पानांच्या बगलेत येतात. फुलाची विशेष संरचना आणि इतर काही सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ स्टर्क्युलिएसी अथवा मुचकुंद कुलात आणि ⇨ कर्णिकार ह्या झाडाच्या वर्णनात दिल्याप्रमाणे असतात. फळ (बोंड) पांढरे, कठीण, लंबगोल, दोन्ही टोकांस निमुळते, ३·८–६·२ सेंमी. लांब व ४–५ शकलांचे असून त्यातील प्रत्येक कप्प्यात २–४ बीजे असतात. फळावर मखमलीसारखे आवरण [⟶ गोरखचिंच] असून प्रत्येक बीज तिरपे, अंडाकृती, सपाट असते व त्यावर टोकास पातळ पंख असतो.

मुचकुंदाची वाढ जलद होते. याचे लाकूड फिकट लाल, सुबक, मध्यम कठीण व जड आणि बळकट असून ते इमारतींकरिता आणि गाड्यांचे दांडे, वल्ही, बंदुकीचे दस्ते, खोकी, खाटांची दांडकी, जळण इत्यादींकरिता वापरतात. फुले कडू असून ती पाण्यात भिजत टाकल्यास ते पाणी बुळबुळीत होते. फुलांचा लगदा, भात व शिर्का यांचा किंवा फक्त पानांच्या लगद्याचा लेपही अर्धशिशीवर लावण्यास उपयुक्त आहे. कफविकारांवर फुलांचा उपयोग आयुर्वेदात सांगितला आहे. गूळ तयार होत असताना रस नितळ होण्यासाठी त्यात याच्या खोडाची साल घालतात. फळांचा मुरंबा करतात. ⇨ कर्णिकार (टे. ॲसरिफोलियम) या मुचकुंदाच्या प्रजातीतील दुसऱ्या जातीसही मुचकुंद असे म्हटलेले आढळते परंतु तो भिन्न वृक्ष आहे. महाभारतात (इ. स. पू. १–३ शतक) कर्णिकाराचा व मुचकुंदाचा उल्लेख आढळतो, त्यावरून दोन्ही वृक्ष भारतीय असावेत.

संदर्भ : C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VIII, New Delhi. 1969.

जमदाडे, ज. वि परांडेकर, शं. आ.