नेपती : (अ) फुलोऱ्यासह फांदी (आ) फूल : (१) किंजधर, (२) किंजपुट (इ) फळ.

नेपती : (नेवती हिं. करेर, कारी गु. केरडी क. निबटी, शिप्रिगिड सं. करीर, गूढपत्रा लॅ. कॅपॅरिस एफायला, कॅ. डेसिड्युआ कुल-कॅपॅरिडेसी). हे क्षुप (झुडूप) सिंध, अरबस्तान, उ. आफ्रिकेतील उष्ण भाग, भारत इत्यादींतील रुक्ष प्रदेशांत (उदा., पंजाब, राजस्थान इ.) सर्वत्र आढळते. तो लहान वृक्षही असतो. जून फांद्यांवर पाने नसतात. कोवळेपणी लहान, बिनदेठाची, साधी पाने असतात ती लवकर गळतात. उपपर्णी काटे सरळ, लांब, तीक्ष्ण व नारिंगी असतात. अनेक लाल व लहान फुलांचे गुलुच्छासारखे (झुबक्यासारखे) [→ पुष्पबंध] फुलोरे जून खोडावर किंवा बाजूच्या लहान फांद्यांवर नोव्हेंबर ते मार्चमध्ये येतात. संदले व प्रदले प्रत्येकी चार, सुटी व विषम आकारांची प्रदले शेंदरी केसरदले अनेक (सु. १५), लालसर किंजपुट १·५ सेंमी. किंजधरावर (केसरदलातून वर आलेल्या दांड्यावर) असतो [→ फूल]. फळ गोलसर, लाल, करवंदाएवढे, मांसल व बिया अनेक. इतर सामान्य लक्षणे कॅपॅरिडेसी  कुलात (वरुण कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. याचे लाकूड पिवळट तपकिरी, मध्यम प्रतीचे, जड व कठीण आणि वाळवीपासून सुरक्षित असते. अनेक सामान्य वस्तूंकरिता, शेतीची अवजारे, घाणे, गाड्या, हत्यारांचे दांडे, खांब व जळणास उपयुक्त असते. कळ्यांचे आणि फळांचे लोणचे करतात. फळे उकडून भाजी करतात फळे ताकात मीठ घालून तीन दिवस भिजवून नंतर वाळवून भाजी करतात. खोडाची साल तिखट, सारक, कृमिघ्न (कृमिनाशक), स्वेदक (घाम आणणारी) व कफनाशक (कफ काढून टाकणारी) आणि दमा व दाह यांवर उपयुक्त असते. फळ स्तंभक (आकुंचन करणारे) असून पित्तविकार व हृदयविकार यांवर उपयुक्त असते. मूळ कडू, ज्वरनाशक व संधिवातावर गुणकारी असते. कोवळ्या फांद्यांचा आणि पानांचा लगदा गळवे व सूज यांवर बांधतात आणि तो चघळल्यास दातदुखी थांबते. मुळे व त्यांवरची साल तिखट व कडू असून संधिवात आणि पाळीच्या तापावर देतात. वैदिक वाङ्‌मयात करीराचा उल्लेख असून यज्ञात आहुती देण्यास फळे वापरीत असत.

घवघवे, ब. ग.