ऑर्किडेलीझ : (आमर-गण). फुलझाडांपैकी एकदलिकित वर्गातील ह्या गणामध्ये  ऑर्किडेसी, बर्मानिएसी व ॲपोस्टॅसिएसी या तीन कुलांचा अंतर्भाव केला आहे. अत्यंत लहान बीजे हे या गणाचे अधिक महत्त्वाचे लक्षण असल्याने ‘मायक्रोस्पर्मी’ (सूक्ष्मबीजी) या नावानेही हा गण ओळखतात. यातील सर्व वनस्पती  अपिवनस्पती, शवोपजीवी (मृत शरीरावर जगणाऱ्या) किंवा नेहमीप्रमाणे जमिनीवर वाढणाऱ्या  षधी अथवा लहान क्षुपे (झुडपे) असतात. यांच्या फुलांच्या संरचनेत पुष्पदलांची मंडले एकावर एक द्विलिंगी असतात. तथापि केसरदलातील संख्येत बरीच घट झालेली आढळते. परागकोश व किंजल्क हे परस्परांस अंशत: किंवा पूर्णतः चिकटून असतात. किंजपुट अधःस्थ व त्यात एक किंवा तीन कप्पे असून बोंडामध्ये बारीक बिया असतात [→ फूल]. गर्भाचे सर्व भाग प्रथम पूर्णपणे बनलेले नसतात. सर्व एकदलिकित वनस्पतींत हा गण अत्यंत प्रगत व उत्क्रांतीच्या सर्वश्रेष्ठ पायरीवर आहे, हे जरूर त्या शारीरिक लक्षणांवरून दिसून येते. हचिंसन यांच्या मते मात्र तसे नसून त्यांनी तो उच्च दर्जा गवतांना दिला आहे व वर सांगितलेल्या तिन्हींपैकी दोन कुलांचा वेगवेगळ्या गणांत (बर्मानिएलीझ व ऑर्किडेलीझ) व एकाचा (ॲपोस्टॅसिएसीचा) हीमॅडोरेलीझ या गणात समावेश केलेला आहे.  लिलिएलीझ  या गणाशी ऑर्किडेलीझचे साम्य व निकटवर्ती संबंध ओळखून बहुधा  लिलिएसी  या कुलापासून ऑर्किडेसी हे कुल उत्क्रांत झाले असावे, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. ऑर्किडेसीचा उगम म्यूझेसीतील [ → सिटॅमिनी] पूर्वजांमधून झाला असावा, असेही एक मत प्रचलित आहे.

परांडेकर, शंआ.