हेंप, न्यूझीलंड : (इं. बुश फ्लॅक्स, फ्लॅक्स लिली, न्यूझीलंड फ्लॅक्स लॅ. फोर्मियम टेनॅक्स कुल-लिलिएसी) . फुलझाडांपैकी एक फार उपयुक्त बहुवर्षायू ओषधीय क्षुप. ते मूळचे न्यूझीलंडमधील  असून न्यूझीलंड व नॉरफॉक बेटावर ते जंगली अवस्थेत आढळते. ग्रेट ब्रिटनमध्ये ते बहुधा शीत पादपगृहांत लावतात. उबदार समशीतोष्ण प्रदेशांत व उष्ण-कटिबंधातील थंड प्रदेशांत त्याची धाग्यांकरिता मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली आढळते तसेच ते शोभेकरिता बागेतून लावले जाते. त्याची दक्षिण भारतातील टेकड्यांत लागवड करण्यात आली असून उटी (उटकमंड) येथे ते चांगले वाढते. न्यूझीलंडमधील मॅसी महाविद्यालयात संकर पद्धतीने या वनस्पतीचे नवीन संकरज प्रकार निर्माण करण्याचे प्रयत्न यशस्वी झाले आहेत. 

 

न्यूझीलंड हेंप (फोर्मियम टेनॅक्स) : (१) पानांफुलोऱ्यासहित वनस्पती, (२) फूल.न्यूझीलंड हेंप वनस्पती ५-६ मी. उंच वाढते. तिचे भूमिस्थित खोड ( मूलक्षोड) जाडजूड व शाखायुक्त असून त्यापासून जमिनीवर मोठ्या (१–४ मी. ⇨ ४–१२ सेंमी.), खड्गाकृती (तलवारीसारखी), मूलज, लांबट पानांचा झुबका येतो. पाने गर्द हिरवी असून त्यांच्या कडा नारिंगी अथवा लालसर असतात व पृष्ठभागावर उभ्या घड्या पडलेल्या (चूणित) आढळतात. फुलोरा ४-५ मी. लांब असून द्विलिंगी फुले जून-जुलैमध्ये येतात. पुष्पबंधाक्ष गर्द तपकिरी, २-३ सेंमी. व्यासाचा व केशहीन असून परिमंजऱ्या पिवळट लाल फुलांच्या असतात. बोंडे अनेक बीजी, ५-१० सेंमी. लांब असून बिया पुष्कळ, काळ्या, ९-१० मिमी. लांब, चपट्या व चकचकीत असतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ लिलिएसी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. अभिवृद्धी बिया किंवा मूलक्षोडाचे तुकडे लावून करतात. लागवडीनंतर ३–६ वर्षांनी पानांची पहिली कापणी करतात. मात्र, पुढे ती तोड अनियमित असते. 

 

न्यूझीलंड हेंप वनस्पतीच्या पानांतील विशेषतः मध्यशिरेपासून चांगला बळकट व उच्च प्रतीचा धागा मिळतो. यंत्राच्या साहाय्याने किंवा हातांनी धागा काढून तो धुवून उन्हात सुकवितात व नंतर साफ करून वापरतात. ताज्या पानांच्या वजनाशी तुलना केल्यास सुका धागा १५–२०% भरतो. धाग्याचा रंग पिवळट असून त्याला लालसर छटा व चकाकी असते. तसेच तो नरम व लवचिक असून रंगविण्यास सोपा असतो. न्यूझीलंडमध्ये त्यापासून कापड, चटया व दोर बनवितात, तर इंग्लंडमध्ये मुख्यतः दोर व शिडाचे कापड बनवितात. तसेच खेळणी, चटया, दोरा, बुटाचे तळ, जाडेभरडे कापड, पिशव्या इत्यादींसाठी तो वापरतात. गाद्या भरण्यास व गिलाव्यात त्यातील चोथ्याचा उपयोग करतात. लिहिण्याचा व वेष्टनाचा कागद आणि रेयॉन यांकरिता त्याचा लगदा उपयुक्त असतो. लगद्यापासून मद्य काढतात व चोथा दुभत्या जनावरांना खाद्य म्हणून देतात. बियांतून मिळणारे सु. ३०% पिंगट तेल रंग व रोगण यांकरिता उपयुक्त असते. मुळांचा काढा रेचक व कृमिनाशक असतो. न्यूझीलंडमध्ये पानांच्या तळातून पाझरणारा डिंक व फुलातील मधुरस खाद्यात वापरतात. भाजलेल्या बियांची पूड कॉफीमध्ये एक घटकद्रव्य म्हणून वापरतात. फुलांतील मकरंद ट्यूई व बेलबर्ड्स या न्यूझीलंडमधील स्थानिक पक्ष्यांचे खाद्य आहे. तसेच फुलांपासून तपकिरी रंगाचे रंजकद्रव्य व टॅनीन मिळते. 

परांडेकर, शं. आ.