ताराफळ : (१) फळासह फांदी, (२) फळाचा अर्धा भाग.ताराफळ : (इं. स्टार ॲपल, केनिटो लॅ. क्रिसोफायलम केनिटो, कुल–सॅपोटेसी). हे मराठी नाव एका झाडाच्या  इंग्रजी नावाचे भाषांतर आहे. तसेच क्रिसोफायलम ही लॅटिन नावातील वंशवाचक संज्ञा या झाडाच्या पानांच्या खालच्या बाजूस असलेल्या सोनेरी रंगामुळे वापरलेली आहे. सु. १५–१८ मी. उंचीच्या या डौलदार व सदापर्णी वृक्षाचे मूलस्थान अमेरिकेतील उष्ण प्रदेश व वेस्ट इंडीज होय. पनामात व मध्य अमेरिकेत हा चांगला वाढतो. भारतात रस्त्यांच्या दुतर्फा व बागेतून शोभेकरिता लावलेला आहे. पाने १०–१२ X ५–७ सेंमी. वर चकचकीत हिरवी व खाली सोनेरी लवदार असतात. सूर्यप्रकाशात वाऱ्याने झाड हालताना पर्णसंभार यामुळे शोभिवंत दिसतो. फुले लहान व कक्षास्थ (बगलेत) असून त्यांची संरचना सामान्यतः ⇨ सॅपोटेसी अथवा मोह (मधूक) कुलात वर्णिल्याप्रमाणे. मृदुफळ ५–७ सेंमी. व्यासाचे, पांढरट ते जांभळट रंगाचे, गोलसर व गुळगुळीत असून ते आडवे कापले असता त्यात ८–१० तारकाकृती कप्पे दिसतात त्यावरूनच इंग्रजी नाव पडले आहे. फळे साधारण गोड व खाद्य असून अमेरिकेत ती बरीच लोकप्रिय आहेत. याचे लाकूड कठीण, बळकट, जड व तपकिरी असून ते कपाटाकरिता वापरतात. बियांपासून याची नवीन रोपे तयार करतात. तरसीफळ किंवा डोंगरी मायफळ या नावाचे सह्याद्री, खासी टेकड्या, श्रीलंका व ब्रम्हदेश ह्या प्रदेशांतील झाड ताराफळांच्या वंशातील निराळी जाती (क्रि. रॉक्सवर्धाय) असून तिचेही इंग्रजी नाव स्टार ॲपल आहे. कर्नाटक, तमिळनाडू व आंध्र प्रदेश येथेही ते आढळते. त्याची फळे खाद्य तथापि विशेष चवदार नसतात. लाकूड साधारण कठीण असून इमारतीस उपयुक्त असते त्यापासून पातळ फळ्या, तक्ते व कुऱ्हाडीचे  दांडे बनवितात.

पाटील, शा. दा.