भुईचाफा : (१) पान, (२) फुलोरा.

चाफा, भुई : (हीं. भुई चंपा गु. भुईचंपो क. नेल संपिगे सं. भूमिचंपा, भूचंपक लॅ.केंफेरिया रोटुंडा गण-सिटॅमिनी कुल-झिंजिबरेसी). ही आकर्षक, सुगंधी, बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) ⇨ओषधी  मलायात व भारतात सर्वत्र आढळते आणि शोभेकरिता बागेत सर्वत्र लावतात. हिला भूमिस्थित, आयत व गाठीसारखे खोड [मूलक्षोड, ग्रंथिक्षोड, ⟶ खोड] असून जाडसर शाखांपासून जमिनीत अनेक गड्डे (ग्रंथिक्षोड) बनतात. पाने दोन वा क्वचित अधिक, साधी, आखूड व पन्हळी देठाची, लांबट, मोठी (३०–४५ X ७–११ सेंमी.), उभी, अंडाकृती-कुंतसम (भाल्यासारखी) असून त्यांचा वरचा पृष्ठभाग हिरवट व चित्रविचित्र आकृतिबंधाचा आणि खालचा पृष्ठभाग लालसर जांभळा असतो. फुले सुगंधी, पांढरी, मोठी असून मोठी पाकळी (ओष्ठ) जांभळट असते लहान कणिश प्रकारच्या फुलोऱ्यावर दाटीने ती एप्रिलमध्ये येतात त्यावेळी पाने वाळून जात असतात व ती पुढे पावसाळ्यात येतात. द्‌यावृत (दोन आवरणांच्या) बोंडात अनेक बिया असतात इतर सामान्य लक्षणे ⇨सिटॅमिनी  वा कदली गणात वर्णिल्याप्रमाणे. फुलोरा जमिनीच्या पृष्ठभागाजवळ येत असल्याने ‘भुईचाफा’ नाव पडले असावे.

या वनस्पतीचे गड्डे कडू व तिखट असून प्रथम त्यांना कापरासारखा व नंतर दवण्यासारखा वास येतो. गळणे, सूज आणि जखमा यांवर गड्ड्यांचे पोटीस बांधतात व तेल मलमात घालतात. चूर्ण गालगुंडावर लावतात गड्डे दीपक (भूक वाढविणारे) असून पोटातील तक्रारीवर देतात त्यांचा रस हातापायांच्या सुजेवर देतात, परंतु तो वांतिकारक असतो त्यामुळे तोंडास फार पाणी सुटते. मूलक्षोड व पाने स्वादाकरिता उपयुक्त असून सुगंधी पदार्थांत व सौंदर्यप्रसाधनांत मूलक्षोडातील फिकट पिवळे व उडून जाणारे तेल घालतात तेलात सिबीओल व मिथिल शॅविकॉल असतात.

हलकी माती, कुजलेले शेणखत अगर पालापाचोळ्याचे खत कुंड्यांत भरून त्यांत गड्डे लावतात. फुले येऊन गेल्यावर ओषधी पूर्णपणे वाळून गेल्यासारखी वाटते परंतु गड्डे जमिनीत राहतात त्यांना काही दिवसांची विश्रांती मिळाल्यानंतर त्यांपैकी चांगल्या कळ्या (डोळे) असलेले गड्डे अभिवृद्धीसाठी (लागवडीसाठी) वापरतात. ते लावल्यापासून उगवून येईपर्यंत पाणी बेतानेच द्यावे उगवल्यावर भरपूर द्यावे. शेणखत अगर अमोनियम सल्फेट पाण्यात मिसळून दिल्यास रोपे चांगली वाढतात.

जमदाडे, ज. वि चौधरी, रा. मो.