कीटक्षोद : (लँ. पायरेथ्रम कुल-कंपॉझिटी). हे कीटकांना मारण्याकरिता उपयुक्त असलेले चूर्ण ज्या वनस्पतींच्या फुलांपासून काढतात त्यांच्या वंशाला पूर्वि लॅटिन भाषेत पायरेथ्रम  नावाने ओळखतात, परंतु हल्ली त्या सर्व वनस्पतींचा समावेश ख्रिसँथिमम वंशात केला जातो. ग्रीक भाषेत ख्रिसँथिममचा अर्थ ‘सुवर्णपुष्प’ असा आहे. या वंशातील वनस्पती ओषधीय [→ ओषधि] असून त्यांच्या सूक्ष्म दातेरी पानांच्या झुबक्यातून लहान दांड्यांवर सुगंधी फुलांची विविधरंगी स्तबके [→ कंपॉझिटी पुष्पबंध] येतात. या वनस्पती बागेत शोभेकरिता वाफ्यांच्या कडेने लावतात व फुलांचे स्तबक फुलदाणीत ठेवतात. त्या मूळच्या नैर्ऋत्य आशियातील असून कीटक्षोद चूर्णाकरिता विशिष्ट जातींची लागवड मुख्यत: आफ्रिका, जपान, अमेरिका, भारत (आसाम, काश्मीर, निलगिरी व वायव्य हिमालय) इ. प्रदेशांत केली जाते. त्यांना सामान्य प्रतीची पण उत्तम निचऱ्याची जमीन व भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असून वसंत ऋतूत बिया पेरल्यावर एक वर्षाने फुले येतात.

ख्रि. कॉक्सिनियम (पेंटेड लेडी) ची स्तबके गर्द गुलाबी व केंद्रबिंब पिवळे असते. ही जाती व ख्रि.

नेथिफोलियम  ह्यांच्यापासून इराणी कीटक्षोद हे कीटकनाशक चूर्ण मिळते. ख्रि. सिनेरॅरिफोलियम  व ख्रि. मार्शलीपासून डाल्मेशियन कीटक्षोद मिळते. ही दोन्ही चूर्णे तीव्र आहेत. यांमध्ये पायरेथ्रीन १ व २ आणि सिनेरीन १ व २ ही क्रियाशील द्रव्ये असतात. कीटक्षोद स्पर्श- विष असून त्याच्यामुळे वनस्पतींना व अनियततापी (परिसराच्या तापमानावर ज्यांच्या शरीराचे तापमान अवलंबून असते अशा) पृष्ठवंशीय (पाठीच्या कणा असलेल्या) प्राण्यांना अपाय होत नाही. ते घरामध्ये तसेच गुराढोरांवर व खाद्य वनस्पतींवर फवारण्यास फार उपयुक्त असते. गुलदौडी हे (ख्रि.कॉरोनॅरियम, सं. शेवंतिका) कॅमोमाइलऐवजी एक सुगंधी, कडू व दीपक (भूक वाढविणारे) औषध म्हणून देतात.

 

पहा : कीटकनाशके शेवंती. 

 

जमदाडे, ज. वि.