अंबाश : (इं. नाइल-पिथ ट्री लॅ. हर्मिनीरा एलॅफ्रोझायलन कुल-लेग्युमिनोजी). सदैव पाणथळ जमिनीत वाढणारा व आफ्रिकेतील उष्ण प्रदेशात आढळणारा हा एक सरळ, शिंबावंत (शेंगा येणारा), काटेरी वृक्ष (उंची ६ मी.) असून याची सामान्य शारीरिक लक्षणे ⇨लेग्युमिनोजी कुलात (उपकुल-पॅपिलिऑनेटी) वर्णिल्याप्रमाणे आहेत. पाने राठ केशी, संयुक्त व पिसासारखी दले १०-२० जोड्या दल लांबट व लहान फुलोरा गुलुच्छसारखा [→पुष्पबंध] व फुले गर्द नारिंगी शेंग (शिंबा) सपाट, अरुंद व सर्पिल असून तडकताना तिचे चौकोनी एकबीजी खंड होतात. या वनस्पतीत ⇨वायूतक असते. याचे लाकूड बळकट, चिवट, पांढरे, भेंडासारखे हलके व विरळ असून ते खाटा, स्टुले यांकरिता व पाण्यात तरंगण्यात (तराफे, पडाव इ.) उपयुक्त असते. त्याचे पातळ काप काढून ‘सोला पिथ हॅट’ नावाच्या टोप्या बनविण्यास वापरतात. या टोप्या हलक्या व कडक उन्हापासून संरक्षण करीत असल्याने अनेक ठिकाणी उपयोगात आहेत.

पहा : शोला.

परांडेकर, श. आ.