ब्राह्मी : (१) फुलोऱ्यांसह वेल, (२) फुलोरा (३) फूल (४) फळ.

ब्राह्मी : (एकपानी, कारिवणा हिं. ब्रह्ममंडूकी गु. बार्मी क. ओंदेलग सं. मंडूकपर्णी इं. इंडियन पेनिवर्ट लॅ. सेंटेला एशियाटिका कुल एपिएसी अंबेलफेरी). ही परिचित नाजूक ⇨ ओषधी  श्रीलंकेत व भारतात सर्वत्र पसरलेली असून १,८६० मी. उंचीपर्यंत आढळते. उष्ण व उपोष्ण कटिबंधांत इतरत्रही ओलसर जागी ही आढळते. खोड जमिनीवर सरपटणारे (धावते) व लांब कांड्यांचे असून पेऱ्यापासून खाली आगंतुक मुळे व जमिनीवर १ – ३ मूत्रपिंडाकृती, सोपपर्ण, लांब देठांची, दातेरी कडांची २ – ४ साधी पाने येतात. लहान चवरीसारख्या फुलोऱ्यावर [ ⟶पुष्पबंध] मे ते नोव्हेंबरात फिकट गुलाबी, लहान फुले येतात. शुष्क फळ अंडाकृती व कठीण (४ मिमी. लांब) असते. फुलांची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ अंबेलेलीझमध्ये (चामर गणात) वर्णिल्याप्रमाणे असतात. हिला पूर्वी हायड्रोकॉटील एशियाटिका असे शास्त्रीय नाव होते.

ब्राह्मी आरोग्य पुनःस्थापक असून त्वचाविकार व कुष्ठरोग यांवर उपयुक्त असते तंत्रिका तंत्र (मज्जा संस्था) व रक्त यांच्या विकारांमध्ये ही पौष्टिक व शक्तिवर्धक आहे. पानांची पूड दुधातून घेतल्यास बलवर्धक व स्मरणशक्तीची वाढ होण्यास उपयुक्त असते. काही त्वचा विकारांत बाहेरून लेप लावल्यास व रस पोटात दिल्यास गुणकारी आहे. काहींच्या मते ब्राह्मी हे नाव फक्त ⇨ नीरब्राह्मीकरिता वापरून प्रस्तुत वनस्पतीस ‘कारिवणा’ म्हणावे. ब्राह्मीचा रस तेलात मिसळून केशवर्धक तेले बनवितात. पानांचा रस मधातून सकाळी घेतल्यास पौष्टिक असतो. कढी, सार, आमटी इत्यादींत पानांचा उपयोग भाजी प्रमाणे करतात. पाणिनीच्या अष्टाध्यायीत (इ. स. पू. ६ वे शतक) व सुश्रुतसंहितेत (इ. स. ३ रे शतक) मंडूकपर्णी असा हिचा उल्लेख आलेला आहे.

जमदाडे, ज. वि. 

Close Menu
Skip to content