बकुळ : (१) पाना-फुलांसह शाखा, (२) पुष्पमुकुट व केसरदले, (३) संवर्तासह फळ.बकुळ : (बकुळी, बाबळी हिं. मुलसरी गु. बरसुळी, बोलसरी क. हल्मददू, गोळसर सं. अनंगका, शारदिका, बकुल इं. इंडियन मेडलर, बुलेटुड लॅ. मिम्युसॉप्स एलेगी कुल-सॅपोटेसी). फुलझाडांपैकी [⟶वनस्पति, आवृत्तबीज उपविभाग] द्विदलिकित वर्गातील हा सु. १३ -१५ मी. (अंदमान बेटांत ३५ मी. ) उंच, सदापर्णी भारतीय वृक्ष बागांतून सामान्यपणे सुगंधी फुलांकरिता लावलेला आढळतो. श्रीलंका, मलाया, भारत (उ. कारवार, कोकण, द.भारत) इ. ठिकाणी सदापर्णी जंगलात वन्य अवस्थेत हा आढळतो. चिकू, मोह, ताराफळ, खिरणी इ. उपयुक्त वृक्षांचा समावेश असलेल्या ⇨सॅपोटेसी कुलात (मधूक कुलात) याचा अंतर्भाव केला आहे. याचे कारण या सर्वांत कित्येक लक्षणे समान व सॅपोटेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे आहेत. ह्या वृक्षाचा माथा घुमटाप्रमाणे असून साल गर्द करडी व भेगाळ असते. पाने साधी, गर्द हिरवी, जाड, चिवट, लंबगोल, गुळगुळीत, एकाआड एक व टोकदार असतात. फुले लहान, १.५ सेंमी. व्यासाची, पिवळसर पांढरी, फार सुवासिक व तारकाकृती असून ती एकेकटी किंवा लहान झुबक्यांत जानेवारी ते मार्चमध्ये येतात. संद्रले ४+४ प्रदले १६+८, केसरदले ८, वंध्य केसरदले ८व एकांतरित (एकाआड एक) किंजपट ६-८ कप्प्यांचा व ऊर्ध्वस्थ असतो [⟶फूल]. मृदुफळ लंबगोल सु. २.५ सेंमी. लांब, टोकदार, पिवळे असून त्यात १-२ बिया असतात. बी तपकीरी, चकचकीत, अंडाकृती व काहीसे चपटे असते. या वृक्षाची नवीन लागवड बियापासून करतात. बी प्रथम टोपलीत रूजवून दोन वर्षानंतर रोपे पावसाळ्यात बाहेर लावतात. हे झाड फार सावकाश वाढते. उत्तम सावली व सुंगधी फुले यांमुळे ते लोकप्रिय आहे. पक्क फळ खाद्य असून त्याचे मुरंबे किंवा लोणचे घालतात. बियांत १६-२५% स्थिर तेल असून ते खाद्य व दिव्याकरिता उपयुक्त असते. लाकूड गर्द पिंगट, कठीण, टिकाऊ व जड असून रंधून व घासून ते गुळगुळीत व चकचकीत होते. बांधकाम व सजावटी सामान, घाणे, होड्या, वल्ही, हत्यारांचे दांडे, कपाटे, वाद्ये, मसळे, कातीव काम, हातातल्या काठ्या इत्यादीकरिता ते वापरात आहेत. फुलांतील सुगंधी द्रव्य अत्तरे, तेल यांमध्ये वापरतात. फुले वाळवल्यावरही त्यांना बराच काळ सुगंध येतो. खोडाच्या सालीत ३-७% टॅनीन असते साल कातडी कमाविण्यास व कापडाला पिंगट रंग देण्यास उपयुक्त आहे. साल स्तंभक (आकुंचन करणारी), शक्तीवर्धक व ज्वरघ्न असते. साल पाण्यात टाकून ते पाणी दंतरोगात चूळा भरण्यास चांगले असते. फळ स्तंभक असून ते जुनाट आंमाशावर व अतिसारावर गुणकारी असते. या झाडापासून डिंकही मिळतो. कोवळ्या फांद्या दात स्वच्छ करण्यात वापरतात. सुक्या फुलांची भुकटी तपकिरीप्रमाणे ओढल्यास डोकेदुखी व वेदना कमी होतात. महाभारत, बृहत्संहिता, सुश्रुतसंहिता,कौटिलीय अर्थशास्त्र आणि संस्कृत साहित्यात (उदा., मेघदूत, रघुवंश, मालतीमाधव आणि गीतगोविंद) बकुळाचा उल्लेख आढळतो हा वृक्ष पूज्य व घराजवळ लावण्यास योग्य मानला आहे. व याचे औषधी गुणही पूर्वी वर्णिले आहेत.

पहा : सॅपोटेसी.

संदर्भ : 1. C.S.I.R. The Wealth of India Raw Materials Vol, VI, New Delhi, 1962. 

          २. काशीकर, चिं.ग. भारतीय वनस्पतींचा इतिहास ,नागपूर, १९७४.

पाटील, शा. दा परांडेकर, शं. आ.