डार्विन, चार्ल्‌स रॉबर्ट : (१२ फेब्रुवारी १८०९–१९ एप्रिल १८८२). सुप्रसिद्ध इंग्लिश निसर्गशास्त्रज्ञ. यांचा जन्म श्रुझब्री (इंग्लंड) येथे झाला. त्यांचे वडील रॉबर्ट डार्विन हे नामांकित डॉक्टर व आजोबा ⇨ इरॅस्मिस डार्विन प्रसिद्ध शास्त्रज्ञ होते. चार्ल्‌स डार्विन यांना लहानपणापासून निसर्गाची आवड होती. वैद्यकविद्येच्या शिक्षणाकरिता ते एडिंबरो विद्यापीठात गेले, परंतु ते न जमल्याने ते केंब्रिज विद्यापीठात धर्मशिक्षणार्थ दाखल झाले व १८३१ मध्ये पदवीधर झाले. एडिंबरोत निसर्गप्रेमी म्हणून मिळविलेल्या ख्यातीचा त्यांना नंतर फार उपयोग झाला. आरमार खात्यातील एच्. एम. एस. ‘बीगल’ या सर्वेक्षणार्थ जलपर्यटनास निघालेल्या एका जहाजावर निसर्गशास्त्रज्ञ म्हणून त्यांची नेमणूक झाल्याने त्यांच्या आवडीच्या विषयावर संशोधन करण्याची व निसर्गातील चराचर वस्तूंचे सूक्ष्म निरीक्षण करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली यातूनच एकोणिसाव्या शतकातील एका क्रांतिकारक सिद्धांताचा पुढे जन्म झाला.

चार्ल्‌स रॉबर्ट डार्विन

इ. स. १८३१–३६ या पाच वर्षांच्या काळात द. अमेरिका, अटलांटिक महासागरातील बेटे, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, गालॅपागस बेटे, केप ऑफ गुड होप, टॅस्मेनिया, सेंट हेलेना इ. ठिकाणी केलेल्या प्रवासात त्यांनी तेथील प्राणी, वनस्पती व खडक यांचे सूक्ष्म अवलोकन करून अनेक नमुन्यांचा संग्रह केला. प्राणी आणि वनस्पती यांच्या विविध जातींतील फरक व भिन्न नैसर्गिक परिस्थितींशी त्यांचे अनुयोजन (परिस्थितींशी समरस होण्याकरिता सजीवात झालेले शारीरिक आणि क्रियावैज्ञानिक बदल) यांच्या निरीक्षणाने ‘जातींच्या उगमा’ संबंधी (निर्मितीसंबंधी) त्यांच्या मनात काही निश्चित कल्पना साकार होऊ लागल्या. विशेषतः प्राचीन वनस्पतींच्या काही जीवाश्मासंबंधी (शिळारूप अवशेषांसंबंधी) विचार करून भूतकालीन व वर्तमानकालीन जातींच्या परस्परसंबंधांचे त्यांना आकलन होऊ लागले. सफरीहून परत येईपर्यंत त्यांचा संग्रह, माहिती व जातींच्या परस्परसंबंधांच्या कल्पना अतिशय संपन्न झाल्या. नंतर त्यांनी या कल्पनांचा जीवविज्ञानाच्या प्रगतीसाठी मुक्तपणे उपयोग केला. 

त्यांनी १८३९–४६ या काळात प्रवासातील माहितीचे चार-पाच ग्रंथांमध्ये सुलभपणे संकलन केले असून त्यावरून त्यांचे सूक्ष्म निरीक्षण, लेखनशैली आणि संशोधक वृत्ती यांची कल्पना येते. त्यातील काही भाग ए नॅचरॅलिस्ट्स व्हॉएज ऑन द बीगल  या सामान्य नावाने ओळखला जातो व तो आदर्श प्रवासवर्णन म्हणून मानला जातो. 

कबुतरांच्या संकरणाबद्दलची (कृत्रिम रीत्या केलेल्या प्रजोत्पादनाची ) माहिती त्यांनी संकलित केली असून जगातील शिंपली जलचराबद्दल (बार्‌नॅकल) चार पुस्तिकाही प्रसिद्ध केल्या होत्या. ते लंडनमधील भूविज्ञान मंडळाचे चिटणीस (१८३८–४४) होते व १८३९ मध्ये ते रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून निवडले गेले.

 जवळजवळ पंचवीस वर्षे (१८३३–५८) चार्ल्‌स डार्विन यांनी सृष्टिनिरीक्षण व संशोधन करून विद्यमान जीवांच्या जातींच्या उत्पत्तीसंबंधी आपला सिद्धांत तयार केला. १८३८ मध्ये टॉमस रॉबर्ट मॅल्थस यांनी प्रसिद्ध केलेला लोकसंख्येबद्दलचा प्रबंध (एसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन) डार्विन यांच्या वाचण्यात आल्यावर त्यामध्ये दर्शविलेली ‘जीवनातील स्पर्धा’ ही कल्पना त्यांच्या ⇨ नैसर्गिक निवड  या कल्पनेशी सुसंगत असल्याचे त्यांना आढळले तसेच विविध जातींची गर्दी झालेल्या या जगात सर्व प्रकारांच्या अनुयोजनांची निवड शक्य आहे, ही एक मध्यवर्ती कल्पना त्यांच्या ‘जातीचा उगम’ या विषयाच्या चर्चेत आढळते. या विषयाचा पक्का आराखडा १८४४ मध्येच तयार झाला असून त्यासंबंधीच्या सिद्धांतास १८५८ साली प्रसिद्धी मिळाली. तत्पूर्वीची एक विलक्षण घटना त्या प्रसिद्धीला कारणीभूत झाली. त्या वेळी मलायात कार्य करीत असलेल्या आल्फ्रेड रसेल वॉलिस ह्या निसर्गशास्त्रज्ञांनी जीवनातील स्पर्धेत ‘नैसर्गिक निवड’ होऊन ‘योग्यतमांचा टिकाव लागतो’ ही गोष्ट अनुभवास येते, हा डार्विन यांच्या सिद्धांताचा गाभा असलेल्या कल्पनेसंबंधीचा आपला निबंध डार्विन यांच्याकडे अभिप्रायार्थ पाठविला. ज्याअर्थी दोन शास्त्रज्ञ समान निरीक्षणाने पण स्वतंत्रपणे एकच उपपत्ती मांडतात, त्याअर्थी ती जगापुढे ठेवताना तिच्या श्रेयाचा वाटा दोघांना मिळावा हेच युक्त, असा सल्ला त्या वेळी डार्विन यांना चार्ल्‌स लायल जोसेफ डाल्टन हुकर यांनी दिला. त्याप्रमाणे आपल्या स्वतःच्या सारांशाबरोबर त्यांनी वॉलिस यांचा निबंध लंडनच्या लिनीअन सोसायटीपुढे १ जुलै १८५८ रोजी ठेवला. त्यानंतर त्यावर साधकबाधक चर्चा होऊन बहुसंख्य शास्त्रज्ञांनी मूळ कल्पना व उपपत्ती (नैसर्गिक निवडीने होणारा जातींचा उगम) स्वीकारली. डार्विन यांनी २४ नोव्हेंबर १८५९ रोजी आपला ऑन द ओरिजिन ऑफ स्पीशीज बाय मीन्स ऑफ नॅचरल सिलेक्शन, ऑर द प्रिझर्व्हेशन ऑफ फेव्हर्‌ड रेसेस इन द स्ट्रगल फॉर लाइफ हा ग्रंथ प्रसिद्ध केला व अगोदर मिळालेल्या प्रसिद्धीमुळे त्याच दिवशी त्याच्या सर्व प्रती संपल्या. हा ग्रंथ संक्षिप्त रूपात ओरिजिन ऑफ स्पीशीज या नावाने निर्देशिला जातो.  

सर्व जीव हे स्वयंजननापासून उत्पन्न झालेले असून ते सर्व अपरिवर्तनीय आहेत (आकाराने कायम आहेत), ही जुनी व शतकानुशतके धर्मोपदेशकांनी रूढ केलेली कल्पना निराधार असून सर्व विद्यमान जीव प्राचीन व साध्या जीवांपासून क्रमाक्रमाने विकास पावत आले आहेत व ते परिवर्तनीय आहेत, ही ‘जैव क्रमविकास’ सिद्धांताची मध्यवर्ती कल्पना आहे. डार्विन यांनी आपल्या ग्रंथात याला सबळ पुरावा सादर केला. जगातील मर्यादित जीवनसाधने व अमर्याद जीवसंख्या यांमुळे जीवनार्थ कलह (स्पर्धा) उत्पन्न होऊन त्यामध्ये नैसर्गिक निवडीमुळे योग्यतमांचा टिकाव लागतो असा निष्कर्ष डार्विन यांनी काढला. प्रत्येक पिढीत नैसर्गिक निवडीच्या चाळणीतून अतिशय योग्य जातींची निवड होऊन इतर नाश पावतात. योग्य व्यक्तींतील भेद आनुवंशिकतेमुळे पुढच्या पिढीत उतरून त्यांमध्ये पुन्हा निवड होते असा प्रकार सतत चालत राहून नवीन जातींची निर्मिती होत राहते, हा डार्विन यांच्या शोधाचे सारांश आहे. या कल्पनेला त्या वेळी धर्मोपदेशकांचा बराच विरोध झाला, मात्र विरोधकांकडे त्यांनी लक्ष दिले नाही. इंग्लंड, अमेरिका व जर्मनी या देशांत अनुक्रमे जूलियन हक्सली, एसा ग्रे व एर्न्स्ट हेकेल या शास्त्रज्ञांनी त्यांचा पाठपुरावा केला. 


डार्विन यांनी १८६२–८१ या अवधीत वनस्पती व प्राणी यांसंबंधीचे दहा उत्तम ग्रंथ लिहिले : (१) ऑन द व्हेरियस कन्ट्रायव्हन्सेस बाय वुइच ब्रिटिश अँड फॉरेन ऑर्किड्स आर फर्टिलाइज्‌ड बाय इन्सेक्ट्स  (१८६२) यामध्ये आमरांच्या फुलांमध्ये [→ ऑर्किडेसी] कीटकांकडून परागकणांची ने-आण कशी घडवून आणली जाते, याचे वर्णन आले आहे [→ परागण]. (२) ऑन द मुव्हमेंट्स अँड हॅबिट्स ऑफ क्लाइंबिंग प्लँट्स (१८६१) यामध्ये आरोही (आधारावर चढत जाणाऱ्या) वनस्पतींची हालचाल म्हणजे त्यांचे स्पर्शग्रहण आधाराशी बिलगणे किंवा त्याभोवती वेटोळे घालीत वर वाढणे आणि त्या कार्याकरिता मूळच्या अवयवांत घडून आलेली रूपांतरे इत्यादींचा तपशील आला आहे. (३) द व्हेरिएशन ऑफ ॲनिमल्स अँड प्लँट्स अंडर डोमेस्टिकेशन (१८६८) यामध्ये पाळीव जनावरे व लागवडीत असलेल्या वनस्पती यांमध्ये घडून येणाऱ्या बदलांसंबंधी (प्रभेदांसंबंधी) माहिती आलेली आहे. (४) द डिसेंट ऑफ मॅन अँड सिलेक्शन इन रिलेशन टू सेक्स (१८७१) यात मनुष्यप्राण्यांचे अवतरण, ते कोणत्या पूर्वजांपासून झाले आणि त्यांमध्ये कोणते बदल कसे घडून आले, तसेच प्राण्यातील लिंगभेद व त्यावर आधारलेली निवड यांची क्रमविकासातील (उत्क्रांतीतील) भूमिका इत्यादींसंबंधीचे त्यांचे विचार ग्रंथित केले आहेत. (५) द एक्सप्रेशन ऑफ द इमोशन्स इन मॅन अँड ॲनिमल्स (१८७२) यात मनुष्य व इतर प्राणी यांतील भावनाविष्कार, त्यांतील साम्य व भेद आणि त्यावरून त्यांचे परस्परांतील आप्तभाव आणि त्यामुळे मिळालेला क्रमविकासाला आधार यांचा ऊहापोह केलेला आढळतो. (६) इन्सेक्टिव्होरस प्लँट्स (१८७५) कीटकांवर अंशतः उपजीविका करणाऱ्या वनस्पतींत आढळणारी स्पर्शग्राहकता आणि त्यानुसार घडून येणारा कीटकांना पकडून ठेवण्याचा प्रतिसाद व शेवटी कीटकाचे पचन आणि या सर्व प्रक्रियेस सोयीस्कर असे पानांचे रूपांतर यांसंबंधीचा तपशील या ग्रंथात आढळतो. (७) द इफेक्ट्स ऑफ क्रॉस-अँड सेल्फफर्टिलायझेशन इन द व्हेजिटेबल किंग्डम  (१८७६) वनस्पतींतील स्वफलन व परफलन ह्या प्रजोत्पादनपूर्व प्रक्रिया, त्यांकरिता असलेल्या संरचनांतील वैशिष्ट्ये, त्याचे भावी पिढीतील संततीवर होणारे परिणाम आणि त्या प्रक्रियेची क्रमविकासातील भूमिका याची चर्चा या ग्रंथात आढळते. परफलनाने झालेली संतती संख्या आणि गुण या दृष्टीने सरस असते हे दिसून आल्याचे दर्शविले आहे. (८) द डिफरंट फॉर्म्‌स ऑफ फ्लॉवर्स ऑन प्लँट्स ऑफ द सेम स्पीशीज (१८७७) एकाच जातीच्या भिन्न झाडांवर भिन्न प्रकारची द्विलिंगी फुले असल्यास सारख्या प्रकारातील कृत्रिम परागणापासून होणारी प्रजा नैसर्गिक रीत्या अनुकूलित अशा भिन्न प्रकारातील परागणापासून झालेल्या संततीपेक्षा कमजोर असते, असे त्यांनी या ग्रंथात प्रतिपादन केले असून परपरागणाची क्रमविकासातील भूमिका त्या प्रक्रियेस उपकारक असल्याचे दाखविले आहे. (९) द पॉवर ऑफ मूव्हमेंट इन प्लँट्स (१८८०) हा ग्रंथ त्यांनी फ्रान्सिस डार्विन यांच्या मदतीने लिहिला असून त्यामध्ये वनस्पतींच्या चलनवलनाची क्षमता या विषयावर चर्चा केली आहे. चलनवलनाचे प्रकार, त्यांतील प्रेरक यंत्रणा व त्यांचे जीवनातील महत्व विशद केलेले आढळते. (१०) द फॉर्मेशन ऑफ व्हेजिटेबल मोल्ड थ्रू द ॲक्शन ऑफ वर्म्‌स (१८८१)  वनस्पती ज्या जमिनीतून आपले अन्न-पाणी घेतात त्यातील वनस्पतिजन्य कार्बनी पदार्थ आणि त्यांच्या निर्मितीतील कृमींची भूमिका (कृमींचे कार्य) यासंबंधीची माहिती या ग्रंथात दिली आहे. 

डार्विन यांच्या ‘जातींचा उगम’ या सिद्धांतामुळे व ‘जीवांचा क्रमविकास’ (उत्क्रांती) या तत्वाला त्यांनी दिलेल्या अनेक पुराव्यांमुळे त्या वेळी व त्यानंतर जीवनाकडे पाहण्याच्या विचारी लोकांच्या दृष्टिकोनात फरक तर झालाच, शिवाय अनेक शास्त्रांच्या चर्चेत ही नवा विचार महत्वाचा ठरला.  वनस्पतिविज्ञानातील व प्राणिविज्ञानातील क्रमविकासाची बाब लक्षात घेऊन वनस्पतींमध्ये व प्राण्यांमध्ये नैसर्गिक वर्गीकरणाचे तत्त्व अंमलात आणणे अपरिहार्य झाले [→ वर्गीकरण प्राण्यांचे वर्गीकरण, वनस्पतींचे]. जातींतील भेद व आनुवंशिकता यांसंबंधी पुढे ग्रेगोर मेंडेल यांनी केलेल्या संशोधनावर आणि मेंडेलपूर्व संशोधनावरही डार्विन यांच्या कार्याचा बराच प्रभाव पडलेला आढळतो. तसेच कोशिकाविज्ञान व आनुवंशिकी यांमध्ये झालेल्या संशोधनामुळे डार्विन यांच्या मूळच्या सिद्धांतातही काही फरक पडल्याचे आढळते. ते डाऊन येथे मृत्यू पावले. 

फ्रान्सिस डार्विन (१८४८–१९२५) हे त्यांचे पुत्र वनस्पतिशास्त्रज्ञच असून त्यांनी वडलांना वनस्पतींच्या चलनवलनाबद्दलच्या ग्रंथलेखनास मदत केली होती. (१८८०). 

पहा : आनुवंशिकी क्रमविकास नैसर्गिक निवड. 

कुलकर्णी, सतीश वि. परांडेकर, शं. आ.