काशीफळ : (काशी भोपळा,चक्की हिं.कुमरा, सफेद कद्‌दू गु.दुडिया इं.पंपकिन, व्हेजिटेबल मॅरो लॅ. कुकर्बिटा पेपो कुल–कुकर्बिटेसी). ही वेल मूलतः अमेरिकेतील असून भारतात पिकविली जाते. ही काळ्या वा ⇨ तांबड्या भोपळयाच्या वंशातील आणि ⇨कुकर्बिटेसी  कुलातील असल्याने हिची सामान्य शारीरिक लक्षणे त्यांच्याप्रमाणे आहेत. पानांवरचे ठिपके, केस, संदले (पुष्पकोश) इ. लक्षणांतील फरक दिसून येतात. ही काहीशी काटेरी, वर्षायू (एक वर्ष जगणारी) व प्रतानयुक्त (ताणे असलेली) वेल असून फळाचा आकार सामान्यतः गोलसर, सालीचा रंग पिवळसर व देठावर खोबणी असतात. पाने साधी, हस्ताकृती, तीन ते पाच खंडी, रुंद देठ पात्याइतका लांब व पानाच्या मागील बाजूस राठ केस असतात फुले एकलिंगी, एकाच वेलीवर, मोठी, पिवळी, घंटेसारखी असून पाकळ्या टोकदार व संदले अरुंद केसरदले तीन व जुळलेली किंजल्क तीन [→फूल]. फळ भाजीकरिता उपयुक्त. पाने, फळे व बी औषधी अंग भाजल्यास पाने बाहेरून लावतात. बी मूत्रल (लघवी साफ करणारे), शामक व कृमिनाशक.

क्षीरसागर, ब.ग.

लागवड व मशागत : निचऱ्याच्या, भरपूर जैव पदार्थ असलेल्या जमिनीत तीन मी. हमचौरस अंतरावर ३० सेंमी. व्यासाचे आणि तितकेच खोल खड्‌डे (आळी) करून प्रत्येकी आठ ते दहा किग्रॅ. शेणखत घालून बिया लावतात व पाणी देतात. हंगाम पावसाळी आणि उन्हाळी. याच्या दोन आळ्यांमध्ये आळी करून त्यांच्यात खिरे, दोडके इ. मिश्रपिके लावतात. वेल जमिनीवर सोडतात. पाणी आठ–दहा दिवसांनी देतात. लागवडीनंतर महिन्याने तांबड्या भोपळ्याप्रमाणे वरखत देतात. पीक पाच–सहा महिन्यांचे असून हेक्टरमध्ये दहा ते बारा हजार किग्रॅ. फळभाजी मिळते.

पाटील, ह.चिं.