लिग्‍नम व्हिटी : (चोबेहयात, लोहलक्कड इ. ब्राझीलवुड, ट्रि ऑफ लाइफ, वुड ऑफ लाइफ, गम ग्वायकम लॅ. ग्वायकम ऑफिसिनेल कुल-झायगोफायलेसी). व्यापारात याच झाडाच्या लाकडालाही हेच नाव आहे, तर गम ग्वायकम हे नाव राळेकरिताही वापरतात. ग्वायकम ऑफिसिनेल हे लॅटिन नाव त्या वृक्षाच्या मेक्सिकोतील नावावरून पडले असून त्याचा अर्थ ‘औषधनिर्मितीत’ व ‘औषधात मान्यता मिळविलेले’ असा आहे. ⇨गोखरु व ⇨ धमासा या औषधी वनस्पतींशी या वृक्षाचे काही लक्षणांत साम्य आहे कारण ती सर्व एकाच कुलातील आहे. हा सुंदर वृक्ष मूळचा वेस्ट इंडीजमधील रूक्ष प्रदेश व समुद्रकिनारे येथील असून शोभेकरिता भारतासह सर्वत्र उद्यानांतून लावलेला आढळतो. हा सु. १०-१५ मी. उंच, सदापर्णी, सावकाश वाढणारा व मध्यम आकारमानाचा आहे. याचे खोड काहीसे वेडेवाकडे असून फांद्या गाठाळ व साल गुळगुळीत, भेगाळ, गर्द करडी असते तिच्यावर हिरवट व जांभळे ठिपके असतात. पाने संयुक्त, पिसासारखी, समोरासमोर व गर्द हिरवी असतात. दलांच्या २-३ जोड्या असून ती बिनदेठाची, विविध आकारमानांची, अंडाकृती, व्यस्तअंडाकृती, लंबवर्तूळाकृती इ. आकारांची व २.५ सेंमी. लांब असतात. प्रत्येकाच्या तळास एक नारिंगी ठिपका असतो. मार्च ते नोव्हेंबरात फांद्याच्या टोकास २ सेंमी. व्यासाची, प्रथम गर्द निळी व नंतर फिकट दिसणारी फुले झुपक्यांनी येतात. पेल्यासारखा संवर्त पाच संदलांचा असतो. पाकळ्या पाच व सुट्या आणि केसर दले (पुं-केसर) १० असतात. [⟶ फूल]. बोंडे (फळे) सु. दोन सेंमी. व्यासाची, पिवळी जर्द, गोलसर व काहीशी दबलेली, पाच कप्प्यांची व पंचधारी असतात ती झाडावरच फुटून त्यांतून गर्द शेंदरी किंवा पिवळ्या पाच कठीण बिया बाहेर पडतात. नवीन लागवड बिया लावून करतात. ह्या झाडांना ओलसर हवा मानवते. फुलांची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ झायगोफायलेसी अथवा गोखरू कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात.

या वृक्षाच्या लाकडाचा बाहेरचा भाग (रसकाष्ठ) पिवळट आणि मध्यकाष्ठ हिरवट तपकिरी ते काळपट असून त्याला कडवट चव आणि विशिष्ट आंबूस वास येतो. मध्यकाष्ठ राळयुक्त असून ते अतिकठिण व जड असते. ते पाण्यात बुडते. वाफेच्या एंजिनावर चालणाऱ्या जहाजाच्या यंत्रणेत त्याचा विशिष्ट प्रकारे उपयोग होतो. कप्प्यांच्या जुड्या छिन्नी व निकृंत (स्टेन्सिल) यांचे ठोकळे, हातोडे, आखण्या, मुसळे, वाट्या, ब्रशांच्या पाठी, स्किटल (विशिष्ट खेळातील) चेंडू, नवलपूर्ण कातीव वस्तू इत्यादींसाठी जेथे बळकटी व टिकाऊपणाची आवश्यकता भासते, तेथे त्याचा फार उपयोग होतो. लाकडात गटापर्चासारखा पदार्थ (ग्वायगटिन) असतो औषधाकरिता रांधा, चूर्ण किंवा तत्सम वस्तूंचा काही प्रमाणात उपयोग होतो. लाकडात ‘गम ग्वायकम’ ही राळ असून ती निसर्गतः झाडातून पाझरते लाकडाच्या एका टोकास पेटवून व मधल्या भागांवर चरे पाडून जी राळ स्त्रवते ती जमा करतात कधी लाकडाच्या ढलप्या किंवा भुसा समुद्राच्या पाण्यात किंवा खाऱ्या पाण्यात उकळतात व त्यात पृष्ठभागावर तरंगणारी राळ जमा करतात. राळेचे लहान किंवा मोठे गोळे प्रथम काळपट पिंगट दिसतात. पण नंतर हिरवट होतात. ते ठिसूळ, काहीसे पारदर्शक व चवीला तिखट असून त्यांना धुपासारखा वास येतो. ही राळ अल्कोहॉल, ईथर, क्लोरोफॉर्म (अल्कली) इत्यादींमध्ये विरघळते. बाजारात मिळणाऱ्या राळेत गोंदासारखे पदार्थ, कचरा व इतर हलक्या प्रतीची राळ यांची भेसळ असते. परिरक्षित व निर्जलीकृत अन्नपदार्थांना खवटपणा न येता स्वादिष्टपणा टिकून राहण्यास ही राळ वापरतात. रंग व रोगणे यांत राळ घालतात. ती सौम्य रेचक असून जुनाट संधिवातावर देतात तसेच रक्तशुद्धीकरता सार्सापरिलात घालतात. घशातील खवखवीसारख्या विकारांवर तिचा वापर करतात. खोडाच्या सालीतून मिळणारी राळ हिरवट भुरी व भिन्न असून तिखट व उत्तेजक असते तिचा उपयोग औषधात करतात ती तोंडात टाकल्यास आग होते.

संदर्भ : 1. Blatter, E. Millard, W. S. Some Beautiful Indian Trees, Bombay, 1954.

2. C. S. I. R. The Wealth of India, Raw materials, Vol. IV, New Delhi, 1956.

3. Cowen, D. V. Flowering trees and Shrubs in India, Bombay, 1965.

जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.

लिग्नम-व्हिटी : (१) पानाफुलांसह फांदी, (२) फूल, (३) फळ.