हॉप : (इं. कॉमन हॉप लॅ. ह्युम्युलस ल्युप्युलस कुल-कॅनाबिनेसी ). ही बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) ओषधीय वेल आहे. हिचे मूलस्थान उत्तर अमेरिका व यूरेशिया असावे. उत्तर समशीतोष्ण प्रदेशात आढळणारी ही वेल [वलयिनी → महालता] हल्ली अमेरिका, यूरोप व ऑस्ट्रेलिया येथे मोठ्या प्रमाणात लागवडीत आहे. रोमन लोकांना ही वेल माहीतहोती व यूरोपातील काही भागांत नवव्या शतकापासून ती लागवडीतआहे. भारतात तिची प्रयोगादाखल लागवड केली गेली परंतु ती काश्मीरव चंबा येथे थोडीफार यशस्वी झाली, तर पंजाब व निलगिरी येथेअयशस्वी झाली.

 

हॉप वनस्पती सु. ८ मी. उंच वाढणारी, विभक्तलिंगी व दक्षिणावर्तीवेल आहे. तिचे खोड खरबरीत असून मुळे जमिनीत सु. ५ मी.पर्यंतवाढतात. ती चिकाळ नसल्यामुळे तिचा अंतर्भाव मोरेसी कुलात होत नाही [→ अर्टिकेर्सी]. क्वचित स्त्री-पुष्पे व पुं-पुष्पे एकत्र असलेल्या वेली आढळतात. हिच्या फांद्या कोनीय व लवचिक असून पाने संमुख, सोपपर्ण व दोन प्रकारची आढळतात. वरची पाने लहान अंडाकृती किंवा हृदयाकृती, दातेरी व काहीशी काटेरी खालची पाने मोठी, ३–५ खंडितकडा असलेली असतात. पुं-पुष्पे लहान, हिरवट-पिवळी असून ५–१५ सेंमी. लांबीच्या परिमंजरीवर येतात फुलात संदले ५ व केसरदले ५ असतात. पक्व स्त्री-फुलोऱ्यास हॉप म्हणतात. ते नतकणिश (शंकूसारखे) असतात. प्रत्येक स्त्री-फुलोऱ्यात २.५ – ५ सेंमी. लांबीचा नागमोडी केसाळ अक्ष असून त्यावर अनेक समोरासमोर व एकाआड एक पार्श्विक अक्ष असतात. याच्या तळाशी छदांची जोडी व वरच्या बाजूस चार सच्छदक स्त्री-पुष्पे असतात. छदे व छदके यांवर पिवळे प्रपिंडीय केस असूनत्यांना हॉप-मील व लुप्युलीन अशी इंग्रजी नावे आहेत. किंजपुटाला संवर्ताने पूर्णपणे वेढलेले असून त्यावर दोन लांब किंजल्क असतात. पक्व शंकू आयत किंवा लंबगोल आकाराचे, विरल, हलके, पिवळट, सु. ५ सेंमी. लांब, प्रपिंडयुक्त व सुगंधी असतात. फुले जुलै-ऑगस्टमध्ये येतात. फळ शुष्क व एकबीजी (कृत्स्नफल ) बीजात गर्भाचे वेटोळे असतात. संपूर्ण वनस्पतीवर ग्रंथी (प्रपिंडे) असून फळामध्ये त्या जास्त प्रमाणात असतात आणि त्या लुप्युलीन स्रवतात. 

 

हॉप या वनस्पतीसारखी दिसणारी ह्युम्युलस जॅपोनिकस ही जाती मूळची जपानमधील असून तेथे व चीनमध्ये ती फक्त शोभेकरिता लावतात. हिची पाने ५-७ खंडित कडा असलेली मुख्य शिरेवर कडक लव व वृंत पानापेक्षा मोठा असतो तर ह्यु. लुप्युलसमध्ये पाने ३-५ खंडित कडा असलेली व त्यावर मऊ लव असून वृंत पानापेक्षा लहान असतो, हा दोन्ही जातींतील मुख्य फरक आहे.

 

हॉप वनस्पतीचा मद्य तयार करण्यासाठी उपयोग सु. १२०० वर्षांपूर्वीपासून चालू असावा. तिच्यामध्ये बाष्पनशील तेल असून ते ऊर्ध्वपातनाने काढतात. प्रथम ते पिवळे व नंतर लालसर पिंगट होते. त्याला चीजसारखा वास येतो. त्याचा मुख्य उपयोग ‘बिअर’ नावाच्या मद्यात करतात. बिअरला हॉपमुळे विशिष्ट वास, चव व सूक्ष्मजंतूंपासून संरक्षण प्राप्त होते. शिवाय इतर काही पेये, खनिज जल, अत्तरे, धावन द्रव, फेस क्रीमे व तंबाखू यांतही हे तेल घालतात. हॉप कडू , शामक, आस्वापक (झोप आणणारे), पौष्टिक, वेदनाहारक व मूत्रल असून काही औषधे व पोटिसातही ती वापरतात.

 

हॉप वनस्पतीमध्ये ओलावा ६–१२%, रेझिने ११–२१%, बाष्पनशील तेल ०.२–०.५%, टॅनिने २–४%, प्रथिने १३–२४%, ग्लुकोज व फ्रुक्टोज ३-४%, पेक्टिने १२–२४%, राख ७–१०%, शिवाय कार्बॅानिक अम्ले, फ्लॅव्होनॉइडे (झँथोह्युमॉल) व रंगद्रव्ये इ. घटक असतात. झँथोह्युमॉलामधील प्रतिऑक्सिडीकारक गुणधर्मामुळे ते कर्करोग प्रतिरोधक म्हणून उपयुक्त असते. तसेच हॉपमध्ये आल्फा अम्ले (ह्युम्युलोन, कोह्युम्युलोन व ॲड्ह्युम्युलोन) ९५% व बीटा अम्ले (कोल्युप्युलोन, ल्युप्युलोन व ॲड्ल्युप्युलोन) असतात. मद्यनिर्मितीत हॉप वनस्पतीचा सुकविलेला स्त्री-फुलोरा किंवा अर्क वापरतात. कारण त्यामध्ये लुप्युलीन हे प्रमुख मादक द्रव्य असते.

 

हॉप वनस्पतीच्या लागवडीकरिता विविध प्रकारची जमीन चालते. तथापि खोल, दमट व निचऱ्याची सकस जमीन (पीएच् मूल्य ६–७.५) चांगली उन्हाळी तापमान सु. १५.५? से. आणि सोसाट्याचा वारा व अतिपर्जन्य यांपासून संरक्षण आवश्यक असते. स्त्री-वेलाच्या मूलक्षोडाचे तुकडे लावून चांगली लागवड होते. काश्मीरमधील लागवडीत हेक्टरी ९०–११० किग्रॅ., तर परदेशात दर हेक्टरी २००–२४० किग्रॅ. उत्पन्न होते.

 

हॉप वेलीच्या खोडापासून काढलेल्या धाग्यांचा उपयोग दोर व कापड बनविण्यास करतात. रशियात तिचा अर्क केशधावन म्हणून उपयोगात आहे. मद्याच्या कारखान्यातील चोथ्याचा उपयोग चारा व खत म्हणून करतात. तिचे मूलक्षोड खाद्य आहे. पारंपरिक उपयोगामध्ये वातशूळ, निद्रानाश, व्रण, बृहदांत्रशोथ, शीघ्रकोपित्व, डोकेदुखी, अजीर्ण इत्यादींवर हॉप उपयुक्त आहे.

 

हॉप वनस्पतीस चूर्ण-भुरी, तंतु-भुरी, काळी-भुरी, मूळकूज, कित्येक विषाणू, क्राऊन गॉल व अनेक कीटक यांच्यापासून धोका होऊ शकतो. योग्य अशी कवकनाशके व कीटकनाशके वापरून तो कमी करतायेतो. [→ कवकनाशके कीटकनाशके].

 

पहा : कॅनाबिनेसी.

 

परांडेकर, शं. आ. कुलकर्णी, सतीश वि. 

 

हॉप
हॉप