सायली : (लॅ. जॅस्मिनम कॅलोफायलम, कुल-ओलिएसी). या अतिसुंदर फुलझाडाचे म्हणजे झुडुपासारख्या वेलीचे मूलस्थान निलगिरी असून तिचा प्रसार गुजरात, महाराष्ट्र् (विशेषतः कोकण), अन्नमलई व तिन्नेवेल्ली टेकड्या येथे असून ती सस.पासून सु. १,३३० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशांत आढळते. अलीकडे भारतात शहरांतील बागांत व उद्यानांत सायलीचा बराच प्रसार झालेला आहे. पाने समोरासमोर किंवा एकाआड एक व त्रिदली असतात. दले अंडाकार, चिवट व चकचकीत असतात. फुले पांढरी शुभ्र, द्विलिंगी, नियमित, सु. २.५ सेंमी. व्यासाची असून पुष्पमुकुट अपछत्राकृती (समईसारखा) असतो. पाकळ्या दहा असून साधारण वर्षभर सुवासिक फुले येतात. मृदु फळे लहान गर्द, जांभळी व द्विभक्त (अंशतः विभागलेली) असतात.

जाई, जुई, चमेली, कुसर इ. जाती सायलीच्या जॅस्मिनम प्रजातीतील असून एकूण सु. ३०० जातींपैकी सामान्यतः ४० जाती भारतात आढळतात. या वनस्पतीची सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ ओलिएसी त (पारिजातक कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात.

सायलीच्या लागवडीसाठी छाटकलमे, दाबकलमे किंवा मुनवे (धुमारे)वापरतात. तिला सर्व प्रकारची जमीन चालते. उन्हाळ्याच्या सुरुवातीस ती खणून किंवा नांगरून मऊ भुसभुशीत करतात व तीत चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत घालतात. क्वचित रासायनिक खते देतात. तयार रोपे पावसाळ्याच्या सुरुवातीला लावतात. वेल मांडव, भिंती, ओवऱ्या किंवा लगतच्या झाडावर चढवितात. फुलांचा मुख्य बहर जून–सप्टेंबरमध्ये येतो. ही फुले सायंकाळी उमलतात. वर्षातून एकदा छाटणी करून, जमीन नांगरून खते देतात व नियमित पाणी देतात. गरजेप्रमाणे कवकनाशके व कळी छिद्रकाच्या नियंत्रणासाठी आर्सेनेट हे कीटकनाशक फवारतात.

चौधरी, रा. मो. जमदाडे, ज. वि.