प्रकाष्ठ : (इं. वुड लॅ. झायलेम, हॅडोम). सर्व उच्च दर्जाच्या (वाहिनीवंत म्हणजे पाणी व अन्नरस यांची ने-आण करणारे शरीरघटक असलेल्या) वनस्पतींत पाण्याची ने-आण करण्यास व शरीराला मजबुती आणण्यास ज्या अनेक कोशिका (पेशी), ऊतके (कोशिका-समूह) व इतर शरीर घटकांचा उपयोग केला जातो त्या सर्वांचा अंतर्भाव ‘प्रकाष्ठ’ या नावाच्या जटिल (गुंतागुंतीच्या) ऊतक तंत्रात (कोशिका-समूहांच्या व्यूहात) केला जातो. प्रकाष्ठ व ⇨ परिकाष्ठ (अन्नरसाची वाहतूक करणारा व्यूह) मिळून वाहक ऊतक तंत्र [⟶ वाहक वृंद] बनते. अनेक विविध, सजीव व निर्जिव कोशिकांचा प्रकाष्ठात समावेश होतो. त्यांची संरचना व कार्ये भिन्न असली, तरी त्यांचे कोशिकावरण (भित्ती, भिंती) जाड असल्यामुळे अश्मीभवनात (शिळारूप धारण करण्याच्या क्रियेत) चांगले टिकते. त्यामुळे प्राचीन वनस्पतींच्या जीवाश्मांची (शिळारूप अवशेषांची) संरचना आज चांगली कळू शकते. वाहिका (वाहक कोशिका), वाहिन्या (नळीसारखे घटक), दृढसूत्रे (ताठर घटक) व ⇨ मृदूतक (नरम कोशिकांचा समूह) प्रामुख्याने प्रकाष्ठात आढळतात त्यांपैकी आधार देणे (मजबुती देणे) हे कार्य वाहिका व दृढसूत्रे करतात, तर पाण्याची वाहतूक वाहिका व वाहिन्या करतात. मृदूतकाचे कार्य अन्नाचा साठा करण्याचे असते. बहुतेक घटकांच्या आवरणात काष्ठीर (लिग्निन) हे काष्ठद्रव्य कमीअधिक प्रमाणात असते. अवयवांच्या पूर्णावस्थेत त्यातील प्रकाष्ठाचा बहुतेक भाग मृत असतो.

वाहिका : ह्या कोशिका लांब व दोन्हीकडे टोकदार असून पूर्ण विकसित अवस्थेत यांत प्राकल (जीवद्रव्य) नसतो. ह्यांच्या पहिल्या कोशिकावरणावर (प्राथमिक भित्तीवर) आतून विविध स्वरूपाचे व जाडीचे द्वितीयक थर बसतात ते वलयाकृती (कंकणाकृती किंवा गोल कढ्यासारखे), सर्पिलाकार (मळसूत्रासारखे), जालरूप (जाळीसारखे) व खातांकित (अनेक विविध प्रकारच्या खाचा असलेले) असतात आडव्या व लांबट खाचांची उभी रांग असते त्या वेळी श्रेणीरूप म्हणतात (आ.२). वाहिकांची लांबी प्राथमिक प्रकाष्ठात सु. १-१·५ मिमी. ते द्वितीयक प्रकाष्ठात ०·५ मिमी. असते.

वाहिन्या : वाहिकांत व वाहिन्यांत फरक इतकाच की, जेथे दोन घटक (कोशिका) परस्परांवर उभे असतात, तेथे घटकांच्या टोकास असलेल्या आडव्या भित्तीवर एक मोठे छिद्र [आ. १ (इ)] किंवा अनेक सूक्ष्म छिद्रे [आ. ३ (आ)] असतात व ह्या सर्व घटकांची मिळून लांब वाहिनी बनते वाहिन्या काही सेंमी.पासून एक मी.पर्यंत (क्वचित अधिक) लांबीच्या आढळतात.

वाहिन्यांवरही वर उल्लेखिलेले विविधरूप द्वितीयक जाडीचे थर असतात. असा जाडीचा थर कोशिकेच्या आतील भित्तीच्या पृष्ठावर पूर्णपणे पसरून राहिल्यास दोन शेजारच्या घटकांत द्रव्यविनिमय होण्यास विरोध होतो म्हणून काही भाग जाड न होता पातळ राहतो व तेथे खाच (छिद्र) बनते. दोन घटकांतील विरुद्ध बाजूच्या दोन खाचांमधील (खातद्वयातील) पातळ प्राथमिक भित्तीस ‘खात-पटल’ म्हणतात व त्यातून द्रव्यविनिमय चालू राहतो. कधीकधी या पटलाच्या दोन्ही बाजूंस खाचा असण्याऐवजी एकाच घटकात खाच असते. दोन जवळच्या घटकांमधील समाईक, पातळ, उभ्या प्राथमिक भित्तीवर ज्या वेळी खाचेभोवती द्वितीयक जाडीचा काही भाग (थर) न चिकटता लोंबता राहतो त्या वेळी भित्तीच्या पृष्ठभागावर खाचेभोवती त्याचे एक वर्तुळ दिसते, म्हणून या खाचेला ‘अनुलिप्त खाच’ म्हणतात छिद्राच्या आकाराप्रमाणे अनुलिप्त खाचांत अनेक प्रकार आढळतात. वर्तुळ (वलय) नसल्यास ती ‘साधी खाच’ असते [आ. १ (ई)]. वाहक घटकांतून पाणी जोराने जातेवेळी ते अनुलिप्त खाचेतून आत जाऊन खात-पटलावर दाब देते व पटल फाटण्याचा धोका संभवतो तो टाळण्यासाठी पटलावर जाड चकतीप्रमाणे (दोन्हीकडे खाच असल्यास) सेल्युलोजाचा जाड फुगीर लेप असतो व त्याला ‘स्थूलक’ म्हणतात. अनुलिप्त खाचा गोल किंवा चिरीप्रमाणे लांबट पण रुंद असतात. काही

आ. १. प्रकाष्ठ कोशिका : (अ) दृढ सूत्र : (१) साधी खाच (आ) वाहिका : (१) अनुलिप्त खाच (इ) वाहिनी घटक : (१) अनुलिप्त खाच, (२) मोठे छिद्र (ई) मृदूतक कोशिका (आडवा छेद) : साधी खाच (खालील बाजूस दाखविलेली) : (१) आडवा छेद, (२) पृष्ठदृश्य.वाहिकांवर आडव्या व लांबट खाचांची उभी रांग असते गोल किंवा लंबगोल खाचा एकट्या व आडव्या किंवा तिरप्या रांगांत असतात. वाहिन्यांच्या घटकांतील टोकाच्या पडद्यावरची भोके प्राथमिक भित्तीच्या विघटनाने पडतात. अशा छिद्रित पट्टिकांवर एक मोठे किंवा अनेक लहान छिद्रे असतात. सर्वांत प्रारंभिक पट्टिका तिरप्या असतात व त्यांवरच्या खाचा लांबट, भरपूर व आडव्या ओळीत असतात. फक्त एकच मोठे छिद्र असते ते विशेषत्त्व पावलेल्याचे लक्षण होय. वाहिका व वाहिन्या

आ. २. वाहक घटक : (१) मृदूतक, (२) वलयाकृती, (३) सर्पिलाकार, (४) श्रेणीरूप, (५) खातांकित (अनुलिप्त खाचा असलेला).

व अवयवांच्या लांबीशी समांतर राहून पाणी व विद्रुत (विरघळलेल्या) खनिजांचे जलद स्थानांतरण करतात. हे दोन्ही घटक जसजसे जून होतात तसतशा त्यांच्या भित्ती अधिक जाड होतात, पोकळ्याही भरून जातात व त्यांचे कार्य फक्त मजबुती वाढविण्याचे असते.

दृढसूत्र : ही वाहिकेपेक्षा अधिक निमुळती कोशिका असून तिच्यावरील खाचा साध्या असतात हिचे कोशिकावरण अधिक जाड असून कोशिकांत प्राकलाचे अस्तित्त्व अधिक काळ टिकते वाहिकांपासूनच ह्या घटकांची उत्क्रांती झाली असून ह्या दोन्हींना जोडणाऱ्या दुव्यास ‘दृढसूत्र-वाहिका’ म्हणतात. ह्यांमध्ये प्राकलाची विभागणी होऊन ‘पटलित (अनेक पडदे असलेले) सूत्र’ बनते.

मृदूतक : ह्या ऊतकाच्या उभ्या छेदात कोशिका परस्परांवर उभ्या रचलेल्या आढळतात (आ. २). निकाष्ठ-किरणांच्या (भेंडातील किरणांसारख्या संरचनेच्या) क्षेत्रातील मृदूतकात त्यांची रुंदी त्रिज्येच्या दिशेत अधिक असते. कोशिकावरणे पातळ किंवा साधारण जाड असून त्यांवर साध्या खाचा व कोशिकांत अनेकदा स्टार्च, स्फटिक, टॅनीन, रंग, तेल इ. पदार्थ साठून राहतात. तसेच त्रिज्येच्या दिशेत ह्या कोशिका अन्नाचे व पाण्याचे स्थानांतरण करतात.

आ. ३. (अ) अनुलिप्त खाच : (अ१) आडवा छेद (अ२) पृष्ठ दृश्य : (१) प्राथमिक भित्ती, (२) द्वितीयक थर, (३) खात पटल, (४) स्थूलक, (५) खात (खाच, छिद्र) (आ) वाहिनीचा भाग : (१) छिद्रित पट्टीका.

प्राथमिक व द्वितीयक प्रकाष्ठ : गर्भाच्या विकासात प्रकाष्ठाचा उदय फार उशिरा होतो. वनस्पतीच्या मूळ आणि खोड यांच्या टोकांस असलेल्या ⇨विभज्येपासून प्रकाष्ठ व परिकाष्ठादि ऊतके प्रभेदनाने (फरक पडत जाऊन) बनत असतात यामुळेच वनस्पतीची प्राथमिक वाढ होते त्यातल्या प्रकाष्ठाला ‘प्राथमिक’ म्हणतात बहुतेक सर्व ओषधीय [⟶ ओषधि] वनस्पतींत प्राथमिक प्रकाष्ठाचाच भाग अधिक असतो. बहुतेक बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या) द्विदलिकित (ज्यांच्या गर्भात दोन दले असतात अशा) वनस्पती, प्रकटबीजी व काही एकदलिकित वनस्पती यांमध्ये वाढत्या वयाबरोबर होणाऱ्या शरीरांतर्गत बदलांत नवीन ⇨ ऊतककरापासून द्वितीयक प्रकारचे प्रकाष्ठ व परिकाष्ठ यांची निर्मिती व प्रमाण वाढत जाते [⟶ शारीर, वनस्पतींचे]. प्राथमिक प्रकाष्ठातील ‘आदिप्रकाष्ठ’ हा भाग प्रथम बनतो त्या वेळी त्या अवयवाची लांबी वाढत असते व त्यातील कोशिकांच्या भित्तींची जाडीही वाढत असते वाढ जोराने झाल्यास काही भाग तुटतो. आदिप्रकाष्ठाची लांबी पूर्ण वाढल्यानंतर ‘उत्तर’ प्रकाष्ठाची निर्मिती व वाढ होते. त्यातील कोशिकावरणे प्रसरणशील नसतात. पातळ किंवा जाड आवरणाच्या मृदूतक-कोशिका प्राथमिक प्रकाष्ठात असतातच शिवाय वाहिका, वाहिन्या, दृढसूत्रे इ. सर्व किंवा यांपैकी काही घटक भिन्न जातींप्रमाणे आढळतात. प्रकटबीज वनस्पतींत [⟶ वनस्पति, प्रकटबीज उपविभाग] व वाहिनीवंत अबीजी वनस्पतींत [⟶ वनस्पति, वाहिनीवंत अबीजी विभाग] वाहिन्यांचे अस्तित्त्व अपवादात्मक आढळते, तर आवृतबीज वनस्पतींत [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] वाहिन्यांचे प्रमाण खूपच जास्त असते. विविध प्रकारचे लाकूड, रेझिने, गोंद, रंगद्रव्ये, तेले इ. वस्तू प्रकाष्ठापासून उपलब्ध होतात. बहुधा जून झालेल्या लाकडात या संचित पदार्थांचे प्रमाण अधिक असते. खाद्यपदार्थांत येणाऱ्या भाज्यांत कोवळेपणी प्रकाष्ठ कमी व मृदूतक जास्त असते पण त्याच भाज्या जून झाल्यावर त्यातील अधिक प्रकाष्ठामुळे किंवा सूत्रल (धागेयुक्त) भागांमुळे त्या अखाद्य होतात.

पहा : ऊतके, वनस्पतींतील कोशिका दृढोतक परिकाष्ठ मृदूतक विभज्या शारीर, वनस्पतींचे.

संदर्भ : 1. Eames, A. J. MacDaniels, L. H. An Introduction to Plant Anatomy, Tokyo, 1953.

2. Esau, K. Plant Anatomy, New York, 1965.

परांडेकर, शं. आ.