हंडिबेत : (हंडिबेट इं. केन लॅ. कॅलॅमस थ्वाइटेसी कुल–पामी ). ⇨ वेत या वनस्पतीप्रमाणेच हंडिबेतचे मोठे वेल असून तेमोठ्या वृक्षांच्या शेंड्यांपर्यंत पोहोचतात. श्रीलंका, निलगिरी पर्वत, सुपा, येल्लापूर, गोव्याचा किनारी प्रदेश इ. ठिकाणी याची वाढ चांगली होते.याचे खोड सु. ४ सेंमी. जाड असून सु. ३० मी.पर्यंत उंच वाढते. पाने संयुक्त, पिसासारखी, टोकदार, काटेरी कडांची, हिरवी व तजेलदार असतात. देठ, दले इत्यादींवर टोकदार काटे असतात. फुले एकलिंगीपुं-पुष्पाचे स्थूलकणिश सु. ६ मी.पर्यंत लांब व बारीक असून टोकासलांब काटेरी प्रकेसल असते स्त्री-पुष्पाच्या स्थूलकणिशाच्या फांद्या जाड असतात. फुले लहान असून फेब्रुवारी-मार्चमध्ये येतात. फुलांची संरचना व वनस्पतीची इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ पामी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. फळ सु. २.५ सेंमी. लांबट गोल व परिदलवेष्टित असून त्यावर चंचू असते. या वेलाचा उपयोग हातातील काठ्या, परड्या, चटया, सजावटी सामान इत्यादींकरिता होतो.

पाटील, शा. दा.