एल्म : (लॅ. उल्मस कुल-उल्मेसी). ह्या द्विदलिकित फुलझाडांच्या वंशात सु. १८ – २० जाती येतात. त्या सर्व पानझडी वृक्ष आहेत. उत्तर गोलार्धाच्या समशीतोष्ण कटिबंधात त्या भरपूर आढळतात. तथापि काही उष्णकटिबंधात उंच ठिकाणीही सापडतात. हिमालय, आसाम, नेपाळ, बलुचिस्तान इ. प्रदेशांत ४–५ जाती आहेत. यांची पाने साधी, एकाआड एक व दंतुर. फुलोरे मंजरी प्रकारचे व पानांच्या बगलेतून निघतात व त्यांवर लहान, सहज न दिसणारी फुले, पाने येण्यापूर्वी किंवा हिवाळ्याच्या आरंभी येतात. फुलांना पाकळ्या नसून संवर्त घंटेसारखा, चार ते नऊ संदलांचा असतो केसरदले तितकीच ऊर्ध्वस्थ किंजपुटात एकच कप्पा [→ फूल] फळ अंडाकृती व सपक्ष (बिजाच्या बाह्य आवरणाचा पंखासारखा विस्तार असलेले) असते. ह्या वंशातील अनेक जाती शोभदायक म्हणून रस्त्यांच्या दुतर्फा व बागेतून लावतात. उत्तम लाकडाकरिता काही जाती प्रसिद्ध आहेत. ब्रिटनमध्ये इंग्‍लिश एल्म, विच एल्म, कार्निश एल्म व संकरज डच एल्म प्रसिद्ध आहेत व अमेरिकेत व्हाइट एल्म, रॉक एल्म व स्लिपरी एल्म या जाती सामान्यतः आढळतात.

अमेरिकेन एल्म :(१)फांदी, (२)फुले, (३)फळे

अमेरिकेन एल्म : (व्हाइट एल्म लॅ. उल्मस अमेरिकाना कुल-उल्मेसी). सु. ४० मी. उंच वाढणाऱ्या या भव्य व शोभादायक वृक्षाचा प्रसार अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील रॉकी पर्वताच्या पूर्वेच्या सर्व राज्यांत व दक्षिण कॅनडात आहे. तो बहुधा उंच ठिकाणी व ओलसर जमिनीत वाढतो. देठाजवळचा अंडाकृती पात्याचा भाग दोन्हीकडे सारखा नसतो. साल फिकट करडी, फांद्या साधारणत: लोंबत्या व कोवळे भाग लवदार असतात. खोडाचा व्यास १·८५ – ३·१० मी. असतो. करड्या रंगाच्या खवल्यांनी झाकलेल्या फुलांच्या कळ्या पर्णकिणांच्या (पानांच्या व्रणांच्या) बाजूस हिवाळ्याच्या आरंभी येतात. फुलोरे, मंजरीसारखे किंवा झुबक्यासारखे असून फुले लहान व द्विलिंगी फळ शुष्क, सपक्ष कृत्स्‍न (म्हणजे आपोआप न फूटणारे व बाह्य आवरणापासून अलग असलेले एकच बीज असणारे) व टोकास खाचदार असून कडेवर लव असते. लाकूड जड व कठीण असून धक्के सहन करू शकते. खुर्च्या, पेट्या, खोकी, पिपे, जहाजबांधणी, खेळाचे साहित्य इत्यादींकरिता ते वापरतात. झाडे रस्त्याच्या कडेने दुतर्फा लावतात. स्लिपरी एल्म (उल्मस फल्वा ) ची अंतर्साल बुळबुळीत व शोथशामक (दाहयुक्त सूज कमी करणारी) असते.

जमदाडे, ज. वि.