चिकरी : (१) फांदी, (२) पुं-पुष्प, (३) स्री-पुष्प.

चिकरी : (इं. बॉक्सवुड, बॉक्स लॅ. बक्सस वॅलिचियाना कुलबक्सेसी). बॉक्स या इंग्रजी शब्दाचा अर्थ पेटी आणि बॉक्सवुड म्हणजे पेटीचे लाकूड असा अर्थ सामान्यपणे रूढ असला, तरी ही दोन्ही नावे बक्सस  या लॅटिन नावाने ओळखल्या जाणाऱ्या वनस्पतींच्या वंशातील जातींना लावतात. कारण त्यांचा मुख्य उपयोग विशिष्ट प्रकारच्या लाकडाकरिता (बॉक्सवुड) करतात. शिवाय काही जाती बागेतून कुंपणाकरिता शोभेकरिता लावतात. बक्सस  वंशातील सु. तीस जातींचा प्रसार मध्य व दक्षिण युरोप, मध्य अमेरिका, उत्तर आफ्रिका, आशिया, वेस्ट इंडीज इ. प्रदेशांत आहे. भारतात फक्त दोन जाती (बक्सस वॅलिचियाना  व ब. पॅपिलिओसा ) आहेत. चिकरी वृक्ष (ब. वॅलिचियाना ) हिमालयाच्या पश्चिम व मध्य उतरणीवर (१,३००–३,००० मी. उंचीवर), पंजाबात आणि भुतानमध्ये आढळतो. हा एक लहान सदापर्णी वृक्ष असून कोवळे भाग लवदार असतात. जून पाने साधी, समोरासमोर, चिवट, चकचकीत व तीन ते दहा सेंमी. लांब असतात. फुले एकलिंगी पण एकाच झाडावर, पानाच्या बगलेत, आखूड मंजऱ्यांवर गर्दीने येतात. ती लहान, सुगंधी व पिवळट असतात. या वृक्षाचे लाकूड दृढ, कठीण, टिकाऊ आणि हस्तिदंतासारखे असते. चित्रकला, गणित व संगीत यांना लागणारी लाकडी साधने, कपाटे, लहान पेट्या, फण्या, जडावाचे काम, कातीव आणि कोरीव काम इत्यादींस हे उत्तम असते. ब. बॅलिरिका  या जातीपासून ‘टर्की बॉक्सवुड’ मिळते. ‘व्हेनेझुएलन बॉक्सवुड’ हे अन्य वंशातील झाडाचे लाकूड वरील लाकडा ऐवजी वापरतात. शिवाय पातळ तक्ते, कांड्या (बॉबिन), रिळे, धोटे इ. त्याचे बनवितात..सेंपरव्हिरेन्स (सामान्य बॉक्स) हा वृक्ष यूरोपीय असून अमेरिकेत फार पूर्वीपासून लावलेला आढळतो. तो काही शतके वाढत राहतो. त्याचे अनेक प्रकार लागवडीत असून कमीअधिक प्रमाणात त्यांचे उपयोग वर दिल्याप्रमाणे आहेत.

परांडेकर, शं. आ.