हीद : (हीथ) . उत्तर व पश्चिम यूरोप, इंग्लंड, स्कॉटलंड व वेल्स, अमेरिका (अ. सं. सं.) व दक्षिण आफ्रिका या प्रदेशांत हीद या नावाच्या ओसाड जमिनी असून त्यांना ‘हीथ’ हे इंग्रजी नाव दिले आहे. या जमिनीनिम्न प्रतीच्या असून त्यात वाळूचे प्रमाण मोठे व पोषक द्रव्ये फारकमी असतात. याच प्रकारच्या उंचीवरच्या क्षेत्रांना मूर म्हणतात. एरिकेसी कुलातील बहुतेक वनस्पती येथे उगवतात व वाढतात स्कॉटलंडमधील ‘हीदर प्रदेश’ व इंग्लंडमधील ‘हँटस्टीड हीद’ यांपैकी आहेत. मरुवासींची लक्षणे असणाऱ्या एरिका व कॅल्यूना या प्रजातीतील वनस्पती येथे प्रामुख्याने आढळतात. बहुतेकांना सुंदर फुले येतात व अनेकदा सर्वच वनश्री एका सुंदर फुलांच्या घन राशीप्रमाणे दिसते. स्थानिक लोक या वनस्पतींचा उपयोग विविध रीत्या करतात. या वनस्पती ओकच्या सालीबरोबर कातडी कमाविण्यास वापरतात. त्याचा कोवळा पाला गुरांना चारतात. ए. सिनेरिया ही जाती ग्रेट ब्रिटन व पश्चिम यूरोपमध्ये सामान्य असून तिच्या सूक्ष्म फुलांपासून भरपूर मकरंद मिळतो. स्कॉटिश व दक्षिण आफ्रिकी हीदरमधील फुलांचा मध (मकरंद) त्याच्या स्वादाबद्दल व गुणधर्माकरिता जगप्रसिद्ध ठरला आहे. [→ एरिकेलीझ]. 

 

मूर : बहुधा उंचीवरच्या प्रदेशातील मोठ्या मैदानांना ही संज्ञा देतात. ही मैदाने दोन प्रकारची आहेत : (अ) हीदर व तत्सम वनश्री असलेली, परंतु शुष्क मैदाने दखील अधिक सामान्यपणे आढळतात (आ) अम्लीयपीटयुक्त रुतणासारखी ओली मैदाने. मूर प्रदेश व हीद प्रदेश हे समानार्थी शब्द मानतात. हीदप्रमाणेच मूर प्रदेशांत एरिकेसी कुलातील एरिका व कॅल्यूना प्रजातीतील वनस्पती अमेरिका व यूरोपमध्ये आणि इतर प्रजातींतीलवनस्पती दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळतात. हीदप्रमाणेच ही मैदाने ओसाड असून त्यांची सुधारणा फारशी सोपी नसते. 

पहा : दलदल पीट मरुवनस्पति. 

 

बालकृष्णन्, एम्. एस्. (इं.) जमदाडे, ज. वि. (म.)