जीवसंहति : (लॅ. बायोम ). पृथ्वीवर निसर्गतः व परंपरेने स्थिरावलेले अनेक वनस्पतींचे मोठे व भिन्न समुदाय आढळतात त्याबरोबरच सोयीस्करपणे त्यातच सदैव आढळणारे काही  प्राणीही  आढळतात. ह्या दोन्ही  प्रकारच्या सजीवांच्या  अशा एकत्रित समुदायाला ‘जीवसंहती ’ ही संज्ञा वापरतात. अशा भिन्न समुदायांची तुलना केल्यास असे आढळते की, त्या प्रत्येकात ठळकपणे दिसणारा फरक त्यातल्या प्रभावी वनस्पतींच्या स्वरूपावर [उदा., वृक्ष, क्षुप (झुडूप) ⇨षधी  यांचे भिन्न स्वरूप व संख्या] व त्यांच्याशी संबंधित असलेल्या प्राण्यांवर अवलंबून असतो तसेच विशिष्ट हवामान व जमिनीचा प्रकार (रेताड, मुरमाड, खडकाळ, दलदल इ.) ह्यांमुळे अशा भिन्न समुदायांत (जीवसंहतीत) फरक पडतात. १९१६ मध्ये फ्रेड्रिक एडवर्ड क्लेमेंट्स यांनी प्रथमतः बायोम  ही लॅटिन संज्ञा प्रचारात आणली. जमिनीवर स्थिरावलेल्या अनेक समुदायांत वनस्पतींचा प्रभाव मोठा असला, तरी प्राण्यांचाही  प्रभाव महत्त्वाचा असतो. ही गोष्ट पटली असल्याने प्राण्यांचा अंतर्भाव करण्याकरिता पूर्वीच्या ‘वनस्पति-समावासा’ची [→ परिस्थितिविज्ञान] व्याप्ती वाढवून जीवसंहती (बायोम ) ही संज्ञा देण्यात आली. क्लेमेंट्स व शेपर्ड यांनी (१९३९) या कल्पनेप्रमाणे काही सागरी समुदाय ओळखले आहेत, परंतु ते सर्वमान्य नाहीत.

कोणत्याही  जीवसंहतीतील वनस्पती व प्राणी जीवनार्थ परस्परांवर अवलंबून तर असतातच, शिवाय हे दोन्ही घटक हवामानादी बाह्यपरिस्थितीशी सतत जमवून घेण्याच्या प्रयत्नात असतात. उदा., ⇨परागण  व फळे आणि बीजांचे विकिरण (प्रसार) ही  वनस्पतींची गरज प्राणी भागवितात व त्याचा मोबदला म्हणून प्राण्यांना मध, फळे (अन्न) आणि आसरा (संरक्षण) ही वनस्पतींकडून मिळतात. जीवसंहतीचे अस्तित्व बव्हंशी त्यातल्या वनस्पती व प्राणी यांच्या ⇨सहजीवनावर अधिष्ठित असते. विशिष्ट हवामानातच गवती राने आढळतात व त्याच वनस्पति-समावासात गवे, रानडुकरे, हरणे, ससे, झीब्रे हे तृणभक्षक प्राणी मुख्यतः आढळतात. आपल्याकडे घनदाट जंगलात माकडे, विविध पक्षी व अस्वले, कोल्हे, हत्ती, वाघ, सिंह इ. वनस्पतींवर किंवा प्राण्यांवर उपजीविका करणारे  प्राणी असतात. उ. अमेरिकेतील कुरणे व उ. ध्रुवाजवळचा वृक्षहीन टंड्रा प्रदेश ह्या मोठ्या जीवसंहती होत. प्रत्यक्ष व्यवहारात जीवसंहतीची ओळख पूर्ण विकास पावलेल्या (चरम) स्थितीतच होत असली, तरी  जीवसंहती ही संज्ञा अंतिम अवस्थेत पोहोचण्याच्या मार्गावर असलेल्या समुदायांनाही लावता येते. मनुष्याने फारशी ढवळाढवळ न केलेल्या  टंड्रा किंवा उत्तरेतील शंकुमंत (कॉनिफर) वनांना त्यांच्यातील विशिष्ट व प्रभावी वनश्री व मोठे प्राणी यांमुळे ओळखणे सोपे जाते. जीवसंहतीचे नामाभिधान तीतील प्रभावी  वनस्पती व प्राणी ह्यांच्या नावावरून करतात (उदा., ग्रामा तृण–काळवीट), किंवा  तीतील फक्त  प्रभावी  वनस्पति-समावासाच्या जीव-रूपावरून ठरवितात उदा., पानझडी वन, खुरटी झाडी इत्यादी.

जगात एकूण सात जीवसंहती बहुधा ओळखल्या जातात : टंड्रा, शंकुमंत वन, पानझडी वन, तृण प्रदेश, मरुस्थल, उष्ण कटिबंधीय वर्षारण्य आणि सामुद्रिक. यांपैकी पहिले सहा प्रमुख हवामान प्रकारच्या भूकटिबंधाप्रमाणे असून विषुववृत्ताला समांतर असे पट्टेच आहेत. प्रत्येकात विशिष्ट वनस्पति-समुदाय व प्राणि-समुदाय असून तेथील हवामानाशी ते समरूप आहेत. प्रत्येकात भिन्न देशांचे भिन्न भाग समाविष्ट आहेत.

पहा : परिस्थितिविज्ञान प्राणिभूगोल वनश्री वनस्पतिभूगोल.

संदर्भ :

1. Fuller, H. J. The Plant World, New York, 1955.

2. Kendeigh, S. C. Animal Ecology, Englewood Cliffs, N. J., 1961.

परांडेकर, शं. आ.