पिनी : (क. एण्णे, येण्णेमर; हिं. संप्रणी इं. मलबार मॅहॉगनी; लॅ. किंगिओडेंड्रॉन पिनॅटम, हार्डविकिया पिनॅटा ; कुल-लेग्युमिनोजी, उपकुल-सीसॅल्पिनिऑइडी). एका मोठ्या फुलझाडाचे (व्दिदलिकित आवृतबीज वनस्पतीचे) इंग्रजी नाव. यांच्या किंगिओडेंड्रॉन  वंशातील चार जातींपैकी एक भारतात, एक फिलिपीन्समध्ये, एक सॉलोमन बेटात व एक फिजी बेटात असा प्रसारआढळतो. हा एक सदापर्णी, भव्य, सु. ३० मी. उंची व सु. ४·२० मी. घेर असलेला वृक्ष असून भारतातील सह्याद्रीच्या जंगलात, त्रावणकोर, कर्नाटक, द. कारवार ते केरळ या भागांत आढळतो. साल गर्द तपकिरी किंवा हिरवट व चिवट असते. पाने संयुक्त व एकांतरित (एकाआड एक) असून त्यांवर ५–१० सेंमी. लांब, सवृंत (देठ असलेली), चिवट, आयत-अंडाकृती व टोकदारअशी ५–६ दले एकाआड एक असतात. फुले फार लहान व पांढरी असून त्यांच्या दाट मंजऱ्या मोठ्या परिमंजरीवर [→पुष्पबंध] येतात. संदले पाच संवर्तघंटाकृती पाकळ्या नसतात. केसरदले दहा किंजपुटात एकच बीजक असते [→फूल]. शिंबा (शेंग) लांबट, चिवट, टोकदार, २·५०–५ सेंमी. लांब व एका बीने पूर्ण भरलेली असते. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ लेग्युमिनोजी कुलात (शिंबावंत कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. पिनी : (१) फुलांसह फांदी, (२) फळांसह फांदी, (३) फूल, (४) फळाचा उभा छेद, (५) बी (रुजणारी).

या वृक्षाचे रसकाष्ठ मळकट पांढरे; मध्यकाष्ठ तांबूस व अधिक टिकाऊ, बळकट, जड व कठीण असून त्याला उत्तम झिलाई करता येते. पाण्याशी संपर्क आल्यास ते कुजत नाही; त्याचा उपयोग तुळया, पट्ट्या, वासे, छताच्या फळ्या, फरशी, सजावटी सामान, बिलियर्डची टेबले, कपाटे, तक्ते, जहाजबांधणी, प्लायवुड इ. कापीव व कातीव कामास केला जातो. खोडावर जमिनीपासून सु. एक मी. उंचीवर सु. २ सेंमी. व्यासाचे भोक पाडून त्यातून पाझरणारा रस जमा करतात त्यापासून तांबूस किंवा तपकिरी ओलिओरेझीन (कोपेब बाल्समसारखे बाल्सम) मिळते. रस पाझरणे थांबल्यावर भोकात पाचर मारून ते सु. दहा वर्षे बंद ठेवतात व नंतर पुन्हा भोक पाडून रस जमा करतात. सु. २·६० मी. घेराच्या निरोगी वृक्षापासूनसु. ५५ लि. ओलिओरेझीन मिळते. जास्तीतजास्त १८० लि. चा विक्रम आढळला आहे त्याचा उपयोग टर्पेंटाइन मिसळून लाकडास लावण्यास व्हार्निशप्रमाणे करतात. त्यापासून (ओलिओरेझिनापासून) ऊर्ध्वपातनाने (उष्णतेने वाफ करून व मग ती थंड करून घटक अलग करण्याच्या क्रियेने) मिळणाऱ्या बाष्पनशील (बाष्परूपाने उडून जाणाऱ्या) व रंगहीन तेलाचा उपयोग लवंग-तेलाऐवजी होतो; हे तेल तिखट-कडवट असून त्याला राळेसारखा वास येतो. तेलसाबणाकरिता वापरतात. तेल काढून घेतल्यावर राहिलेला अवशिष्टभाग अल्कोहॉलामध्ये विरघळून त्याचा उपयोग व्हार्निश बनविण्यास करतात. या वृक्षाच्या ओलिओरेझिनाचा उपयोग प्रमेहावर (परम्यावर) करतात; हत्तींच्या जखमांना लावण्यासही ते वापरतात. या वृक्षाला ‘केरळी-अंजन’ हे नाव दिलेले आढळते [→अंजन–२].

परांडेकर, शं. आ.