हरिणपदी : (चांदवेल हिं. बेरी, हरणपदी, हरणपग, हिरणपदी, हिरणखुरी क. नरंजी गु. वेलडी सं. भद्रबला, राजबला इं. डीअर्स फूट, फील्ड-स्मॉल बाइंडवीड लॅ. कॉन्व्हॉल्व्ह्युलस अर्व्हेंसिस कुल–कॉन्व्हॉल्व्ह्युलेसी). ह्या सामान्यपणे सर्वत्र (उष्ण, उपोष्ण व समशीतोष्ण कटिबंधांत) आढळणाऱ्या वेलीच्या कॉन्व्हॉल्व्ह्युलस प्रजातीत सु. ३७० जाती (विलिस यांच्या मते २५० जाती, लॉरेन्स यांच्या मते २०० जाती व सांतापाव यांच्या मते २५० जाती) समााविष्ट असून भारतात सु. १० जाती आढळतात. त्या सर्व ⇨ ओषधी, क्षुपे (झुडपे) किंवा सरपटत वाढणाऱ्या अथवा आधारावर चढत जाणाऱ्या वेली आहेत. हरिणपदीचीवेल जमिनीवर सरपटत वाढते, परंतु आधार मिळाल्यास वर चढत जाते.ती भारतात सर्वत्र व हिमालयात सस.पासून ३,००० मी. उंचीपर्यंततणासारखी वाढते. बहुधा, शेतजमिनीत ती सामान्यपणे आढळणारे तण म्हणूनच ओळखली जाते.

हरिणपदी वनस्पतीचे खोड बारीक व अनेकदा पिळवटलेले असून २ मी.पर्यंत वाढते. त्यावर खालच्या बाजूस खंडयुक्त व वरच्या बाजूस २.५–६.३ सेंमी. लांब, कमी-अधिक रुंद, तळाशी हृदयाकृती किंवा बाणासारखी, शेंड्याकडे गोलसर परंतु सूक्ष्म टोकाची, आयत किंवा अंडाकृती व एकाआड एक साधी पाने असतात. पानांच्या आकारावरून हरिणपदीहे नाव पडले असावे. फुले पानांच्या बगलेत लांब देठावर, एकेकटीकिंवा दोन-तीन, प्रत्येकी दोन सूक्ष्म छदांच्या जवळ मे – सप्टेंबरमध्ये येतात. ती द्विलिंगी, पंचभागी व सु. २ सेंमी. लांब, रुंदट नसराळ्यासारखी आणि पांढरी, गुलाबी किंवा लालसर असतात केसरदले पाच व भिन्न लांबीचे असून किंजपुटात दोन कप्पे असतात [→ फूल ]. फळ (बोंड)  ६–८ मिमी. व्यासाचे, गोलसर व स्फुटनशील असते. बिया सु. ४, गर्द तपकिरी किंवा करड्या काळसर आणि काहीशा त्रिकोनी व सु. ३ मिमी. लांब असतात. बियांची अंकुरणक्षमता २०–५० वर्षांपर्यंत टिकून राहते. एका वनस्पतीपासून सु. ५०० बिया मिळतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे व फुलाची संरचना ⇨ कॉन्व्हॉल्व्ह्युलेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात.

हरिणपदी (कॉन्व्हॉल्व्ह्युलस अर्व्हेंसिस) : पाने, फुले व कळ्यायांसहित फांदी.हरिणपदी वनस्पतीची मुळे व पाने औषधी आहेत. पंजाब व सिंधमध्ये जलाप नावाच्या राळेप्रमाणे जुलाबाकरिता देतात [→ निशोत्तर]. सुक्या मूलक्षोडात (जमिनीतील जाड खोडात) ४.९% रेझीन (राळे-सारखा पदार्थ) असते. बियांत स्थिर तेल (सु. ४.७%) असते. संपूर्ण वनस्पतीपासून काढलेल्या अल्कोहॉलाच्या अर्कात बाष्पीभवनानंतर १.५२–४ % रेझीनयुक्त पदार्थ असतो त्याला तीव्र तिखट (जहाल) चवअसते त्याची विरेचक (जुलाब करणारी) क्रियाशीलता जलापच्याएक-तृतीयांश असते. तुर्की लोक हरिणपदीचा वापर भाजीपाला म्हणून व मसाल्यासारखा करतात. अरबी लोक मुळे व पानांचा उपयोग रक्त-स्रावरोधक व सौम्य विरेचक म्हणून तसेच जखमा भरून येण्यासाठी वताप कमी करण्यासाठी करतात.

हरिणपदी वनस्पतीच्या कॉ. प्लुरिकॉलिस या दुसऱ्या जातीचा प्रसार उत्तर भारतात असून तिची भाजी करतात. कॉ. ग्लोमेरॅटस ही जाती सिंध, काठेवाड, राजपुताना व पंजाब येथे आणि कॉ. स्पायनोसस ही इराण व अफगाणिस्तान येथे आढळत असून दोन्ही रेचक (पोट साफ करणाऱ्या) आहेत. कॉ. स्कॅमोनिया (हिं. साक मुनिया) ही भूमध्य सामुद्रिक जाती भारतात काही ठिकाणी पिकविली जाते. या जातीपासून स्कॅमोनी मूळ, स्कॅमोनी रेझीन व स्कॅमोनी गम रेझीन ही द्रव्ये मिळतात. तिच्या मुळांत ८% रेझीन असते. बाजारातील रेझिने बव्हंशी सिरिया व आशिया मायनरातून आणलेली असतात व त्यात भरपूर भेसळ असते. स्कॅमोनी हे विरेचक असून त्याचा उपयोग जलोदर व सर्वांग (जल) शोफ (पाण्याच्या आधिक्याने आलेली सूज) यांवर करतात. ते तीव्र रेचक असल्याने त्यापासून शिसारी, मळमळ व ओकारी होते.

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. II, New Delhi, 1950.

            2. Kirtikar, K. R. Basu, B. D. Indian Medicinal Plants, Vol. III, New Delhi, 1975.

            3. Santapau, H. Henry, A. N. A Dictionary of the Flowering Plants in India, New Delhi, 1973.

परांडेकर, शं. आ.

हरिणपदी (कॉन्व्हॉल्व्ह्युलस अर्व्हेसिस)