हिंग : (हिंगडा हिं. हिंग त. पेरुन्नकायम म. कयाम क. इंगू, हिंगर सं. हिंगु इं. डेव्हिल्स डंग, ॲसाफेटिडा लॅ. फेरूला फेटिडा कुल-अंबेलिफेरी). फेरूला या प्रजातीतील चार-पाच बहुवर्षायू ओषधींच्या जातींपासून (फे. फेटिडा, फे. ॲलियासिया, फे. नार्थेक्स, फे. फेटिडिस्सिमा, फे. ॲसाफेटिडा इ.) हिंग हा पदार्थ मिळतो. लॅटिन शब्द फेरूला म्हणजे वाहक आणि ॲसाफेटिडा यामधील ॲसा म्हणजे चीक (क्षीर) व फेटिडा म्हणजे उग्र वास होय. या प्रजातीचा प्रसार भूमध्यसामुद्रिक प्रदेशापासून ते मध्य आशियापर्यंत झालेला असून भारतात तिच्या तीन जाती आढळतात. फे. फेटिडा, फे. ॲलियासियाफे. नार्थेक्स या जातींचा हिंग मिळविण्याकरिता प्रामुख्याने उपयोग करतात. हिंग हा स्वयंपाकात, मसाल्यात आणि औषधांत वापरला जाणारा परिचित पदार्थ आहे. पूर्वइराण व पश्चिम अफगाणिस्तानात हिंगाचे उत्पादन विशेषेकरून होते आणि तेथून त्याची इराणच्या आखातातून मुंबईमार्गे भारतात आयात होते. भारतात फे. ॲसाफेटिडा ही जाती पंजाब व काश्मीरमध्ये लागवडीत आहे.फे. नार्थेक्स ही जातीही काश्मीरमध्ये आढळते. रंगावरून हिंगाचे प्रमुखदोन प्रकार पडतात : (१) काबुली सफेद हिंग व (२) लाल हिंग.

 

हिंग (फेरूला फेटिडा) : (१) पानांफुलोऱ्यासहित वनस्पती, (२) नर फुलोरा (), (३) मादी फुलोरा (), (४) मादी फूल (), (५) नर फूल (), (६) फळ. 
 

फे. फेटिडा ही १.५–२ मी. उंचीची ओषधी वनस्पती मूळची इराण व अफगाणिस्तानातील आहे. हिची व इतर जातींची सामान्य शारीरिक लक्षणे अंबेलिफेरी कुलातील इतर वनस्पतींप्रमाणे (शेपू, कोथिंबीर, गाजर इ.) आहेत [→ अंबेलेलीझ]. हिची पाने सु. ४५ सेंमी. लांब, संयुक्त, फार विभागलेली, तळाशी खोडास वेढणारी, एकाआड एक, मोठी फुलोरा चवरीसारखा फुले लहान, द्विलिंगी, नियमित व पंचभागी नर फुलोरा व फुले हिरवट पिवळसर आणि मादी फुलोरा व फुले हिरवट पांढरी फळे अंडाकृती, सपाट, पातळ व लालसर तपकिरी असून त्यामध्ये दुधी रस असतो. तडकल्यावर त्यांचे दोन फलांश बारीक दांड्यावर काही वेळ लोंबत राहतात. परागण कीटकांमार्फत होते. ही वनस्पती सावलीत वाढत नाही. 

 

फे. फेटिडा या जातीची जाड लठ्ठ मुळे (१२–१५ सेंमी. व्यास) साधारणपणे चार वर्षांनी हिंगाकरिता योग्य होतात. फुले येण्यापूर्वी मार्च-एप्रिलमध्ये खोड कापून काढल्यावर राहिलेल्या मुळातून दुधी चीक येतो, तो हवेत सुकून घट्ट व राळेसारखा लालसर तपकिरी बनतो आणि पुढेतो काळसर होतो, हाच हिंग होय. सुकलेल्या हिंगामध्ये २५–६०% चीक व ५–३०% फेरूला अम्लाची संमिश्र कार्बोहायड्रेटे असतात. हिंग एकदा काढून घेतल्यानंतर मुळाला जखम करून पुन्हा तो जमा करतात याप्रमाणे तो चीक बाहेर येण्याचे थांबेपर्यंत (सु. ३ महिने) हिंग जमा करतात. 

 

हिंग तिखट-कडवट असून त्याला उग्र वास येतो. हा वास त्यामध्ये असलेल्या गंधकयुक्त थेरेइन या घटकामुळे येतो. सफेद व फिकट रंगाचा हिंग पाण्यामध्ये विरघळतो, तर गडद रंगाचा हिंग तेलामध्ये विरघळतो. हिंगाचे रासायनिक संघटन जटिल असते त्यात रेझीन (राळ), डिंक, बाष्पनशील तेल, व्हॅनिलीन व फेरूलिक अम्ल असते. हिंगाच्या चिकामध्ये फेरूला अम्लाची एस्टरे ६०%, संमिश्र कार्बोहायड्रेटे २५–३०%, बाष्पनशील तेल १०% आणि राख १.५–१०% असते. बाष्पनशील तेलामध्ये गंधकयुक्त पदार्थ असतात. भारतात फे. ॲसाफेटिडा वनस्पतीच्या बाष्पनशील तेलामधील बावीस संयुगे (९९.९१%) ओळखण्यात आलेली आहेत. त्यांपैकी प्रमुख संयुगे पुढीलप्रमाणे आहेत : Bis (१-मिथिल-थायो) प्रोपिल डायसल्फाइड (४४.४३%), (E)-१ प्रोपेनिल सेक-ढ्युटिल डायसल्फाइड (२५.७३%), (Z)-१-प्रोपेनिल सेक-ब्युटिल डायसल्फाइड (१९.७१%) आणि -१-प्रोपनिल सेक-ब्युटिल डायसल्फाइड (४-१६%). 

 

इतिहास : प्राचीन संस्कृत संहितांवरून लक्षात येते की, हिंग भारतात फार पूर्वीपासून वापरात असावा. हिंगाचा तीव्र वास इतर वासांना दडपून टाकतो म्हणून संस्कृतमध्ये त्याला हिंगू असे म्हणतात. निघंटु या ग्रंथा-मध्ये त्याचा विविध नावांनी उल्लेख केलेला आढळतो बल्हिका‘बल्खपासून प्राप्त होणारा, रामंथ भूतनाशक ‘भूतपिशाच्च नष्टकरणारा’ आणि शूलनाशक ‘पोटदुखी दूर करणारा’ याचे वर्णन उष्ण, पाचक, रेचक व उग्र असे केले असून श्लेष्मा, संधिवात, मुरडा, पोटदुखी, पोटाचे विकार, दंत आदी रोगांवर उपचार म्हणून वापरात आहे. हिंग पित्तात वाढ करत असल्यामुळे वापरण्यापूर्वी तो तापवून घेण्याचे मार्गदर्शन निघंटुकारांनी केले आहे. 

 

प्राचीन अरबी जगतात हिंग वनस्पतीला ‘जातुक’ संबोधले जात असे. ‘जातु’ याचा अर्थ ‘डिंक किंवा लाख.’ प्राचीन अरबी वैद्यक संहितांमध्ये इश्न सिना (दहावे शतक) याने हिंगाचे ताईत (चांगला) आणि मुंतीन (उग्र) असे दोन प्रकार सांगितले आहेत. मात्र, त्यांचे वर्णन दिलेले नाही. अली इश्ताखरी (दहावे शतक) याने नमूद केले आहे की, सिस्तान व माक्रान वाळवंटात या औषधी वनस्पतीची लागवड करतात व मसाल्यात वापरतात. इद्रिसी (बारावे शतक) या भूगोल तज्ञाने पश्चिम अफगाणिस्तानात हिंग (अरबीमध्ये हिल्तीत) मोठ्या प्रमाणात गोळा केले जाते, असे म्हटले आहे. हाजी झाईन या औषधनिर्मात्याने चौदाव्या शतकात हिंग दोन विविध वनस्पतींपासून मिळत असल्याचे म्हटले आहे (काळा आणि पांढरा अंजुदान पांढरा हा चांगला हिंग असतो). सतराव्या शतकात मिर मुहंमद या शिराझ येथील मोमीनने लिहिले आहे की, चांगला हिंग लालसर रंगाचा असून तो कुलाहपार (टोपीसारखे पान) असे स्थानिक नाव असलेल्या वनस्पतीपासून मिळवितात. 

 

पर्शियामध्ये अंगुझाह-केमा व कंदाल-केमा अशा नावांनी दोन वनस्पती हिंगासाठी ओळखल्या जात. पाश्चात्त्य देशांमध्ये अलेक्झांडर द ग्रेट याच्या काळात हिंग यूरोपात गेला. पहिल्या शतकात दिओस्कोदिवेस याच्या लेखनात हिंगाचा उल्लेख आहे. मिश्नाह यासारख्या हिब्रू साहित्यात देखील हिंगाचा उल्लेख आढळतो. रोमन साम्राज्याच्या अस्तानंतर सोळाव्या शतकापर्यंत यूरोपात हिंग दुर्मिळ झाला होता. त्याचे अस्तित्व फक्त औषध म्हणून होते. 


 

उपयोग : मुख्यत्वेकरून भारतात हिंगाचा अधिक वापर होतो. मसाला म्हणून हिंगाचा वापर स्वयंपाकात मोठ्या प्रमाणावर होतो. लोणची, आमटी, सांबर, डाळ, डोसा इत्यादींत त्याचा वापर स्वादकारक म्हणून केला जातो. कच्च्या सॅलडमध्ये मिठासोबत हिंग पावडर वापरतात. हिंग जेथे पिकवितात तेथे संपूर्ण वनस्पतीचा भाजीप्रमाणे उपयोग करतात.पानांचा उग्र वास शिजविल्यावर नाहीसा होतो. खूप उग्र वास असल्यामुळे शुद्ध हिंग तसाच खाद्यपदार्थांत वापरला जात नाही. स्टार्च अथवातांदूळ पीठ व हिंगाचा डिंक एकत्र करून त्याच्या वड्या अथवा पावडर बनवितात. शाकाहारी लोकांच्या मसाल्यामध्ये याचे महत्त्व मोठे आहे. भारतामध्ये काही धर्मांमध्ये (मुख्यतः राजस्थान, गुजरात व महाराष्ट्र येथील जैन, वैष्णव व हिंदू धर्मांमध्ये) ज्यांना कांदा व लसूण वर्ज्य असते त्यांच्या अन्नामध्ये हिंग पर्याय ठरतो. 

 

दमा, जुनाट खोकला, दातदुखी, डांग्या खोकला, अपचन व काही मेंदूच्या विकारांवर हिंग गुणकारी आहे. तसेच तो उत्तेजक, वायुसारक व आचके बंद करणारा आहे. हिंगामध्ये असणाऱ्या कुमारीन या रसायना-मुळे रक्त पातळ होते. तसेच तो पशुवैद्यकातही उपयुक्त आहे. अत्तरे व सौंदर्यप्रसाधनांतही त्याचा वापर केला जातो. यूरोप व अमेरिकेत स्वादा-करिता व सुगंधी द्रव्यांत तो वापरतात. हिंग आतड्यांतील हानीकारक सूक्ष्मजंतूंची वाढ रोखतो. इन्फ्ल्यूएंझा व स्वाइन फ्ल्यू (क१छ१) यांसारख्या रोगात हिंग नैसर्गिक विषाणुप्रतिरोधी औषध म्हणून काम करतो. तंत्रिका तंत्रात तो आकडीरोधक म्हणून देखील काम करतो, तसेच नियमित सेवनाने हिवतापासारख्या रोगाचा प्रतिरोध करता येतो. आयुर्वेदा त वात व कफाचे संतुलन ठेवण्यासाठी तसेच वातदोषासाठी हिंग अत्युत्तम औषध असल्याचे सांगितले आहे (अष्टांगहृदय -सुश्रुत प्रकरण ६ वे). 

पोतनीस, शा. कृ. वाघ, नितिन भरत 

 

हिंग