नाइटशेड: (लॅ. सोलॅनम कुल-सोलॅनेसी). वांगे, बटाटा, रिंगणी इ. वनस्पतींच्या वंशाला (सोलॅनम) हे सामान्य इंग्रजी नाव आहे तथापि या व इतर काही वंशांतील वा कुलातील विशिष्ट देशी आणि विदेशी जातींनाच प्रामुख्याने नाइटशेड ह्या सामान्य नावाने ओळखतात. सोलॅनम वंशातील वनस्पती ⇨ ओषधी, क्षुपे (झुडपे) व क्वचित वेली असतात काही काटेरी आहेत. त्यांना विविधरंगी, चक्राकृती व शोभादायक फुले येतात आणि त्यांची मृदुफळे अनेक बीजी असतात. ‘नाइटशेड’ या नावावे ओळखल्या जाणाऱ्या काही जातींची त्रोटक माहिती पुढे दिली आहे.

ब्लॅक नाइटशेड : फुलाफळांसह फांदी

वुडी नाइटशेड: (लॅ. सोलॅनम डलकॅमेरा). उ. अमेरिका व ब्रिटन येथे ‘नाइटशेड’ हे नाव या वनस्पतीला उद्देशून वापरतात. ही सु. १,२०० – २,४०० मी. उंचीपर्यंत काश्मीर ते सिक्किममध्ये आढळते. ती एक आधारावर चढणारी झुडूपवजा वेल आहे. पाने खंडयुक्त, ७·५–१२·५ सेंमी. व साधी असतात. हिची मुळे प्रथम कडू व नंतर गोड लागत असल्यामुळे हिला ‘कडुगोड’ (बिटरस्वीट) म्हणतात. चिचुंदऱ्या या वनस्पतीचा पाला खातात व कृकण पक्षी (महोका) हिवाळ्यात हिच्या फळांवर निर्वाह करतात. हिच्या जांभळ्या फुलांमुळे यूरोपात बागेत शोभेकरिता लावतात. मृदुफळे लंबगोल, शेंदरी, सुमारे १·२५ सेंमी. लांबीची व विषारी असतात ती मूत्रल (लघवी साफ करणारी) व स्वेदजनक (घाम आणणारी) असतात. ही वनस्पती अर्बुदे (पेशींची अत्यधिक नवोत्पत्ती झाल्यामुळे होणाऱ्या गाठी) व चामखिळी यांवर उपयुक्त असते जुनाट संधिवात व अनेक चर्मरोगांवर ती वापरतात. सुक्या फांद्यांचा फांट (थंड पाण्यात भिजवून काढलेला अर्क) शामक (शांत करणारा) व वेदनाहारक असतो. पानेही विषारी असतात अधिक प्रमाणात पाने किंवा फळे पोटात गेल्यास आचके येतात व कधीकधी मृत्यूही येतो.

ब्लॅक नाइटशेड: (लॅ. सोलॅनम नायग्रम). ब्रिटनमध्ये ओसाड जागी ही जाती आढळते. हिला पांढरी फुले व काळी विषारी मृदुफळे येतात. वरील दोन्ही जातींत विषाचा परिणाम वांत्या, अतिसार व ओटीपोटात वेदना असा होतो [→ कांगणी].

डेडली नाइटशेड: (लॅ. ॲट्रोपा बेलाडोना). याचा अंतर्भाव सोलॅनम वंशात नसून ‘बेलाडोना’ या नोंदीत याचा अधिक तपशील दिला आहे. या वनस्पतीपासून उपयुक्त ⇨ अल्कलॉइडे मिळतात.

एनचँटर्स नाइटशेड: (लॅ. सिर्किया ल्युटेटियाना). याचा समावेश ⇨ ऑनेग्रेसी कुलात (शिंगाडा कुलात) केला जातो. ही सु. १ मी. उंच व सरळ वाढणारी ओषधी उ. अमेरिकेत व उ. गोलार्धात काही ठिकाणी आढळते फुले पांढरी व मंजरीत येतात बागेत पाणथळ जागी शोभेकरिता लावतात. ही जाती भारतात आढळत नाही.

मलबार नाइटशेड: (लॅ. बॅसेला रुब्रा). इंग्रजीत या नावाच्या वेलीस ‘इंडियन स्पिनॅक’ असेही म्हणतात. भारतात हिचे ‘हिरवट पांढरा’  व ‘लाल’ असे दोन प्रकार आढळतात. लाल प्रकारात खोड, फांद्या व देठ लाल रंगाचे असतात. दोन्ही प्रकार भाजीकरिता उपयोगात आहेत. ⇨ मयाळ या मराठी नावाने ते ओळखले जातात [→ बॅसेलेसी]. बागेत हे प्रकार लावतात.

पहा : रिंगणी वनस्पति, विषारी सोलॅनेसी.

परांडेकर, शं. आ.

वुडी नाइटशेड : (१) फुलोऱ्यासह फांदी, (२) फळांचा झुबका.