पान : पान हे अनेक वनस्पतींचे सर्वांत सहज दिसणारे, खोडावरचे, महत्त्वाचे, सपाट व बाजूचे (पार्श्विक) उपांग होय. वैदिक वाङ्मयात ‘पर्ण’ ही संज्ञा वनस्पतींच्या एका अवयवास (पानास) वापरलेली आहे. तसेच ही संज्ञा एका यज्ञीय वृक्षाला (पलाश) उद्देशून वापरली आहे. पानांतील हिरवे द्रव्य (हरितद्रव्य) व त्यांची बहुधा मोठी असलेली संख्या यांमुळे वनस्पती किंवा जंगल अथवा शेत यांसारखे वनस्पतींचे समूह यांचे स्वरूप दुरूनही सहज कळते. सर्वच पाने (पर्णसंभार) हिरवी, लालसर, पिवळी किंवा झडलेली असताना एखाद्या वनस्पतीचे किंवा वनश्रीचे दृश्य निरनिराळे दिसते. पाने व खोड यांचे कलिकावस्थेत व नंतर निकटचे संबंध ध्यानात घेऊन त्या दोन्हींना मिळून प्ररोह म्हणतात आणि त्याचा उगम बीजी वनस्पतीत [→ वनस्पती, बीजी विभाग ] बी रुजताना त्यातील आदिकोरकापासून (अंकुराच्या वर वाढणाऱ्या भागापासून) होतो [→ अंकुरण ]. खोडावरची शेंड्याची ⇨कळी (अग्रस्थ कोरक) जसजशी वाढते तसतशी तीतून चिमुकली पाने व खोड हळूहळू साकार होतात सर्वांत कोवळे भाग शेंड्याजवळ व जून भाग क्रमाने खाली तळाकडे याप्रमाणे अग्रवर्धी अनुक्रम दिसतो. गाजर, मुळा व बीट यांच्या मुळांवर दिसणारी पाने वस्तुतः मुळांच्या टोकावर असलेल्या संक्षिप्त खोडावरच आलेली असून प्रत्यक्ष मुळांवर पाने (कोरक) कधीही येत नाहीत (अपवाद – रताळे वगैरे). ती खोडावर विशिष्ट जागी (पेऱ्यांवर) विशिष्ट पद्धतीनुसार मांडलेली असतात [→ पर्णविन्यास ]. खोडाशी पानाने केलेल्या वरच्या कोनास बगल (कक्ष किंवा कक्षा) व त्यात आढळणाऱ्या कळीस (कोरक किंवा मुकुल) बगलेतील (कक्षास्थ किंवा कक्षस्थ) कळी म्हणतात. पान बहुधा सपाट व पातळ असून त्यातील कठीण शिरांच्या विशिष्ट मांडणीमुळे त्याला आधार प्राप्त होऊन योग्य प्रकारे व प्रमाणात प्रकाश उपलब्ध व्हावा अशा स्थितीत ते खोडावर राहते. प्रकाशाच्या सान्निध्यात अन्ननिर्मिती करणे [→ प्रकाशसंश्लेषण] व नेहमी वनस्पतीतील वाजवीपेक्षा अधिक असलेला पाण्याचा अंश वाफेच्या रूपाने बाहेर टाकणे आणि गरजेप्रमाणे त्यावरील अतिलहान छिद्रातून म्हणजे ⇨त्वग्रंध्रांद्वारे ऑक्सिजन आत घेऊन कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर टाकणे

[→ श्वसन, वनस्पतींचे ] इ. प्रक्रिया पानांच्याद्वारे चालतात व त्यांना अनुकूल अशी त्यांची अंतर्बाह्य संरचना, आकार व आकारमान असते. पानांचा उगम व विकास खोडावर (आ. १) किंवा फांदीवर शेंड्याकडे अतिसूक्ष्म आणि सतत विभाजन होत असलेल्या कोशिकांच्या समूहांच्या [→ विभज्या] बाह्यस्तरावर (त्वचाजनक) प्रथम लहान उंचवटे बनून (आद्यपर्णे) होतो व पुढे त्यात मधली ऊतके (समान रचना आणि कार्य असलेल्या कोशिकांचे–पेशींचे–समूह) व शेवटी वाहक कोशिका किंवा वाहिन्या बनून ते पूर्ण बनते.

आ. १. खोडवरील अग्रस्थ कोरकाचा (कळीचा) उभा छेद : (१) विभज्या, (२) आद्यपर्णे, (३) कक्षास्थ कोरक.

 यामध्ये बहुधा पानाच्या टोकाचा भाग प्रथम पूर्ण होऊन नंतर मध्यभाग व शेवटी तळचा भाग पूर्ण होतो. याउलट क्रम काही नेचांत आढळतो. खोड व मूळ यांच्या विकासाशी तुलना केली असता पानांची वाढ सतत होणारी नसून पान हे फारच मर्यादित वाढीचे पार्श्विक उपांग होय, असे मानतात. काही ⇨शेवले  व ⇨शेवाळी  यांसारख्या साध्या वनस्पतींना पानासारखी व थोडीफार तशीच कार्ये करणारी उपांगे असतात तथापि ती अत्यंत साधी असल्याने खरी पाने वाहिनीवंत (द्रव पदार्थ वाहून नेणार्‍या घटकांनी युक्त असलेल्या) वनस्पतींत (बीजुकधारी पिढीवर) आढळणारीच होत.


भाग : पानाचे मुख्यतः तीन भाग असतात : (१) खोडावर पेऱ्याशी सांधणारा भाग तो पर्णतल, (२) हिरवा, बहुधा सपाट व पसरट भाग ते पाते आणि (३) या दोन्हींना जोडणारा लांबट व कठीण भाग तो देठ (वृंत) (आ.२).

पात्याचे टोक (पर्णाग्र) आणि कडा (पर्णधारा) यांत विविधता असते. पात्यात एक मध्यशीर व तिच्या बाजूंस अनेक उपशिरा अथवा त्यात अनेक मध्यशिरा असतात. कधीकधी देठाचा तळभाग फुगीर असून पानाच्या हालचालीस मदत करतो [→ लाजाळू], तेव्हा त्यास पुलवृंत म्हणतात कधी हा तळभाग पसरट व लांब असून तो खोडास अंशतः किंवा पूर्णतः वेढून टाकतो त्यास आवरक म्हणतात [ आ. २ (आ) बांबू→ केळ ताड गवते इ.] व याचा खोडास व पानास आधार मिळतो याच्य वरच्या टोकास पात्याजवळ पातळ पापुद्य्रासारखे किंवा केसाळ लहान उपांग असते, त्यास जिव्हिका (लहान जिभेसारखे) आणि पानास जिव्हिकावंत म्हणतात.

आ. २. पानाचे भाग : (अ) जास्वंद : (१) पर्णतर, (२) पाते, (३) देठ, (४) पर्णाग्र (टोक), (४) पर्णधारा (कडा), (६) मध्यशीर, (७) उपशिरा, (८) उपपर्णे (मुक्त पार्श्विक) (आ) बांबू : (१) पर्णतल, (२) पाते, (३) पर्णाग्र, (४) पर्णधारा, (५) मध्यशीर, (६) उपक्षिरा, (७) जिव्हिका, (८) आवरक.

पर्णतलाजवळ कधी देठाच्या प्रत्येक बाजूस एक याप्रमाणे तर कधी फक्त एक असे लहान हिरवट खवल्यासारखे उपांग असते, त्यास उपपर्ण म्हणतात. हे नसल्यास पानास अनुपपर्ण व असल्यास सोपपर्ण म्हणतात जास्वंदाच्या पानास (आ. २ अ) बाजूस दोन साधी सुटी (मुख्त पार्श्विक) लहान उपपर्णे असतात. पानासारख्या हिरव्या उपपर्णास पर्णसम [→ वाटाणा लाख–२] म्हणतात (आ. ३). गुलाबाच्या देठाच्या तळाशी दोन्ही बाजूंस एकेक उपपर्ण चिकटून वाढलेले (वृंतलग्न) असते. कॉफी व राईकुडा यांच्या दोन समोरासमोर असलेल्या पानांची उपपर्णे बाजूस जुळून (अंतरावृंतीय) वाढ़तात. डिकेमालीच्या पानांच्या बगलेत एकच उपपर्ण (अंतवृंती) दिसते परंतु ते दोन्ही जुळून बनलेले असते. बोर व बाभूळ यांची उपपर्णे काटेरी (कंटक) असतात. वड, पिंपळ, फणस इत्यादींचे अग्रस्थ कोरक मोठ्या खवल्यांनी संरक्षिलेले असते व ते खवले उपपर्णेच होत. ⇨चोपचिनीची उपपर्णे ही आधारावर चढण्यास उपयुक्त (प्रतानरूप) असे तणावे असतात. पॉलिगोनम  व चुका यांच्या पानांच्या तळाशी खोडाभोवती नळीसारखे (नलिकाकृती) उपपर्ण असते. देठ असलेल्या पानास (उदा., जास्वंद, आ. २ अ) सवृंत, नसलेल्यास (उदा., बांबू, आ. २ आ) अवृंत म्हणतात फार लहान देठ असल्यास अल्पवृंत (उदा., सुई) म्हणतात.

  


कमळ आणि एरंड यांच्या पात्यास मागील बाजूस देठ चिकटलेला असतो (आ. ४) म्हणून त्यास छत्राकृती म्हणतात. लिंबू, पपनस इत्यादींच्या पानांच्या देठास दोन्ही बाजूंस पात्यासारखा (पंखासारखा) पसरट भाग असतो त्या देठास सपक्ष म्हणतात. ऑस्ट्रेलियातील एका बाभळीच्या जातीत देठाचे संपूर्णपणे पात्यात रूपांतर झालेले असते. कारण खरे व अनेक दलकांचे पाते लवकर गळून पडते (शीघ्रपाती) म्हणून त्यास वृंतपर्ण म्हणतात. बाष्पोच्छ्‍वास (वाफेच्या रूपात पाणी बाहेर टाकणे) कमी करून प्रकाशसंश्लेषण चालू ठेवण्यास हे रूपांतर खोडास समांतर राहते. देठाच्या अभावी कधीकधी पात्याचा तळभाग खोडाभोवती अंशतः किंवा पूर्णतः वेढून राहतो, त्यास अनुक्रमे सकर्णिक किंवा संवेष्टी (उदा., सदमंदी) म्हणतात. पाते खोडास पूर्णपणे वेढून टाकते व खोड जणू पात्यातून आरपार गेल्यासारखे दिसते, तेव्हा त्यास परिवेष्टी म्हणतात (उदा., शिया, सालीट व कोरफडीची एक जाती).

आ. ३. उपपर्णाचे प्रकार : (१) पर्णसम, (२) वृंतलग्न, (३) अंतरावृंतीय, (४) कंटक, (५) खवला, (६) प्रतानरूप, (७) नलिकाकृती.

 पाते हा पानाचा प्रमुख क्रियाशील भाग असून त्यामध्ये पाणी, लवणे किंवा तयार झालेला अन्नरस यांची ने-आण करणार्‍या शिरा (वाहक कोशिक व वाहिन्या असलेली ऊतके) बहुधा स्पष्ट दिसतात त्यांच्या विविध प्रकारच्या मांडणीस ‘सिराविन्यास’ म्हणतात (आ. ५). पात्यात त्याच्या तळापासून एक अथवा अनेक प्रमुख शिरा निघून पुढे त्यांच्यापासून अनेक लहानमोठ्या उपशिरा निघतात व त्या सर्वांचे मिळून जाळे बनते, त्यास जाळीदार सिराविन्यास म्हणतात. उपशिरांचे दाट जाळे न बनता प्रमुख शिरा किंवा उपशिरा समांतर राहतात, त्यास समांतर सिराविन्यास म्हणतात जाळीदार प्रकार व्दिदलिकित वनस्पतींत व समांतर प्रकार एकदलिकित वनस्पतींत बहुतांशी आढळतो. या दोन्ही प्रकारांत प्रमुख शीर एक (उदा., आंबा, केळ) किंवा अनेक (उदा., एरंड, ताड) असल्यास त्यास अनुक्रमे एकसिराल व बहुसिराल असे म्हणतात बहुसिराल प्रकारात सर्व प्रमुख शिरा टोकाकडे जुळतात (उदा., कारंदा, गवते) अथवा परस्परांपासून दूरच राहतात (उदा., एरंड, ताड) व या उपप्रकारांस अनुक्रमे अभिमुख व परामुख म्हणतात. अनेक ⇨नेचांच्या व गिंकोच्या [→ गिंकोएलीझ] पानात उपशिरा प्रत्येकी पुनःपुन्हा व्दिभागलेल्या असल्याने याला व्दिशाखी सिराविन्यास म्हणतात. एकसिराल सिराविन्यास पिसासारखा दिसत असल्याने त्याला पिच्छाकृती व बहुसिरालास हातासारखा दिसत असल्याने हस्ताकृती म्हणतात. पानाचे

पाते कमीजास्त प्रमाणात निसर्गतःच विभागलेले (खंडित) आढळते. ते पूर्णपणे विभागल्याने त्याचे स्वतंत्र खंड (दल, दलक) झाल्यास मध्यशिरेवर अनेक पाती दिसतात म्हणून याला संयुक्त पान (पर्ण) (उदा., गुलाब, बेल इ.) व तसे नसून पाते अंशतः विभागलेले असल्यास किंवा अखंडित असल्यास त्यास साधे पान म्हणतात.

   

आ. ४. वृंत (देठ) व पाने : (१) छत्राकृती पाते, (२) सपक्ष देठ, (३) वृंतपर्ण, (४) सकर्णिक पाते, (५) संवेष्टी पर्णतल, (६) परिवेष्टी पाते.   आ. ५. सिराविन्यास : (१) जाळीदार, एकसिराल, पिच्छाकृती (२) जाळीदार, बहुसिराल, हस्ताकृती (३) समांतर, एकसिराल, पिच्छाकृती (४) समांतर, बहुसिराल, हस्ताकृती व परामुख (५) द्विशाखी.


पानांचा (पात्यांचा) आकार, कडा, टोके इत्यादी : पाने आकारमानाने अत्यंत लहानापासून (उदा., दुधी, नायटी, सिलाजिनेला इ.) ते अत्यंत मोठ्यापर्यंत (उदा., केळ, माड, वृक्षी नेचे इ.) असतात परंतु त्यांच्या आकारांत फार भिन्नता आढळते ही विविधता त्यांची रूपरेखा, घारा, टोके व छेदन (खंड पडणे) यांतील प्रकारावर अवलंबून असते. पर्णधारांचा विचार केला (आ. ६), तर ती अखंड (उदा., वड, पिंपळ इ.) दातेरी पण दात टोकाकडे वळलेले म्हणून दंतुर (उदा., निंब, जास्वंद) बाहेर टोके असलेले दात म्हणून प्रदंतुर (उदा., लाल कमळ, कलिंगड इ.) बोथट दात म्हणून स्थूलदंतुर (उदा., पानफुटी, ब्राह्मी) किंवा काटेरी म्हणून कंटकित (उदा., घायपात, काटेधोतरा) पाण्यावरच्या लाटांप्रमाणे तरंगित (उदा., हिरवा अशोक) लहानमोठे उंचवटे व खाचा असल्याने नतोन्नत (उदा., ओक) अशी विविध असते.

पर्णखंडन : लहानमोठे विभाग पडल्याने धारा खंडित होते.

कांचनाच्या पात्याप्रमाणे दोन अपूर्ण खंड झाल्याने ते द्विखंडित व

आ. ६. पर्णधारा : (१)अखंड, (२)तरंगित, (३)दंतुर, (४) प्रदंतुर, (५) स्थूलदंतुर, (६)कंटकित, (७)मतोन्नत

कृष्णकमळाच्या एका जातीच्या पानाचे तीन अपूर्ण खंड पडल्याने ते त्रिखंडित असते. वर निर्देश केलेल्या पिसासारख्या सिराविन्यासाचे पाते मध्यशिरेकडे साधारण निम्म्यापर्यंत खंडित असल्यास अल्पपिच्छाकृती

[→ शेवंती] त्यापेक्षा अधिक खंडित असल्यास अर्धपिच्छाकृती [→ मूळा] व मध्य शिरेच्या साधारण जवळपास विभागणी गेल्यास अपूर्ण पिच्छाकृती [→ झेंडू] म्हणतात. याच पद्धतीने हस्ताकृती सिराविन्यासाचे पाते अल्पहस्ताकृती [→ एरंड], अर्धहस्ताकृती [→ भद्रदंती] व अपूर्ण हस्ताकृती [→ गारवेल] खंडित असते. यांखेरीज पक्षिपदाकृती, वीणाकृती, पश्चदंती व कंकतिक (फणीसारखे) हे पात्याच्या खंडनाचे विशेष प्रकार आढळतात (आ. ७). यांच्या आकृती अनुक्रमे पक्ष्याच्या पायाप्रमाणे वीणेप्रमाणे (उदा., मोहरी), तळाकडे वळलेल्या रुंद दात्यांचे [→ दुधळ] व फणीच्या दात्यांप्रमाणे [→ कामलता] असतात.

आ. ७. पर्णखंडन : (१) पक्षिपदाकृती, (२) वीणाकृती, (३) पश्चदंती, (४) कंकतिक.


आ. ८. पर्णाग्रे : (१) विशालकोनी, (२) लघुकोनी, (३) प्रकुंचित, (४) कंटकाग्र, (५) निम्नमध्य, (६) प्रतानरूप.

पानांची टोके : (पर्णाग्रे). ही विविध प्रकारांची असतात (आ. ६ व ८). विशालकोनी–बोथट व गोलसर टोकाचे

[→ वड] लघुकोनी

अथवा टोकदार [→ जास्वंद नागवेली] प्रकुंचित–लांबट व शेपटीप्रमाणे [→ पिंपळ] असल्याने पानावरचे पाण्याचे थेंब सहज गळून पडण्यास सोयीचे. कंटकाग्र–शेवटी तीक्ष्ण काट्याचे [→ युका खजूर घायपात] निम्नमध्य–मध्ये त्रिकोनी खाच असलेले [→ कांचन] प्रतानरूप–दोऱ्याप्रमाणे व संवेदनाक्ष्म [→ कळलावी] इत्यादी.

पानांची रूपरेखा : सामान्यपणे पानांच्या पात्यांच्या रूपरेखेचेही (आकाराचे) अनेक प्रकार आढळतात (आ. ९). त्यांपैकी काही

आ. ९. पानांच्या पात्यांची रूपरेखा : (१) सूच्याकृती, (२) रेखाकृती, (३) कुंतसम, (४) दीर्घवृत्ताकृती, (५) आयत, (६) अंडाकृती, (७) व्यस्त अंडाकृती, (८) हृदयाकृती, (९) व्यस्त हृदयाकृती, (१०) वृक्काकृती, (११) शराकृती, (१२) प्रशारकृती, (१३) तिर्यक्, (१४) अर्धचंद्राकृती, (१५) चमसाकृती.प्रकार पुढीलप्रमाणे आहेत : (१) सूच्याकृती : सुईप्रमाणे लांब, टोकदार परंतु धारा असलेले (उदा., पाइन, ॲरॉकॅरिया) (२) रेखाकृती : अत्यंत अरुंद, लांब व दोन्ही धारा समांतर असलेले (उदा., गवत, झेफीर लिली) (३) कुंतसम : मध्ये रुंद, पण टोकाकडे निमुळते होत गेलेले व तळाकडे थोडे अरुंद, भाल्यासारखे (उदा., बांबू, कण्हेर) (४) दीर्घवृत्ताकृती : वरच्याप्रमाणे परंतु दोन्ही टोकांस अरुंद (उदा., बकुळ, जांभूळ इ.) (५) आयत : दोन्ही टोकांस गोलसर व धारा समांतर, तथापि सर्वत्र सारख्या रुंदीचे (उदा., पेरू, केळी इ.) (६) अंडाकृती : तळाशी गोलसर व टोकाकडे निरुंद (उदा., जास्वंद, पारिजातक इ.) (७) व्यस्त अंडाकृती : वर वर्णन केल्याप्रमाणे पण त्याच्या उलट आकृतीचे (उदा., फणस) (८) हृदयाकृती : तळाशी खाच असून शेंड्याकडे टोकदार (उदा., चक्रभेंडी, गुळवेल इ.) (९)  व्यस्त हृदयाकृती : हृदयाकृतीच्या उलट (उदा., आंबुटी इ.) (१०) वृक्काकृती : मूत्रपिंडाकृती किंवा काजूच्या बीजाप्रमाणे तळास उथळ खाच व टोकास कमानदार (उदा., ब्राह्मी) (११) शराकृती : तळाशी बाणाच्या टोकाप्रमाणे व टोकास अरुंद (उदा., अळू) (१२) प्रशाराकृती : वरीलप्रमाणे परंतु तळाजवळची दोन टोके बाहेर वळलेली (उदा., हरणखुरी) (१३) तिर्यक् : पात्याच्या मध्यशिरेच्या दोन बाजूंचे अर्ध सारखे नसणारे (असमात्र उदा., कडूनिंबांचे दल, बिगोनिया) (१४) अर्धचंद्राकृती : पात्याची रूपरेखा अर्ध्या वर्तुळाप्रमाणे (उदा., कृष्णकमळाची एक जात, राजहंस नेचा) (१५) चमसाकृती : पात्याचे टोक गोल व तळाकडे निरुंद असा चमच्याप्रमाणे आकार (उदा., डेझी).


संयुक्त पाने : साधे पान व संयुक्त पान यांतील फरकाचा वर उल्लेख आहे, तसेच अपूर्ण पिच्छाकृती व अपूर्ण हस्ताकृती पानाबद्दलही स्पष्टीकरण केले आहे. पात्याच्या अपूर्ण विभागणीनंतरची अवस्था म्हणजे साध्याचे संयुक्तात रूपांतर होय. एकसिराल सिराविन्यास असलेल्या पात्याची पूर्ण विभागणी झाल्यास पिसासारख्या (पिच्छाकृती) दिसणार्‍या संयुक्त पानाची संरचना बनते तसेच बहुसिराल सिराविन्यास असलेल्या पात्याची पूर्ण विभागणी होऊन हस्ताकृती संयुक्त पान बनते (आ. १०). यांच्या विभागांना (प्रत्येक साध्या पानाप्रमाणे दिसणाऱ्याना) दल म्हणतात. उदा., गुलाबाच्या संयुक्त पानास पाच दले व बेलाच्या संयुक्त पानास तीन दले असतात. पर्णात अनेक दले असल्यास फांदीचा भास होतो परंतु फांदीच्या टोकास व प्रत्येक पानाच्या बगलेत कोरक असते तसे संयुक्त पानांत आढळत नाही. शिवाय संयुक्त पानाच्या बगलेत कोरक असते तसे फांदीच्या बगलेत फार क्वचित दिसते. पिच्छाकृती संयुक्त पानाच्या टोकास दल असल्यास एकूण दलांची संख्या विषम होते म्हणून त्यास विषमदली पिच्छाकृती [→ गुलाब निंब इ.] व टोकास दल नसल्यास समदली पिच्छाकृती [→ टाकळा तरवड] म्हणतात. कधी दलेही संयुक्त पानासारखी पिच्छाकृती खंडित असतात [→ गुलमोहर] अशा संयुक्त पानास द्विगुण पिच्छाकृती म्हणतात व दलाच्या विभागून बनलेल्या भागास दलक म्हणतात येथे पात्याची विभागणी (खंडन) दोनदा झालेली असते. शेवग्याच्या पानाची या पद्धतीने तीनदा विभागणी झालेली असते, म्हणजेच दलकेही पुन्हा पिच्छाकृती विभागलेली असतात म्हणून शेवग्याचे संयुक्त पान त्रिगुण पिच्छाकृती असते. हस्ताकृती संयुक्त पानांना दलांच्या संख्येवरून द्विदली [→ अंजन–२ हिंगण], त्रिदली [→ बेल आंबुटी इ.], चतुर्दली (उदा., मार्सिलिया), पंचदली

[→ सावर, लाल गोरखचिंच इ.] असे म्हणतात. ⇨ लिंबू व पपनसाच्या पानास सपक्ष देठ व पाते यांमध्ये सांधा असल्याने त्यास एकदली संयुक्त पान म्हणतात.

आ. १०. संयुक्त पाने : (१) त्रिदली, (२) पंचदली हरताकृती, (३) पिच्छाकृती विषमदली, (४) पिच्छाकृती समदली, (५) द्विगुण पिच्छाकृती, (६) त्रिगुण पिच्छाकृती.

समात्रता : पानाचे पाते झाडावर बहुधा अशा रीतीने आधारलेले असते की, त्याचा पृष्ठभाग जास्तीत जास्त प्रकाश मिळण्याच्या दृष्टीने जमिनीशी समांतर (खोड किंवा फांदीशी काटकोनात) राहतो एक बाजू प्रकाशित (प्रकाशसंमुख) राहते व उलट बाजू प्रकाशविन्मुख (जमिनीकडे वळलेली) असते त्यांच्या संरचनेत [→ शारीर, वनस्पतींचे] व बाह्य स्वरूपात त्याच्या दोन्ही बाजू (अनुक्रमे पृष्ठीन व मुखीन) फरक दर्शवितात त्याची ‘समात्रता’ द्विपार्श्व आहे असे म्हणतात. काही पाती (उदा., जखमी, आयरिस, बेलमकँदा   इ.) खोडाशी समांतर (उभी) राहून तीव्र प्रकाशाचे उभे किरण धारांवर घेतात, त्यामुळे अशा पात्यांची दोन्ही पृष्ठे फरक दर्शवीत नाहीत त्यांना ‘समद्विपृष्ठी’ म्हणतात. वृंतपर्णे किंवा फड्या निवडुंगाची पर्णकांडे (खोडे) अशीच राहून तीव्र प्रकाश व उष्णात (व त्यामुळे होणारा अधिक बाष्पोच्छ‌्वास) यांपासून स्वसंरक्षण करतात ती एक अनुयोजना असते. हे लक्षण काही ⇨ मरुवनस्पतींचे वैशिष्ट्य मानतात. कांदा व लसूण यांची पाती अशीच जमिनीशी काटकोनात वाढतात, मात्र ती चितीय असून संरचनेत (सामान्य खोडाप्रमाणे) ‘अरसमात्र’ असतात, म्हणजेच त्यांच्या केंद्रातून जाणारी उभी पातळी त्यांचे दोन समान अर्ध करते. अशा पानांना ‘शलाकाकृती’ म्हणतात हा प्रकारसुद्धा प्रकाशग्रहणास सोयीचा असतो. 


पर्णभेद : सर्वसाधारणतः पानांचे विशिष्ट आकार व आकारमान प्रत्येक जातीत निश्चित (आणि म्हणून वर्गीकरणाच्या दृष्टीने थोडेफार महत्त्वाचे) असे असले, तरी कधीकधी एकाच वनस्पतीवरच्या पानांत भेद आढळतात यांत दोन प्रकार आहेत. वनस्पतीचा काही भाग पाण्यात व उरलेला भाग हवेत वाढल्याने भिन्न परिस्थितिसापेक्ष पाण्यातील पाने व हवेतील पाने पात्याच्या अंतर्बाह्य संरचनेत फरक दर्शवितात. उदा., कार्डेथ्रीआ, ⇨ शिंगाडा, सॅजिटॅरिया (आ. ११) याला विषमपर्णत्व म्हणतात परंतु केव्हा हवेत वाढणाऱ्या खोडावर भिन्न स्वरूपाची पाने असतात (उदा., एल्म, फणस इ.) व याला भिन्नपर्णत्व म्हणतात. केव्हा तर खोडावरची काही पाने (प्रारंभिक) नंतर आलेल्याहून भिन्न असतात (भिन्नपर्णत्व) या तिसऱ्या प्रकारात जातीच्या विकासाचे ‘पुनरावर्तन’ कधीकधी असू शकते [→ क्रमविकास] उदा., गोकर्णाचे लहानसे रोप, ⇨पाइन  इत्यादी.

पानाच्या संरचनेत आढळणारी काही ऊतके मुळात आणि खोडात आढळणाऱ्या ऊतकासारखी असली, तरी त्यांची मांडणी भिन्न व त्यांच्या कार्यास सोयीची असते. पानांना असमान अवयव असे या अर्थाने म्हटले जाते.

[→ ऊतके, वनस्पतींतील शारीर, वनस्पतींचे].

निवेशन व आयुर्मान : पानाच्या देठाचा तळभाग जेथे खोडास सांधलेला असतो त्या बिंदूस ‘निवेशन’ म्हणतात. पान हे फांदीवर किंवा वायवीय (हवेतील) खोडावर असल्यास ‘स्कंधोद्भव’ (उदा., आंबा, निंब) म्हणतात. जमिनीसरपट असलेल्या संक्षिप्त खोडावर येणाऱ्या पानास ‘मूलज’ (उदा., गाजर, बीट, घायपात, मुळा इ.) म्हणतात. पानांचे आयुष्य एक-दोन ऋतूंच्या पुरतेच मर्यादित असल्यास व ती सर्व एकदमच पडून जात असल्यास ‘पतिष्णू’ (उदा., लाल सावर, पळस, पांगारा इ.) व त्यापेक्षा अधिक आयुष्य असल्याने झाड संपूर्ण पर्णहीन कधीच होत नसल्यास त्यांना ‘चिरहरित’ (व झाडांना ‘सदापर्णी’) म्हणतात नांग्या शेर [→ शेर, नांग्या], ⇨ मुहलेनबेकिया इत्यादींची पाने फार लवकर गळतात, म्हणून त्यांना ‘शीघ्रपाती’ म्हणतात.

पर्णविन्यास : पानांची खोडावरील मांडणी सर्वसाधारणतः त्यांच्या कार्याच्या दृष्टीने सोयीची म्हणजेच आवश्यक तितका प्रकाश मिळेल अशी असते यामध्ये विशिष्ट पद्धतीचा अवलंब करून प्रत्येक पेऱ्यावर एक (उदा., आंबा, वड इ.) दोन (उदा., रुई, पेरू इ.) किंवा अधिक (उदा., कण्हेर, सातवीण इ.) पाने असून शक्यतोवर ती

आ. ११. पर्णभेद : विषमपर्णत्व : (१) कार्डेथ्रीआ, (२) सेंजिटॅरिया भिन्नपर्णत्व : (३) फणसाची एक जाती.एकमेकांवर न येतील अशी दोन, तीन, चार किंवा अधिक उभ्या रांगांत असतात या मांडणीस ‘पर्णविन्यास’ म्हणतात. या बाबतीतील निश्चितपणामुळे वनस्पतींच्या वर्गीकरणात या लक्षणाचा व वर विवेचन केलेल्या अनेक लक्षणांचा (सिराविन्यास, कोरकरचना, उपपर्णाचे अस्तित्व, समात्रता, निवेशन इ.) उपयोग करून घेतला आहे तसेच साधी पाने व संयुक्त पाने काही कुलांत किंवा गणांत फारच सुसंगतपणे आढळल्याने तेही महत्त्वाचे लक्षण मानतात व कित्येक वनस्पती ओळखण्यासाठी अशा लक्षणांचा उपयोग होतो. [→ पर्णविन्यास].


आ. १२. पानांची रूपांतरे : (१) प्रतानपूर देठ, (२) चालणारा नेचा, (३) बिगोनियाचे (प्रजोत्पादक) पान, (४) कलांचो -कंदिका, (५) बिग्नोनिया अंग्विस-कॅटाय.

प्रकार व विशेषीकरण : पानाची व्याख्या करताना त्याच्या हिरव्या रंगास प्राधान्य दिले जात असले, तरी अन्ननिर्मितीखेरीज इतर कार्याच्या दृष्टीने त्यांच्या रंगरूपात फरक पडतो तथापि इतर लक्षणांचाही विचार करून ती फरक पावलेली उपांगे म्हणजे पानेच आहेत, हे ओळखता येते. अन्न साठविल्याने मांसल व जाड असलेली पाने काही बियांत आढळतात ती कधी जाड नसतात पण पुष्कातील अन्नाचे (बीजातील दलिकेच्या बाहेरच्या अन्नाचे) शोषण करून ते वाढत्या अंकुराला उपलब्ध करून देतात, शिवाय ती कधी हवेत वाढून हिरवी बनतात यांना ‘दलिका’ म्हणतात [→ अंकुरण]. हिरव्या नसलेल्या खवल्यासारख्या (शल्कासारख्या) पानांमुळे भूमिस्थित खोडांचे [कंद, दृढकंद, ग्रंथिक्षोड, मूलक्षोड इ. → खोड] व कोरकांचे संरक्षण होते हीच ‘शल्कपर्णे’ कधी अन्नसंचय करून मांसल बनतात (कंद). फुलांच्या कळ्यांना (कलिका) संरक्षण देणारी छदे ही खवल्यासारखीच किंवा मोठी असतात

[→ फूल पुष्पबंध] तसेच अनेक फुले किंवा फुलोरे ज्यांमुळे आकर्षक बनतात ती दले (संदले, प्रदले इ.) पानांचेच प्रकार होत. फुलातील प्रजोत्पादनक्षम अवयव (केसरदले, किंजदले) आणि अबीजी वनस्पतींतील [→ वनस्पति, अबीजी विभाग] ‘बीजुकपर्णे’ ही पानेच मानली जातात. अशाच प्रकारे अनेक इतर कार्ये करण्यास (नित्य कार्यांशिवाय किंवा त्याऐवजी) पानांना विशेषत्व प्राप्त झालेले आढळते.

आधार : पानांचे भिन्न भाग प्रतानरूप बनतात. प्रतान हे स्पर्शग्राही व तंतूसारखे उपांग असते मोरवेलीचे देठ (आ. १२), वाटाण्याची काही दले (आ. ३), कळलावीचे टोक (आ. ८) ही यांपैकीच होत. केळ, कर्दळ, गवते

(आ. २) यांचे आवरक पर्णतल व ⇨ शिंगाडा, हायसिंथ [→ हायसिंथ] यांचे तरंडासारखे फुगलेले देठ यांचाही उपयोग वनस्पतींना आधाराकरिता होतो. ⇨ बिग्नोनिया   ही वेल आपल्या नख्यांनी आधारावर चढते ह्या नख्या (अंकुश) दलांची रूपांतरे होत.

अन्नसंचय : पाणी किंवा अन्नाचा साठा केल्याने पाने मांसल बनतात (उदा., कोरफड, घायपात, पानफुटी) कंदातील शल्कपर्णे पाणी साठविण्यास, काही ⇨ अपिवनस्पतींची पाने (उदा., बाशिंग नेचा) धूळ-कचरा साठविण्यास अथवा पाणी धरून ठेवून ते सावकाशपणे शोषण्यास (उदा., बिलबर्जिया ) विशेषत्व पावलेली असतात.

शोषण : पाण्यात बुडून वाढणाऱ्या काही ⇨ जलवनस्पतींची पाने प्रत्यक्ष पाणी व लवणे शोषून घेतात. काही मरुवनस्पतींची पानेही विशिष्ट केसांच्या द्वारे तसेच प्रत्यक्ष पाणी शोषण्यास समर्थ असतात (उदा., अननसाच्या कुलातील–ब्रोमेलिएसी–काही वनस्पती) ⇨ कीटकभक्षक वनस्पतींची पाने कीटकांच्या शरीरातून अन्नरस शोषण्यास आवश्यक असलेले संरचनासामर्थ्य दर्शवितात.

प्रकाशसंश्लेषण : हि अन्ननिर्मितीची मौलिक प्रक्रिया हिरवी पाने नेहमीच करतात पण तत्सम रूपांतरित खोडेही नेहमी करतात शिवाय सपक्ष देठ (उदा., लिंबू, पपनस), वृंतपर्णे, उपपर्णे (उदा., वाटाणा, लाख इ.), हिरवी छदे, छदमंडले (उदा., सूर्यफूल) आणि संदले [→ फूल] इत्यादींचाही उल्लेख येथे करणे आवश्यक आहे.


संरक्षण : कोरकांचे संरक्षण उपपर्णे, शल्कपर्णे इत्यादींपासून होते प्राण्यांपासून ज्या काट्यांच्या (कंटकांच्या) द्वारे संरक्षण होते ते काटे पाने व उपपर्णे यांच्या रूपांतराने बनलेले असतात (उदा., निवडुंग, बोर, बाभूळ इ.). छदे व छदमंडले [→ फूल] कलिकांचे संरक्षण करतात.

प्रजोत्पादन : काही वनस्पतींची पाने तोडून जमिनीवर टाकल्यानंतर (उदा., पानफुटी, बिगोनिया ) त्यांपासून अनेक नवीन वनस्पती बनतात. काही नेचांच्या (उदा., ॲडिअँटम कॉडेटम ) व कलांचोच्या पानावरच्या कंदिकांचे कार्य हेच असते (आ. १२).

आकर्षण : कित्येक फुलोऱ्यांचे (उदा., पानचेटी, बुगनविलिया ) आकर्षणाचे साधन छदे किंवा छदमंडल असते. आकर्षिलेले प्राणी ⇨ परागण  घडवून आणतात व नवीन वनस्पती निर्माण करण्यास (प्रजोत्पादनास) मदत करतात.

कोरकसंरचना : खोडावरच्या कळ्यांतील (कोरक, कलिका) सूक्ष्म पाने अतिमर्यादित जागेत व अविकसित अवस्थेत अतिशय दाटीवाटीने पण विशिष्ट पद्धतीने मांडलेली असतात यातील पानांच्या वैयक्तिक मांडणीस

पर्णवलन (दलवलन) आणि अनेक पानांच्या पारस्परसापेक्ष मांडणीस पर्णसंबंध [→ पुष्पदलसंबंध] म्हणतात दोन्हींत अनेक प्रकार आढळतात.

पृष्ठभाग : काही पाने पातळ (उदा., जास्वंद, तुळस इ.) काही जाड व चिवट (उदा., आंबा, जांभूळ, कण्हेर इ.) तर काही मांसल (उदा., पानफुटी, कोरफड इ.) असतात. काहींचा पृष्ठभाग गुळगुळीत (उदा., उंडण, करंज), काहींचा मऊ केसाळ (उदा., तीळ, समुद्रशोक, तुळस इ.), राठ केसाळ (रोमश उदा., काकडी, पारिजातक इ.), कंटकित (काटेरी उदा., रिंगणी, काटेधोतरा इ.), चिकट (प्रपिंडीय उदा., पिवळी तिळवण), खरबरीत (उदा., पराया, पारिजातक इ.), मेणचट (उदा., घायपात, कमळ इ.), मखमली (उदा., अळू, कॅलॅडियम ), लवदार (लोमश उदा., ऐसर, रुई इ.) इत्यादी प्रकार सामान्यतः आढळतात.

उगम, विकास, परंपरा इत्यादी : पान हे वनस्पतींचे एकमेव मूलभूत उपांग आहे व प्रदले, केसरदले व बियांची आवरणे ही त्याची रूपांतरे होत, अशी जुनी कल्पना होती व प्रसिद्ध जर्मन कवी गटे हे या कल्पनेचे पुरस्कर्ते होते. वस्तुतः फुलातील परिदले व इतर पानासारखे अवयव ही प्रारंभिक पानासारख्या उपांगांपासून क्रमाने विकास पावली असावी, असे आजही मानले जात असले, तरी पान हेच वनस्पतींचे एकमेव व प्रारंभिक उपांग असावे, असे आज मानीत नाहीत. फार प्राचीन व साध्या स्थलवासी वाहिनीवंत वनस्पतींच्या ⇨ सायलोफायटेलीझ  प्राचीन शिळारूप अवशेषांच्या (जीवाश्मांच्या) अभ्यासाने असे आढळले आहे की, त्यांपैकी कित्येकांना खरी पाने वा तत्सम पाती नसून त्यांचे शरीर फक्त द्विशाखाक्रमी खोड व फांद्यांचे बनलेले होते आणि प्रकाशसंश्लेषणाचे कार्य तेच अवयव करीत असावेत. कालपरत्वे यांच्या काही शाखांची मांडणी एकाच पातळीत व सपाट झाली, त्यांच्या शिरांना जोडण्यास नरम ऊतकांचे जाळे बनले, आकारमानात घट व इतर बरेच फ़रक पडून आजच्यासारखी विविध प्रकारची पाने बनली असवीत, असे बहुधा मानले जाते. काही झाडांचे (उदा., पाइन, देवदार इ.) शंकू अथवा ⇨ एक्विसीटमचे शंकू यांसारखी जटिल इंद्रिये यांचा उगम प्रत्यक्ष पानांशी जोडणे कठीण असले, तरी ते रूपांतर पावलेले व ऱ्हास झालेले शाखा-प्ररोह असावेत, हे त्यांचे संबंधित जीवाश्म पाहून समजणे कठीण नाही.

सर्वच वाहिनीवंत वनस्पतींच्या पानांचा क्रमविकास (उत्क्रांती) एकाच प्रारंभिक अवयवापासून होत आला आहे असे नाही. नेचे व बीजी वनस्पतींची [→ वनस्पति, बीजी विभाग] मोठी पाने (गुरुपर्णे) प्ररोह-व्यूहाच्या भागाची रूपांतरे होऊन विकास होत आली असावीत असे मानतात म्हणजेच ती एका अर्थी पार्श्विक प्ररोहरूप होत. उलट, इतर गटांतील [→ सिलाजिनेलेलीझ लायकोपोडिएलीझ इ.] लहान पाने (लघुपर्णे) हळूहळू क्रमविकासात वाहिनीवंत बनलेल्या खोडावर उगवलेल्या उत्थिताप्रमाणे (उपांगाप्रमाणे) असावीत असे दिसते. कोणतीही विचारसरणी खरी धरली, तरी सर्व वाहिनीवंत वनस्पतींच्या पानांचा उगम व विकास यांमध्ये काही साम्ये निश्चित आढळतात, असे दिसून आले आहे.

पानाच्या विकासासंबंधी थोडा उल्लेख मागे आरंभी आलाच आहे. अलीकडे या विषयावर प्रायोगिक अन्वेषण (संशोधन) सुरु आहे. तीक्ष्ण चाकूने खोडाच्या अग्रस्थ कोरकातील आद्यपर्णांवर त्यांच्या भिन्न अवस्थेत शस्त्रक्रिया करून पुढील वाढीचे निरीक्षण करणे, तसेच ते भाग अलग करून पोषणक्षम व निर्जंतुक संवर्धक द्रवात त्यांची कृत्रिम वाढ करून [→ ऊतकसंवर्धन] त्यांचे स्वरूप समजून घेणे यांसारख्या प्रयोगांवरून असे निष्कर्ष काढले गेले आहेत की, आद्यपर्णांच्या अक्षाशी असलेल्या एकांगी संबंधामुळे व आनुवंशिक कारणांनी त्यांची समात्रता ठरते आणि मर्यादित वाढ होते. आद्यपर्णात त्याचा भावी मूलभूत साचा निश्चित झाल्यावरही आकारमान, आकार वगैरे बाबतींत कृत्रिम संवर्धनात विशिष्ट कारणांनी काही बदल घडविता येतो. पर्णविन्यासात दिसून येणारा निश्चित क्रम आद्यपर्णाच्या

विभज्येतील क्षेत्रात विशिष्ट रासायनिक घटकांच्या म्हणजे

हॉर्मोनांच्या प्रभावामुळे पाळला जात असून खोडाच्या विकासात पानांचा प्रभाव याच प्रकारे पडून त्यांचे परस्परसंबंध, संरचना व कार्ये यांबाबत योग्य असेच राखले जातात.

उपयुक्तता : पानांचा उपयोग वनस्पतींना किती भिन्न प्रकारे होतो, याचा काही तपशील मागे आलाच आहे. विशेषतः पानांचा अन्ननिर्मितीकरिता होणारा उपयोग फार महत्त्वाचा आहे, कारण सर्वच प्राणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अन्नाकरिता वनस्पतींवर अवलंबून आहेत. स्वतः वनस्पतीच त्या अन्नावर वाढते व आपले जीवनकार्य चालविते. मूळ, खोड, पाने, फळे व बीजे यांत साठविलेल्या अन्नावरच प्राणिसृष्टी जगते.

मनुष्यप्राणी आज कित्येक वर्षे पानांचा विविध प्रकारे उपयोग करीत आला असून दिवसेंदिवस नवीन उपयोगांची यादी वाढतच आहे. अन्नाकरिता अनेक पालेभाज्या वापरल्या जातात. उदा., माठ, पोकळा, मेथी, चुका, चाकवत, मयाळ, अंबाडी, मोहरी, करडई, हरभरा, अळू, कोबी (एक मोठी पानांची कळी), कांद्याच्या पाती, पालक, सालीट इ. स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यात तमालपत्र, कोथिंबीर, पानओवा, पुदिना इ. चव व वास यांकरिता वापरतात. चहासारख्या लोकप्रिय पेयाला त्या झाडाची अत्यंत कोवळी पाने खुडून घेतात. औषधांमध्ये बऱ्याच वनस्पतींची पाने वापरात आहेत, उदा., कोरफड, अडुळसा, निर्गुडी, गवती चहा, ब्राह्मी, सोनामुखी, आर्टेमिसिया सिना (सँटोनीन), कडूनिंब, सताप, नागवल्ली (नागवेली) इ. सर्वसामान्य आहेत. धागे व दोऱ्यांकरिता घायपात, अननस, मॅनिला हेंप इ. मरवा, दवणा, सब्जा, पुदिना, पाच इत्यादींची पाने सुगंधी द्रव्याकरिता परिचित असून बागेत शोभेकरिता भिन्न प्रकारचे नेचे, क्रोटॉन, ॲरेलिया, कॅलॅडियम, कोडियम, पाम, ड्रॅसीना, नागीन, डिफेनबेकिया, पॅनॅक्स  इ. लावली जातात. पंखे, झाडण्या, चटया इत्यांदींकरिता शिंदी, माड, ताड, खजूर, पानकणीस इत्यादींच्या पानांचा सर्रास उपयोग चालू आहे. पळस, केळ, मोह व कमळ यांची पाने जेवण्याकरिता (द्रोण व पत्रावळींकरिता) फार पूर्वीपासून लोक वापरीत आले आहेत. ⇨ कोकाच्या पानांपासून कोकेन व भांगेच्या पानांपासून मादक पेय बनवितात. तंबाखूची पाने धूम्रपानासाठी जगभर आज अनेक वर्षे पिकवली जात आहेत. कित्येक झाडांचा पाला (सुका किंवा ओला) जनावरांना चारा म्हणून घालतात, उदा., गवते, लसूण घास, वड, पिंपळ, शिरीष, फणस, बाभूळ, मका इत्यादी. हिंदूंच्या धार्मिक विधींत बेल, आघाडा, आंबा, नागवल्ली, शमी, पांढरा चाफा, दर्भ व दूर्वा, रुई, माका, तुळस इत्यादींचा उपयोग वर्षानुवर्षे चालू आहे. भारतीयांना जेवणानंतर नागवल्लीच्या पानांचा बनविलेला ‘विडा’ (तांबूल) गुंजेच्या पानांसह (किंवा त्याशिवाय) फार पूर्वीपासून प्रिय आहे. अनेकांना एरवीसुद्धा तंबाखूच्या पानासह तांबूल आवश्यक वाटतो. पानांमुळे झाडे सावली देतात व ती तापमान वाढू देत नाहीत, रस्त्याच्या दुतर्फा झाडे (विशेषतः सदापर्णी) लावण्यात हा हेतूही असतो.

पाश्चात्त्य देशांत ⇨ ऑलिव्हची पाने शांतता व आशा यांचे प्रतीक मानली जातात. तसेच ⇨ ओकची पाने शक्ती, विजय व सन्मानाचे प्रतीक म्हणून रोमन लोक आपल्या योध्द‌्यांना त्या पानांनी भूषवीत असत. ग्रीक लोकांत विजयी खेळांडूंना व अंमलदारांना ⇨ लॉरेलच्या   पानांचे हार देण्याची प्रथा होती. भारतात हिंदू लोक ‘दसऱ्याचे सोने’ म्हणून ⇨ आपट्याची पाने परस्परांस देतात व ‘सीमोल्लंघना’ ची आठवण देतात.

पहा : क्रमविकास पर्णवलन पर्णविन्यास पुष्पदलसंबंध प्रकाशसंश्लेषण प्रजोत्पादन फूल बीज वनस्पति व पाणी विभज्या शारीर, वनस्पतींचे श्वसन, वनस्पतींचे हॉर्मोने.

संदर्भ : 1. D’Almeida, J. F. R. Mullan, D. P. Lessons in Plant Morphology, Bombay, 1946.

             2. Dutta, A. C. A Classbook of Botany, Calcutta, 1959.

             3. Lawrence, G. H. M. An Introduction to Plant Taxonomy. New York, 1958.

             4. Mitra, J. N. Systematic Botany and Ecology, Calcutta, 1964.

             5. Parandekar, S. A. and others, A Classbook of Botany, Poona, 1962.

परांडेकर, शं. आ.