जांभूळ : (हिं. जामुन, काला जाम गु. जांबुडा सं. जंबु, महास्कंध, नीलफल इं. ब्लॅक प्लम, जावा ॲपल लॅ. सायझिजियम क्युमिनी, यूजेनिया जांबोलाना कुल-मिर्टेसी). मूळचा भारताच्या पश्चिम घाटातील हा सदापर्णी व दाट छाया देणारा मोठा वृक्ष आता भारतात व पाकिस्तानात सर्वत्र शिवाय श्रीलंका, मलाया आणि ऑस्ट्रेलिया येथे रस्त्यांच्या दुतर्फा, बागेत आणि शेतात लावलेला आढळतो प्राण्यांद्वारे विखुरलेल्या बियांपासूनही अनेक ठिकाणी हा उगवलेला आढळतो. खोडावरची साल खवल्यांनी सुटून जाते पाने साधी, समोरासमोर, चिवट, गर्द हिरवी, टोकदार, लंबगोल व त्यांच्यावर अंतर्धारी (कडांजवळून जाणारी) शीर असते फुलोरे शाखायुक्त आणि शेवटी गुच्छाप्रमाणे असून त्यांवर मार्च–मेमध्ये लहान, पांढरट किंवा हिरवट सुगंधी फुले येतात. संवर्त आतून पिवळट, संदले अस्पष्ट पाकळ्या चार, सुट्या, टोपणाप्रमाणे व नंतर पडून जाणाऱ्या केसरदले असंख्य व लांब असतात [→ फूल]. मृदुफळ लांबट वाटोळे, जांभळे, मांसल व एकबीजी असते. इतर सामान्य शारीरिक लक्षणे जंबल कुलात [→ मिर्टेसी] वर्णिल्याप्रमाणे असतात. याचे लाकूड लालसर करडे, मध्यम कठीण व पाण्यातही टिकाऊ असते ते घरबांधणी, खांब, तुळया, गाड्या, नावा व शेतीची अवजारे इत्यादींकरिता उपयुक्त असते. सालीतील टॅनिनामुळे ती कातडी रंगविण्यास व कमाविण्यास वापरतात. पक्व फळे लोक आवडीने खातात. ती गोड, आरोग्यास हितकर व स्तंभक (आतड्याचे आकुंचन करणारी) असतात पोर्टवाइनप्रमाणे त्यांच्यापासून मद्य तयार करतात. फळांचा उपयोग औषधाकरिता होतो पोटाच्या तक्रारीवर व मधुमेहावर ती देतात. बिया गुरांना चारतात. पाने रेशमी किड्यांना पोसण्यास उपयुक्त. याच्या लाकडाचे ओंडके शेवाळलेल्या पाण्याच्या साठ्यात टाकले असता ते पाणी निवळते. बृहत्संहिता, कोटिलीय अर्थशास्त्र  महाभारताच्या आरण्यक पर्वात जम्बुवृक्षाचा उल्लेख आला आहे. हे झाड असेल तेथे जमिनीत पाणी सापडेल अशी नोंद आहे. आयुर्वेदीय चिकित्सेत अतिसारावर पाने आणि साल उपयुक्त असून बियांचे चूर्ण बहुमूत्रतेवर व जांभळांचा रस स्तंभन व संकोच यांकरिता उपयुक्त असल्याचे सांगितले आहे.

दोंदे, वि. प.

जांभळाचे झाड साधारणपणे ५०–६० वर्षे जगून, १०–१५ मी. उंच वाढून त्याचा प्रचंड वृक्ष बनतो. उष्ण आणि समशीतोष्ण हवामानातले हे झाड शीत हवामानातही वाढते. समुद्रसपाटीपासून ६०० मी. हून जास्त उंचीवरील प्रदेशात ते चांगले वाढत नाही. जांभळाला फुले यावयाच्या वेळी व फलधारणेच्या वेळी हवामान कोरडे असावे लागते. पावसाळ्याच्या सुरुवातीच्या पावसाने फळे चांगली पोसतात, पिकलेल्या फळांना रंग चांगला येऊन त्यांना चवही चांगली येते. मध्यम खोलीच्या व पाण्याचा निचरा चांगला होणाऱ्या जमिनीत याची वाढ चांगली होते. भारी जमिनीत झाडे खूप वाढतात पण फळ उशीरा येते. याला कोणत्याही प्रकारची जमीन चालते.

याची लागवड इतर फळझाडांसारखी व्यापारी तत्त्वावर खास मोठ्या प्रमाणावर संघटितपणे भारतात करीत नाहीत. हे नगदी पिकात गणले जात नसल्यामुळे त्याच्या अभिवृद्धीच्या अन्य प्रकारच्या किफायतशीर पद्धती भारतात रूढ नाहीत. बियांपासून अभिवृद्धीची प्रथा रूढ आहे. त्यामुळे फळाची प्रत व गुणधर्म यांमध्ये तफावत आढळते. इंडोनेशियामध्ये जांभळाच्या अभिवृद्धीकरिता आंब्यासाठी वापरण्यात येणाऱ्या फोरकर्ट पद्धतीप्रमाणे कलमे केली जातात. कोठे कोठे भेट कलमे अगर बगल कलमेही करतात [→ कलमे]. दुसऱ्या फळझाडांच्या बागांचे वाऱ्यावादळापासून संरक्षण करण्यासाठी ही झाडे वारा येणाऱ्या  दिशेला वातप्रतिबंधक म्हणून रांगेने लावतात. भारतात पद्धतशीर लागवड करीत नसल्यामुळे वैयक्तिक झाडांची खतपाणी  देऊन निगा राखतात. त्यामुळे आंतर मशागतीचा प्रश्न नसतो.

रोपापासून वाढविलेल्या झाडाला ८–१० वर्षांनंतर फळे येऊ लागतात. कलमी झाडांना लवकर फळे येतात. खास मेहनत मशागत केलेल्या झाडाचे फळ पारव्याच्या अंड्याएवढे मोठे होते. जंगली झाडांची फळे लहान असतात. फुले मार्चमध्ये येऊन फळे जून-जुलैमध्ये (वैशाख-ज्येष्ठात) पिकून तयार होतात. त्यांच्या सालीचा बाहेरचा भाग काळा दिसतो पण आतला मगज (गर) तांबूस गुलाबी असतो. त्याची चव आंबट-गोड आणि किंचित तुरट असते. साल फार पातळ असल्यामुळे पक्व फळे फार काळजीपूर्वक हाताळावी लागतात. मोठी फळे असलेल्या झाडांना ‘रायजांभूळ’ म्हणतात. प्रत्येक झाडापासून दरसाल ५०–७५ किग्रॅ. फळे मिळतात.

पाटील, अ. व्यं.