वत्सनाभ : (१) मूलक्षोड, (२) पान, (३) स्त्री - पुष्पवंध, (४) पुं - पुष्पबंध, (५) संयुक्त फळ, (६) स्थूलकणिश.वत्सनाभ : (रूख-अळू लॅ. लॅजिनॅन्ड्रा ओव्हॅटा, लॅ. टॉक्सिकॅरिया कुल-अँरॉइडी). फुसझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] एक ओषधीय [⟶ ओषधि] जलवनस्पती. हिचा प्रसार श्रीलंकेत व भारतात (कोकण ते केरळपर्यंत आणि सह्याद्रीवर सु. १,२०० मी. उंचीपर्यंत) आहे. ती दलदलीत व पाण्याच्या ओहोळांच्या दुतर्फा दाटीवाटीने वाढलेली आढळते. तिचे सु. ५ सेंमी. जाड व जमिनीत आडवे सरपटत वाढणारे खोड [मूलक्षोड ⇨ खोड] चिवट व वलयांकित असून त्यावर कृमिरूप मुळे व मोठी, साधी (१५−३७.५ × ५−१२.५ सेंमी.) दीर्घावृत्ताकृती, नागमोडी किनारीची, लांब देठाची पाने असतात त्यांच्या तळाशी लहान आवरक (वेढून राहणारी) उपांगे (उपपर्णे) असतात. मार्च ते एप्रिलमध्ये स्थूल कणिश प्रकारचे फुलोरे येतात [⟶ पुष्पबंध] ते पुं-आणि स्त्री-पुष्पबंध अशा प्रकारचे असतात पुं-पुष्पबंध लहान दांड्यासारखा व स्त्री-पुष्पबंध गोलसर झुबक्यासारखा असतो त्यावरील विशेष प्रकारचे आवरण (महाछद) खाली नळीसारखे, वर पसरट व टोकास शेपटीसारखे असून त्यावर परिदलहीन (संदले आणि प्रदले नसलेली) व एकलिंगी फुले येतात [⟶ फूल]. त्यांना तीव्र वास असून अनेक कॅरियन प्रकारच्या माश्यांचे थवे त्यांवर येतात. परागकोश पिवळे दाटीने उगवलेले आणि स्त्री-पुष्पबंधावर अनेक स्त्री-पुष्पांचे किंजपुट (स्त्री-केसराचे तळभाग) अनेक मंडलांत असतात. बीजके ४−८, तलस्थ बीजकधानीवर असतात. संयुक्त फळ गोलसर (३.८ ५ सेंमी. व्यासाचे) आणि अंशतः तडकणारे असून बी लांबट (१० मिमी. लांब), लहान व खोबणीयुक्त असते. फुलांची आणि वनस्पतीची इतर सर्वसामान्य शरीरिक लक्षणे ⇨ॲरॉइडी अथवा सुरण कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात.

वत्सनाभ विषारी असून तिचा रस जहाज असतो तो खाजेवर लावण्याच्या मलमात घालतात. तो कृमिनाशाकही असतो. गाठदार खोड मूत्रपिंडाचे विकार, हृदयविकार, सूज इत्यादींवर वापरतात.

वैद्य,प्र. परांडेकर, शं. आ.