सब्जा (ऑसिमम बॅसिलिकम ) : पाने व फुलांच्या शाखित मंजृया यांसह फांदी.

सब्जा : [ हिं. सब्झा, बर्बर, बुबई तुलसी गु. दमरो, सब्जे क. कामकस्तुरी, सज्जागिड सं. बर्बरी, सुरस, वेधी, अजगंधिका, मंजरिका  इं. स्वीट बेसिल, कॉमन बेसिल लॅ. ऑसिमम बॅसिलिकम, कुल-लॅबिएटी ( लॅमिएसी )]. फुलझाडांपैकी [→ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] ⇨तुळशी च्या आणि तसेच रानतुळस व कापूर-तुळस यांच्या प्रजातीतील ही परिचित सुगंधी वनस्पती सु. ३०-९० सेंमी. उंच, सरळ शाखायुक्त गुळगुळीत ⇨ओषधी असून व्यावहारिक महत्त्वाची आहे. तिच्या ऑसिमम ह्या शास्त्रीय प्रजातीत सु. १५० जाती असून त्यांपैकी भारतात पाच जाती आढळतात. मध्य आशिया, पंजाब व वायव्य भारत ही सब्जाची मूलस्थाने असून सर्व भारतात उदयानातून तिची लागवड एक सुगंधी वनस्पती म्हणून केलेली आढळते. तिच्यापासून काढलेल्या उपयुक्त सुगंधी तेलाकरिता अनेक देशांत तिची मोठया प्रमाणात लागवड करतात. भारतात केरळ, कानपूर, दिल्ली, गाझीपूर, जम्मू व महाराष्ट्र इ. ठिकाणी कमी-जास्त प्रमाणात ती लागवडीत आहे. तिची पाने साधी, समोरासमोर (२·५ – ५ सेंमी.) मुकुलाकृती ( कळीसारखी )- कुंतसम ( भाल्यासारखी ), टोकास निमुळती, दातेरी किंवा अखंड व प्रपिंडीय (ग्रंथियुक्त ) असतात, फुले सच्छद ( तळाशी लहान उपांगे असलेली ), फार लहान, पांढरी किंवा फिकट जांभळी असून साध्या किंवा शाखित मंजऱ्यांवर[पुंजवल्लऱ्यांवर → पुष्पबंध] सपाट भागात फेब्रुवारीपासून पुढे (डोंगराळ भागांत जूनच्या पुढे ) येतात. शुष्क फळे ( कपालिका ) फार लहान (२ मिमी. लांब लांबट,खाचदार व काळी असतात.बिया फार सूक्ष्म असतात.इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨लॅबिएटी ( लॅमिएसी ) कुलात ( किंवा तुलसी कुलात ) वर्णन केल्याप्रमाणे असतात. काहीशी तुळशीसारखीच परंतु अनेक विविध रूपांत ही ओषधी दिसते व फुलांत [→ परागण]असते, त्यामुळे ह्या वनस्पतीचे अनेक प्रकार आढळत असून त्यामध्ये खोड, पाने व देठ यांचे रंग, केसाळपणा, उंची, वाढीची रीत यांमध्ये भेद आढळतात. त्यानुसार उपजाती, प्रकार व वाण ओळखले जातात. सामान्य पांढरट हिरव्या प्रकाराला ग्लॅबॅटम आणि निळसर लाल प्रकाराला पुर्पुरेसेन्स म्हणतात. बॅसिलिकम प्रकारात पाने कुरळी असून लागवडीकरिता तो अधिक पसंत केला जातो. याची फ्रान्समध्ये तेलाकरिता मोठया प्रमाणावर लागवड करतात. ते तेल फार उच्च प्रतीचे असते.

सब्जाची लागवड बिया लावून करतात, त्याकरिता पन्हेरीत प्रथम रोपे तयार करतात. सपाट प्रदेशात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आणि टेकडयांत मार्च -एप्रिलमध्ये बियांची लागण करून नंतर सु. ३० सेंमी. अंतरावर योग्य ठिकाणी शेतात ४० सेंमी. अंतरावरच्या रांगांत रोपे लावतात. सु. २ ते ३ महिन्यांत झाडे कापणीस ( फुलोऱ्यांसह ) योग्य होतात. त्यांची जमिनीसरपट कापणी करून व पेंडया बांधून त्या सुकवितात. सुकी पाने व फुलोरे काढून घेऊन ते बंदिस्तपणे डब्यात किंवा खोक्यात ठेवतात. दर हेक्टरी सु. ६,८०० किगॅ. माल दोन कापणीत मिळतो असे कानपूरमध्ये आढळले आहे.

सब्जाला साधारण लवंगेसारखा वास व लवणमय ( काहीशी खारट ) चव असते. त्यापासून ‘ ऑइल ऑफ बेसिल ’ या नावाचे सुगंधी व बाष्पनशील (उडून जाणारे ) तेल मिळते, त्याचा उपयोग वस्तूंना स्वाद येण्यास व अत्तराकरिता होतो. भिन्न देशांत काढलेल्या तेलात भिन्नत्व आढळते, त्यानुसार तेलाचे चार प्रकार केले आहेत : (१) यूरोपियन प्रकार यूरोप व अमेरिकेतील सब्जापासून काढतात, त्यात मेथिल शॅविकॉल व लिनॅलूल असते पण कापूर नसतो, त्याच्या मधुर सुवासामुळे त्याचा दर्जा उच्च मानतात. (२) रीयुनियन प्रकार प्रथम रीयुनियन बेटात तयार झाला, आता ते तेल कॉमोरो, मादागास्कर आणि सेचेलिस या बेटांत काढतात.  त्यामध्ये मेथिल शॅविकॉल व कापूर असतो पण लिनॅलूल नसते. के तेल यूरोपियन प्रकारापेक्षा कमी प्रतीचे असते. (३) मेथिल सिन्नॅमेट प्रकार बल्गेरिया, सिसिली, ईजिप्त, भारत व हैती येथे काढतात. त्यात मेथिल शॅविकॉल, लिनॅलूल व मेथिल सिन्नॅमेटचा बराच अंश असतो. (४) यूजेनॉल प्रकारचे तेल जावा, सेचेलिस, सामोआ आणि रशिया या देशांत मिळविले जाते.

भारतातील चालाकुडी ( केरळ ) येथील तेलाला मोहक व लव्हेंडर  सारखा वास असून त्यात भरपूर लिनॅलूल व मेथिल सिन्नॅमेट असते. कानपूर ( एच्. बी. टेक्निकल इन्स्टिटयूट ) येथील तेलात मेथिल सिन्नॅमेट, लिनॅलूल, मेथिल शॅविकॉल व ऑसिमेन ही द्रव्ये असतात.

यूरोपियन व रीयुनियन प्रकारच्या तेलाचा उपयोग स्वादाकरिता मिठाई, भाजी व खादयपदार्थ ( पाव, केक, बिस्किटे इ.) खिरीसारखे पदार्थ, टोमॅटो सॉस, लोणची, विशेष प्रकारचा शिर्का ( व्हिनेगर ) पेये, मांसाचे मसालेदार पदार्थ, केट्चप व सॉसेज इत्यादींत घालण्यास करतात. दातांशी व तोंडाशी संबंधित पदार्थात व काही अत्तरांतही त्याचा वापर करतात. साबणात वापरली जाणारी सुगंधी तेले यूरोपियन तेलापेक्षा रीयुनियन प्रकारच्या तेलामुळे अधिक सुधारली जातात, याउलट यूजेनॉल व मेथिल सिन्नॅमेट अदयाप व्यापारात आलेली नाहीत. बेसिल तेल कीटकांना दूर ठेवणारे व त्यांचा नाश करणारे असून घरांत माश्या व डासांचा उपद्रव कमी करण्यास उपयुक्त असते. काही सूक्ष्मजंतूंचा नाश करण्यासही ते उपयुक्त असते. सब्जाच्या बियांना वास नसतो, परंतु त्यांची चव तेलकट व काहीशी तिखट असते, पण पाण्यात टाकल्यास त्या बुळबुळीत होतात. त्यात स्थिर तेल असते. सब्जा दीपक ( भूक वाढविणारा ), कृमिनाशक, , कफोत्सारक (कफ पाडून टाकणारा ), वायुनाशक, उत्तेजक व श्वसनसंबंधित आहे. त्याचा फांट मुखदुर्गंधीवर गुळण्यांकरिता उपयुक्त असतो. पानांच्या रसाने मादक परिणाम होतो व घशातील दाह कमी होतो. नाकात फवारणीकरिता, कानदुखीच्या औषधांकरिता आणि नायटयावर लावण्यास तो रस वापरतात. होमिओपॅथिक औषधात सब्जाचा वापर करतात. बिया शामक, उत्तेजक, मूत्रल (लघवी साफ करणाऱ्या ), शीतल ( थंडावा देणाऱ्या ) असून मूळ-व्याधीवर व बद्धकोष्ठतेवर देतात, त्यांचे पोटीस वणावर लावतात. बियांमुळे तहान कमी लागते. डोळ्यांच्या आगीवर खोडे व पानांचा काढा डोळे धुण्यास वापरतात. चरकसंहितेत ‘ सुरस ’ ही संज्ञा तुळशीकरिता वापरली असून ते नाव सब्जाला पर्यायी म्हणून दिलेले इतरत्र आढळते. आयुर्वेदात सब्जाचे औषधी गुणधर्म सांगितले आहेत. बर्बरी हा तुळशीचा प्रकार असल्याचे सांगितले आहे. सब्जाच्या प्रजातीतील दुसरी एक कॅम्फर बेसिल नावाची आयात जाती (ऑसिमम किलिमॅण्डॅस्कॅरिकम ) प. बंगाल, कर्नाटक, महाराष्ट्र, तमिळनाडू, केरळ, काश्मीर व उत्तर प्रदेश येथे कापराकरिता लागवडीत आणली असून त्यापासून काढलेला ⇨कापूर औषधांत फार उपयुक्त असल्याचे आढळले आहे. वेदना, लचकणे, मुडपणे इत्यादींवर बाहेरून लावण्याच्या औषधांत तो घालतात.

पहा : कापूर तुळस लॅबिएटी.

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VII, New Delhi, 1966.

            2. Jain, S. K. Medicinal Plants, New Delhi, 1968.

            3. Kirtikar, K. R. Basu, B. D. Indian Medicinal Plants, Vol. III, New Delhi, 1975.

जमदाडे, ज.वि. परांडेकर, शं.आ.