पिंपळी : (हिं. पिप्पल, पिप्पल मूल गु. पिपली क. हिप्पली, तिप्पली सं. पिप्पली, मागधी इं. लाँग पेपर लॅ. पायपर लॉंगम कुल-पायपरेसी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पती, आवृतबिज उपविभाग] ह्या सुगंधी बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणार्‍या) व बारीक वेलची मूलस्थान श्रीलंका, फिलिपीन्स बेटे भारत असून मागधी या संस्कृत नावावरून ती मगध (उत्तर बिहार) भागात विशेषकरून आढळली असणे शक्य आहे. तथापि भारतातील उष्ण व दमट प्रदेश, मध्य हिमालय ते आसाम, खासी आणि मिकीर टेकड्या, बंगालमधील लहान टेकड्या, सह्याद्री भागातील सदापर्णी जंगले आणि कोकण ते त्रावणकोरपर्यत इ. प्रदेशांत आढळते. तमिळनाडू, आसाम, प. बंगाल व चेरापुंजी येथे ती लागवडीत आहे. रोमन लोक पिंपळीचे चाहते होते. मध्ययुगात तिला बरेच महत्त्व होते.हिच्या बारीक खोडांवर आणि फांद्यांवर साधी, एकाआड एक, गुळगुळीत, अखंड पाने असतात वरची पाने लांबट, अंडाकृती, बिनदेठाची, क्वचित तळाशी खोडास वेढणारी असून खालची पाने लांब देठाची, ५-९×३-५ सेमी., टोकदार व ह्यदयाकृती असतात.⇨ कबाबचिनी व ⇨ मिरे यांच्या वंशातील ⇨पायपरेसी कुलातील (मिरी कुलातील) असल्याने अनेक सामान्य लक्षणांत त्यांच्याशी तिचे साम्य आहे. फुलोरे (कणिशे) एकलिंगी, लांबट, चितीय, सवृंत (देठ असलेले) असून पुं-कणिशे बारीक पण लांब, २.५-७.५ सेमी. आणि स्री-कणिशे १.३-२.५ सेमी.×४-५ मिमी. असतात. मृदूफळे ०.२५ सेंमी. व्यासाची,  लहान, पिकल्यावर पिवळट नारिंगी, नंतर हिरवट काळी असून जाड व मांसल फुलोर्‍याच्या ३ सेंमी. लांब अक्षात रूतलेली असतात.

पिंपळी : (1) फुलोऱ्यांसह वनस्पितीची फांदी, (2)फुलेरा, (3) बंगाली(लेंडी), (4) सिंगापूरी(मलायी), (5)गोल (आसामी), (6)असली (मुर्सिदाबादी)जावा, बाली व जवळची बेटे येथे पिंपळीची दुसरी जाती (मलायी पायपर रेट्रोफ्रॅक्टम किंवा पा. चाबा) लागवडीत असून तिचे गुणधर्म सर्वसाधारणपणे भारतीय पिंपळीप्रमाणेच आहेत. भारतात मलेशिया व सिंगापूर येथून पिंपळीची मोठी आयात होते (१९६६-६७ मध्ये, १,६२,००० किग्रॅ.) भारतीय पिंपळीची पाकिस्तान, श्रीलंका ईणि अफगाणिस्तान या देशांकडे निर्यात होते. आसाम, प. बंगाल, नेपाळ आणि उत्तर प्रदेश तसेच केरळ व आंध्र प्रदेश येथून भारतीय पिपळी (पा. लाँगम) किंवा ‘बंगाली’ विशेषेकरून जमा होते.

साधारणत: पावसाचे प्रमाण भरपूर असताना जून आणि दाब कलमांनी लागवड करतात तान ते चार वर्षानी जानेवारीत फुलोरे हिरवे व कच्चे असताना खुडून उन्हात वाळवितात त्यमुळे ते करडे होतात. सुकी फळे, फुलोरे व मुळे औषधी दृष्ट्या उपयुक्त असतात फळे लोणची, मुरंबे व मसाले यात घालतात काळ्या मिरीशी तुलना केल्यास पिंपळीची फळे अधीक सुगंधी व काहीशी गोड व एकंदरीने तिखट असतात. ती उत्तेजक, आरोग्य पुन:स्थापक, दीपक (भूक वाढवणारी), उष्ण, वायुनाशी, कफनाशक आणि शक्तीवर्धक असून अपक्व फळे व मुळांचा काढा दमा, जुनाट खोकला व सर्दी या विकारांवर देतात प्रसुतीनंतर रक्तस्राव थांबविण्यासाठी व वार त्वरित पडून जाण्याकरिता देतात. प्रसूत होण्यास वेळ लागल्यास पिंपळीमुळ, सापसंदमुळ व हिंग पानांतून खावयास देतात त्यामुळे वेणा जोराने येऊन प्रसूती लवकर होते. खोडाचे व मुळांचे तुकडे ‘पिंपळमुळ’ या नावाने औषधात वापरतात. फळे व मुळे यांचा उपयोग इतर अनेक विकारांत बाहेरून लावण्यास किंवा पोटात घेण्याकरिता करतात. तांदळापासून बिअर हे मद्य बनविण्यासाठी मुळांचा उपयोग करतात अंदमानात पानांचा उपयोग तांबूलात (नागवेलीप्रमाणे) करतात.

‘चवक’ हे नाव पिंपळीच्या दुसर्‍या जातीच्या (पा. चाबा सं. चाविका) वेलीच्या तुकड्यास वापरतात हिच्या फळांना सिंगापूरी (मोठी) पिंपळी म्हणतात. बंगाली पिंपळीस ‘लेंडी पिंपळी’ म्हणतात.चवकाचे गुणधर्म पिंपळीप्रमाणे आहेत. अथर्वसंहितेत पिप्पलीचा उल्लेख आला असून कौटिलीय अर्थशास्रात (इ. स. पू. तिसरे शतक) राजाने ज्यावर कर वसूल करावा अशा पदार्थाच्या यादीत हिचा अंतर्भाव केला आहे. चरकसंहितेत (दुसर्‍या शतकातील आयुर्वेदीय ग्रंथात केशरागांच्या (केस रंगविण्याकरिता वापरावयाच्या पदार्थाच्या) यादीत पिप्पलीचा उल्लेख केलेला आढळतो. त्यावरून ही भआरतातील प्राचीन वनस्पती असल्याचा प्रतिपादनाला चांगली बळकटी येते.

वैद्य, प्र. भ. परांडेकर, शं. आ.