खडशेरणी : (क. चविकू, गली इं. बीफवुड ट्री, शी-ओक लॅ. कॅझुरिना एक्विसीटिफोलिया कुल- कॅझुरिनेसी). हा सु. १५-१८ मी. उंच व किंचित काळसर हिरवा दिसणारा डौलदार वृक्ष भारतात बाहेरून  खडशेरणी : (१) फुलां-फळांसह फांदी, (२) फांदीचा भाग, (३) पुं-पुष्पे असलेली दोन मंडले, (४) स्त्री-पुष्पांचा झुबका, (५) एक स्त्री-पुष्प, (६) फळांचा घोस, (७) सपक्ष फळ.

आला व आता बागेतून, रस्त्याच्या दुतर्फा आणि समुद्रकिनारी खूप लावलेला आढळतो. याच्या एकमेव वंशातील ४० जाती मुख्यत: ऑस्ट्रेलिया, मलेशिया, पॅसिफिक बेटे, भारत व मॅस्कॅरीन बेटे इकडे पसरलेल्या आढळतात. खडशेरणी कुलात (कॅझुरिनेसी) एकच वंश असून याच एका कुलाचा अंतर्भाव त्याच्या गणात (कॅझुरिनेलीझ) केला आहे. कॅसोवेरी पक्ष्याच्या पंखाशी तुलना करता येण्यासारख्या यांच्या बारीक, हिरव्या फाद्यांवरून वंशवाचक लॅटिन नाव दिले आहे शोभेकरिता अनेक जातींची लागवड सर्वत्र करतात. खडशेरणी हे नावही लॅटिन नावाचे अपभ्रष्ट रूप दिसते. या वृक्षाची पुढील शारीरिक लक्षणे सामान्यत: सर्व कुलाला (व गणाला) लागू पडतील अशी आहेत. फांदीच्या पेऱ्यावर मंडलाकार आणि फार लहान खवल्यासारखी पाने असतात छदे आणि छदके यांनी वेढलेली, अपरिदल व एकलिंगी फुले एकाच झाडावर असतात पुं.पुष्पात एकच केसरदल व स्त्री-पुष्पात ऊर्ध्वस्थ किंजपुट आणि दोन किंजदले असून त्यातील एकाच कप्प्यात दोन बीजके असतात. पुं-पुष्पबंध लांब कणिशासारखा फांदीच्या शेंड्याकडे तर स्त्री-पुष्पांचा झुबका आखूड व त्याच्या तळाशी असतो [→ फूल] फुलांचा मोसम सप्टेंबर-ऑक्टोबर परागण (परागसिंचन) वाऱ्याकडून होते व परागनलिका बीजकाच्या (बीजाच्या पूर्वावस्थेच्या) तळातून प्रवेश करते (तलयुती). संयुक्त फळे, लंबगोल शंकूसारखी छदवेष्टित असून त्यांतून सपक्ष व लहान कृत्स्नफळे (शुष्क, आपोआप न तडकणारी व एकच बी असलेली फळे) बाहेर पडून वाऱ्याने पसरविली जातात. बी अपुष्क (विकासावस्थेतील बीजाच्या पोषणास मदत करणारा भाग नसलेले) आणि एकच असते. हिरव्या फांद्यांवरच्या उभ्या खोल रेषा आणि खवल्यासारखी मंडलाकार सूक्ष्म पाने, हा प्रकार ⇨एक्विसीटम नावाच्या अबीजी वनस्पतीशी व एफेड्रा [→ अस्मानिया] या प्रकटबीज वनस्पतीशी साम्य दर्शवितो. यामुळे लॅटिन नावातील जातिवाचक शब्द एक्विसीटमसारखी पाने या अर्थाने लावला आहे. नीटेसीपैकी एफेड्राशी फुलाच्या बाबतीतही फार साम्य असल्याने काहींच्या मते, आवृततबीजी वनस्पती ⇨नीटेलीझसारख्या प्रकटबीज वनस्पतींपासून उत्क्रांत झाल्या असाव्या. या वृक्षाचे लाकूड लालसर, फार कठीण व जड असून तुळया, खांब, डोलकाठ्या, वल्ही, जू, जळण इत्यादींस चांगले असते. साल टॅनीनयुक्त असून कातडी कमावण्यास व रंगविण्यास उपयुक्त तसेच ती रंगबंधकही असते ती स्तंभक (आकुंचन करणारी) असल्याने अतिसार व तत्सम दोषांवर आणि शूळावर (तीव्र वेदनांवर) गुणकारी असते. वायुरोधी आणि समुद्रकिनारी भूमिसुधारक म्हणून ही झाडे लावतात.

घवघवे, ब. ग.