फिलिसियमफिलिसियम : (इं.फर्न लीफ ट्री लॅ. फिलिसियम डिसिपेन्स, फिलिकम डिसिपेन्स कुल-सॅपिंडेसी). नेच्यासारख्या पानांमुळे विशेष आकर्षक ठरलेल्या एका वृक्षाचे शास्त्रीय नाव. फुलझाडांपैकी [→ वनस्पती, आवृतबीज उपविभाग] द्विदलिकित वर्गातील व ⇨ सॅपिंडेसी कुलातील फिलिसियम वंशात एकूण तीन जाती असून उष्ण कटिबंधीय आफ्रिका आणि आशिया येथे त्यांचा प्रसार झालेला आहे. भारतात फि. डिसिपेन्स ही एकच जाती आढळते. सह्याद्री घाटात, निलगिरी ते दक्षिणेस श्रीलंकेपर्यंत (सु. १,५०० मी. उंचीपर्यंत) तिचा प्रसार झालेला आहे. हा मध्यम आकाराचा व सदापर्णी वृक्ष असून फार मंदपणे वाढतो. शास्त्रीय व सामान्य इंग्रजी नावाशी त्याच्या नेच्यासारख्या संयुक्त, समदली व पिसासारख्या पानांचा संबंध आहे. याचा पर्णसंभार घुमटासारखा दिसतो. साल लालसर करडी संयुक्त पानाची पक्षयुक्त (पंखधारी) मध्यशीर (पर्णाक्ष) हे वैशिष्ट्य असून १२-१६ दले एकाआड एक किंवा काहीशी संमुख (समोरासमोर) असतात. फुले लहान, अनेक, पांढरी, एकलिंगी असून कक्षास्थ परिमंजरीवर [→ पुष्पबंध] जानेवारी-फेब्रुवारीत येतात. संदले दीर्घ काळ टिकणारी परिहित (पिळवटलेली) व प्रदले (पाकळ्या) तितकीच लांब असतात गोल किंजपुटात दोन कप्पे असतात [→ फूल]. अश्मगर्भी फळ (आठळीयुक्त फळ) जांभळे व एकबीजी असते. बी मांसल, मऊ व अल्पजीवी असते. याचे लाकूड लालसर, जड व कठीण असून रंधून व घासून गुळगुळीत होते. ते खांब, तुळया, सजावटीचे सामान, आगगाडीच्या डब्यातील लाकडी फरशी, हत्यारांचे दांडे, गाड्यांची चाके इत्यादींकरिता वापरले जाते. या वृक्षांवर लाखेचे किडे वाढवितात तसेच शोभेकरिताही हे वृक्ष लावतात.

पहा: सॅपिंडेसी

जमदाडे, ज. वि.