द्विदलिकित खोडाच्या भागाचा आडवा छेद : (१) अपित्वचा; (२) मध्यत्वचा : (अ) स्थूल कोनोतक, (आ) हरिमोतक, (इ) मंडकणयुक्त कोशिका, (ई) टॅनीनयुक्त कोशिका; (३) वाहक वृंद : (उ) आदिपरिकाष्ठ, (ऊ) अनुपरिकाष्ठ, (ए) ऊतककर, (ऐ) अनुप्रकाष्ठ, (ओ) आदिप्रकाष्ठ; (४) भेंड (निकाष्ठ).

मध्यत्वचा : ( लॅ. कॉर्टेक्स). साधारणपणे उच्च दर्जाच्या वनस्पतींच्या खोडांत, मुळांत, देठांत व तत्सम अवयवांत तल्पोतकाचे (आधारभूत कोशिकांच्या–पेशींच्या–समूहाचे) दोन भाग स्पष्ट असतात. त्यांपैकी ⇨ वाहक वृंदांच्या (पाणी व अन्नरसाची वाहतूक करणार्‍या शरीर-घटकांच्या) बाहेरच्या बाजूस व ⇨ अपित्वचेच्या (सर्वांत बाहेरच्या कोशिकांच्या आवरणाच्या) आत असणार्‍या भागास मध्यत्वचा म्हणतात. बहुतेक प्रकटबीज वनस्पतींच्या उदा., सायकस, पाइन, गिंको, देवदार इ.) आणि द्विदलिकित (बियांत दोन दलके–दले–असणार्‍या) वनस्पतींच्या मुळांत व खोडांत, तसेच एकदलिकित (बियांत एकच दलिका असलेल्या) वनस्पतींच्या मुळांत व काहींच्या खोडांत हा भाग स्पष्टपणे आढळतो; परंतु बहुतेक एकदलिकितांच्या खोडात अनेक वाहक वृंद इतस्ततः विखुरलेले असल्यामुळे तो अगल नसतो. तल्पोतकाचा दुसरा आतील भाग म्हणजे ⇨ भेंड व मध्यत्वचा परस्परांत मिसळून गेलेली असतात. पानांत हे ऊतक (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांचा समूह) नसते. वनस्पतींच्या प्रकारानुसार मध्यत्वचेत कोशिकांचे कमी अधिक थर असतात. यांमध्ये ⇨ अंतस्त्वचा, ⇨ स्थूल कोनोतक, ⇨ दृढोतक, ⇨ हरिमोतक व ⇨ मृदूतक यांपैकी एक किंवा अनेक अथवा सर्व प्रकारची ऊतके [⟶ ऊतके, वनस्पतींतील] आढळतात. या ऊतकांच्या प्रकारानुसार त्यांतील घटकांत (कोशिकांत) हरितकणू (हिरवे गोल कण) वर्णकणू (इतर रंगाचे कण), स्फटिक, टॅनीन, मंड (स्टार्च) इ. आढळतात; तसेच राळ–नलिका, चिकाळ घटक (चीक साठविणारे घटक), तेल साठा करणारे घटक इ. आढळतात. खोडामध्ये ⇨ प्रकाशसंश्लेषणाने (सूर्यप्रकाशात हरितद्रव्याच्या मदतीने करण्यात येणारी) अन्न निर्मिती, श्वसन, मजबुती देणे, साठा करणे इ. कार्येही कमीजास्त प्रमाणात मध्यत्वचा करते. मुळांतून आत शोषलेले पाणी ⇨ प्रकाष्ठाद्वारे (जलीय विद्राव वाहून नेणे व वनस्पतीला आधार देणे ही कार्ये करणाऱ्या ऊतकाद्वारे म्हणजे जलवाहक घटकांच्या मदतीने) शरीरात पसरविणे ह्या कार्यातही मध्यत्वचेची मदत असते. वनस्पतीच्या दोन्ही टोकांस असलेल्या व सदैव नवीन शरीरघटक (कोशिका) निर्माण करणार्‍या ऊतकापासून [⟶ विभज्या] पुढे बनलेल्या मध्यत्वचेस ‘प्राथमिक मध्यत्वचा’ म्हणतात व हीच खरी मध्यत्वचा होय. अनेक बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणार्‍या) वनस्पतींत नवीन कोशिका व ऊतके निर्माण करणारे ऊतक [⟶ ऊतककर] कायम ऊतकापासून बनते; त्याला ‘द्वितीयक ऊतककर’ म्हणतात; त्याने निर्माण केलेल्या सर्वच ऊतकांना द्वितीयक ऊतके म्हणतात; बुचासारख्या पदार्थाने भरलेल्या कोशिका [⟶ त्वक्षा] बनविणार्‍या त्वक्षाकरापासून बनणार्‍या मृदूतकास द्वितीयक मध्यत्वाचा म्हणतात; परंतु त्या मध्यत्वचेस ‘द्वितीयक मध्यत्वचा’ म्हणण्यास अनेकांचा विरोध आहे. ⇨ जलनेचे, ⇨ नेचे, ⇨ सिलाजिनेलीलीझ, ⇨ एक्विसीटेलीझ, ⇨ लायकोपोडिएलीझ इत्यादींसारख्या वाहक घटक असलेल्या खालच्या दर्जाच्या वनस्पतींतही मध्यत्वचेचे कार्य करणारी ऊतके (तल्पोतक) आढळतात; परंतु इतरांपासून ती स्पष्टपणे नेहमी अलग असतात असे नाही. शेवाळी, शैवाक (दगडफूल) कवक (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पती) आणि शैवले या ⇨ कायक वनस्पती विभागातील काही वनस्पतींच्या स्थूल शरीरात कमीजास्त साधे प्रभेदन (विशिष्ट कार्य करण्यासाठी रूपांतर होण्याची क्रिया झालेली) आढळते. तेथे मृदूतकासारख्या ऊतकाचे स्थान लक्षात घेऊन फार व्यापक अर्थाने मध्यत्वचा ही संज्ञा वापरलेली आढळते.

पहा : ऊतके, वनस्पतींतील; त्वक्षा; शरीर, वनस्पतींचे.

संदर्भ : 1. Eames, A. J.;  MacDaniels, L. H. An Introduction to Plant Anatomy, Tokyo, 1953.

2. Esau, K. Plant Anatomy, New York, 1960.

घन, सुशीला प.; परांडेकर, शं. आ.