पायपरेसी : (इं. पेपर फॅमिली म. मिरी कुल). फुलझाडांपैकी (आवृतबीज, द्विदलिकित) या कुलाचा अंतर्भाव ए. एंग्लर व के. प्रांट्ल यांच्या वर्गीकरण पद्धतीत पायपरेलीझ गणामध्ये (मिरी गणात) केला असून जे. बेंथॅम व जे. डी. हुकर यांच्या पद्धतीत मोनोक्लॅमिडी या गटातील एका श्रेणीत (मायक्रेंब्री) केला आहे. मिरीचा (सं. मरीचीचा) वेल, नागवेल, पिंपळी, कबाबचिनी इ. पायपर वंशातील प्रमुख उपयुक्त जातींच्या या कुलात समावेश होतो. एकूण ७-८ वंश व सु. १,१५० जाती (जी. एच्. एम्. लॉरेन्स यांच्या मते १०-१२ वंश व १,३१५ जाती जे.सी. विलिस : ४ वंश व २,००० जाती ए. बी. रेंडेल : ९ वंश आणि १,३०० जाती) या कुलात समाविष्ट असून त्यांचा प्रसार उष्ण व उपोष्ण कटिबंधांत आहे. भारतात पायपर वंशातील सु. ५० जाती व पेपरोमियाच्या १२ रानटी व १० उद्यान प्रविष्ट जाती आढळतात. बहुतेक जाती सुगंधी ⇨ ओषधी , क्षुपे (झुडपे) व क्वचित वृक्ष असून वेली आगंतुक मुळांच्या साहाय्याने आधारावर चढतात. यांना साधी, एकाआड एक, कधी समोरासमोर किंवा मंडलित (प्रत्येक पेर्‍यावर झुबक्यांनी वाढणारी), अखंड कडा (किनारी) असलेली आणि कधी सोपपर्ण (उपपर्णे असलेली) पाने असतात उपपर्णे बाजूस आणि देठास चिकटलेली असतात. फुलोरा [→पुष्पबंध] जाडसर, मांसल कणिश फुले फार लहान, परिदलहीन (नग्न), बहुधा द्विलिंगी, क्वचित एकलिंगी, सच्छद, नियमित व अवकिंज केसरदले १-१० असून परागकोश उभ्या रेषेवर तडकतात. किंजदले २-४ क्वचित ५ ऊर्ध्वस्थ किंजपुटात एक कप्पा असून त्यात एक किंवा दोन आवरणे असलेले एकच सरळ बीजक असते [→फूल]. लहान मृदुफळ किंवा अश्मगर्भी फळ (आठळी फळ) व एक सपुष्क (गर्भाबाहेर अन्नांश असलेले) व परिपुष्क (पुष्काभोवतीचा अन्नांश) असलेले बीज असते. खोडात विखुरलेले वाहक वृंद (द्रव पदार्थ वाहून नेणाऱ्या पेशीसमूहांचा जुडगा) अनेक वर्तुळांत असून बाहेरच्या वाहक

पेपरोमिया पेल्युसिडा : (१) फुलोऱ्यासह फांदी, (२) फुलोऱ्याचा भाग ,(३) फूल(बाजूस दोन केसरदले व मध्ये किंजमंडल) ,(४) फुलाचा उभा छेद

वृंदापासून द्वितीयक प्रकाष्ठ बनते. पेपरोमियाच्या काही जाती तणासारख्या पसरलेल्या आढळतात काही जाती बागेत शोभेकरिता लावतात. पेपरोमिया रिफलेक्सा ही औषधी जाती हिमालयात व आंध्र प्रदेशातील टेकड्यांत आढळते ती पौष्टिक असून मूत्रपिंडाच्या विकारांवर उपयुक्त आहे. पे. पेल्युसिडा (पहा आकृती) ही बागेत वाफ्याकडेने लावतात आफ्रिकेत भाजीकरिता वापरतात. ही औषधीही आहे, जखमा व गळवे यांवर तिचे पोटीस बांधतात.

पहा :कबाबचिनी नागवेली पिंपळी मिरे.

वैद्य, प्र. भ. परांडेकर, शं.आ.