मेलॅस्टोमेसी : (अंजनी कुल). फुलझाडांपैकी [→ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] द्विदलिकित (बियांत दोन दलिका असलेल्या) वर्गाच्या ⇨ मिर्टेंलीझ गणात ह्या वनस्पति-कुलाचा अंतर्भाव असून यामध्ये सु १५० प्रजाती व ३,५०० (ए. बी. रेंडेल यांच्या मते १७० प्रजाती व ३,००० जाती जे. सी. विलिस यांच्या मते २४० प्रजाती व ३,००० जाती) आहेत. याचा प्रसार उष्ण, उपोष्ण व शीत कटिबंधात आहे. ह्या वनस्पती ⇨ षधी, ⇨ क्षुप (झुडूपे), वेली व क्वचित लहान वृक्ष असतात. कित्येक पाण्यात, दलदलीत किंवा दुसऱ्या झाडावर आधार घेऊन [→ अपिवनस्पति] वाढतात. ⇨ लाखेरी नावाच्या या कुलातील वनस्पतीची फळे खाल्ली असता ओठ काळे होतात. ह्या क्षुपाचे लॅटिन प्रजातिवाचक नाव मेलॅस्टोमा असे पडण्याचे कारण ग्रीक भाषेत मेलान म्हणजे काळे व स्टोमा म्हणजे तोंड व यांवरून या कुलाचेही नांव पडले आहे. या कुलातील वनस्पतींच्या खोडाच्या अंतररचनेत ⇨ प्रकाष्ठ (जलवाहक भाग), ⇨ परिकाष्ठ (अन्नरसाची ने-आण करणारा भाग) आणि ⇨ वाहक वृंदाचे बाबतीत वैचित्र आढळते. [→ शारीर, वनस्पतींचे]. पाण्यातील जातींत ⇨ वायूत आढळते. पाने समोरासमोर, कधी मंडलित (दोन्हीपेक्षा अधिक एकाच पेऱ्यावर असलेली) व साधी फुलोरे विविध किंवा फुले एकेकटी असतात. फुले नियमीत, द्विलिंगी, परिकिंज किंवा अपिकिंज संदले ४–५ (क्वचित ३–६), प्रदले तितकीच व सुटी केसरदले संख्येने प्रदलांइतकी अथवा दुप्पट, कधी संधानावर (परागकोश व तंतू यांना जोडणाऱ्या भागावर) उपांगे किंजपुट पूर्ण किंवा अर्धवट अधःस्थ, कप्पे ३–६, क्वचित एकच व बीजके बहुदा अनेक असतात. [→ फूल]. फळ मृदुफळ किंवा शुष्क (बोंड) बिया लहान व अपुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश नसलेल्या) ⇨ लोखंडी (अंजना) व लाखेरी ही यातील सामान्य झाडे असून शिवाय इतर काही झाडे बागेत सुंदर फुलांकरिता लावतात. पॅचिसेंट्रिया नावाच्या अपिवनस्पतीच्या मुळावरील गाठीत स्वसंरक्षार्थ मुंग्यांचा ताफा असतो हा एक ⇨ सहजीवनाचा प्रकार आहे. ह्या कुलाला मेलॅस्टोमॅटेसी असेही नाव आहे.

पाटील, शा. दा.