अभित्वचा : (हायपोडर्मिस, एक्झोडर्मिस). उच्च दर्जाच्या वनस्पतींत ðअपित्वचेच्या आतील बाजूस तिला आधार व संरक्षण देणारे हे ऊतक (समान रचना व कार्य असलेल्या शरीरातील सूक्ष्म घटकांचा म्हणजे कोशिकांचा समूह) आहे. अनेक वनस्पतींत हे ठळकपणे आढळते व ते ðमध्यत्वचेच्या सर्वांत बाहेरच्या थरांचे बनलेले असते. ðअंतस्त्वचेप्रमाणेच  या ऊतकांमधल्या कोशिकावरणाची संरचना असून त्यात कॅस्पेरीय पट्ट, त्वक्षी (सुबेरिन-वसात्मक पदार्थांचे जटिल मिश्रण) व तूलीर (सेल्युलोज) यांचा मुख्यतः समावेश असतोशिवाय फिनॉलिक किंवा क्विनॉइडिल पदार्थही असतात. मूळच्या पातळ कोशिकावरणावर नवीन थर प्रथम बाहेरच्या भिंतीवर व नंतर आतल्या बाजूच्या भिंतीवर बसतात. अंतस्त्वचेच्या बाबतीत याउलट प्रकार असतो. 

बहिस्त्वचा : (एक्झोडर्मिस) ही संज्ञा मुळांच्या बाबतीत प्रामुख्याने वापरतात. मूलरोमयुक्त (शोषणाचे कार्य करणाऱ्या केसाळ वाढीने युक्त) अपित्वचा नाश पावल्यावर त्या जागी मध्यत्वचेच्या बाहेरील एक किंवा अनेक थरांत त्वक्षीची निर्मिती होऊन संरक्षक ऊतक बनते (उदा., कांदा) व त्याला ‘बहिस्त्वचा’ म्हणतात तथापि हा अभित्वचेचाच प्रकार होय. ऑर्किडांच्या [àऑर्किडेसी] वायवी मुळांतील (हवेतील मुळांतील) सर्वांत आतल्या अपित्वचा-थराला हीच संज्ञा वापरतात.

 पहा : शारीर, वनस्पतींचे.

परांडेकर, शं. आ.