रसिली : (इं. कोरल प्लँट लॅ. रसेलिया जुंशिया, र. एक्विसीटीफॉर्मिस कुल स्क्रोफ्यूलॅरिएसी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] हे सु. १–१·२५ मी. उंच,

रसिली : पानांफुलांसह फांदी

झुबक्यासारखे, बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारे), नाजूक व सुंदर झुडूप मूळचे मध्य अमेरिका व मेक्सिको येथील असून त्याचे स्वरूप ⇨मरू वनस्पतींप्रमाणे (रुक्ष हवामानात वाढणाऱ्या वनस्पतींप्रमाणे) असते. ‘रसिली’ हे सामान्य नाव रसेलिया (अलेक्झांडर रसेल यांच्या नावावरून पडलेल्या) या प्रजातीच्या नावाचे अपभ्रष्ट रूप आहे. रसेलिया या प्रजातीत एकूण सु. ४० जाती असून बहुतेक जाती बागेत शोभेकरिता लावण्यास सर्वत्र लोकप्रिय आहेत. खोडावर उभे कंगोरे असल्यामुळे ते आडव्या छेदात कोनयुक्त दिसते [⟶ एक्विसीटेलीझ] त्यावरून त्याच्या एका शास्त्रीय नावातील जातिवाचक गुणनाम (एक्विसीटीफॉर्मिस) बनले आहे. याच्या फांद्या हिरव्या व काहीशा ⇨रशसारख्या असतात. त्यांची टोके नरम, डुलती व लोंबती असतात व त्यांवर साधी, लहान, समोरासमोर अथवा मंडलित (तीन, चार किंवा पाच पानांचे वर्तुळ एका पेऱ्यावर असलेली), रेखाकृती भाल्यासारखी किंवा अंडाकृती पाने असतात फांद्यांच्या टोकाकडे ती लहान होत जाऊन खवल्यासारखी दिसतात. फुले लहान, सु. २·५ सेंमी. लांब, लाल किंवा शेंदरी व नलिकाकृती असून विरळ फुलोऱ्यावर [मंजरी ⟶ पुष्पबंध] जवळजवळ वर्षभर येतात. फळ (बोंड) लहान व अनेकबीजी असते. याची इतर सामान्य शारीरिक लक्षणे व फुलाची संरचना ⇨स्क्रोफ्यूलॅरिएसीत अथवा नीरब्राह्मी कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात.

नवीन लागवड छाट कलमांनी करतात. पावसाळ्यात जमिनीवर टकलेल्या कोणत्याही भागापासून मुळे फुटून नवीन झाडे येतात. ह्या वनस्पतीचे काही प्रकार टोपलीत लावण्यास चांगले आहेत उदा., लेमॉइनी आणि एलेगंटिसिमा हे संकरज प्रकार. र. सार्मेन्टोजा (र.कॉक्सीनिया) ही अधिक भडक शेंदरी फुलांची जातीही बागेत लावतात हिची पाने र. जुशियापेक्षा मोठी असतात.

संदर्भ : Bailey, L. H., Standard Cyclopaedia of Horticulture, Vol. III, New York, 1961.

लेखक : जमदाडे, ज. वि.; परांडेकर, शं. आ.