गुलमोहोर, निळा : (इं. जकरंदा लॅ. जॅकरंदा मिमोसिफोलिया कुल-बिग्नोनिएसी). सु. १२–१५·५ मी. उंचीचा हा लहान, पानझडी, शोभिवंत वृक्ष मूळचा ब्राझील व वायव्य अर्जेंटिना येथील असून इतरत्र शोभेकरिता, बागेत किंवा रस्त्यांच्या दुतर्फा लावलेला आढळतो. पाने नेच्यासारखी, मोठी, एकाआड एक, संयुक्त, पिसासारखी व दोनदा विभागलेली असून, दले ९–१६ व प्रत्येक दलावर १४–२४ दलकांच्या जोड्या व शिवाय टोकास एक मोठे दलक असते [→ पान]. फांद्यांच्या टोकास अनेक निळसर किंवा जांभळट फुलांच्या विरळ परिमंजऱ्या मार्च–मे मध्ये येतात. पुढे अनेक फिकट तपकिरी रंगाची, कठीण, तडकणारी, गोलसर, सपाट बोंडे येतात बी सपाट व सपक्ष असते. हा वृक्ष जलद वाढणारा पण अल्पायुषी असतो. पाचव्या वर्षी फुले येण्यास सुरुवात होते व वीस वर्षांनंतर तो बेढब दिसतो. फुलांची सामान्य संरचना ⇨बिग्नोनिएसी  कुलात वर्णिल्याप्रमाणे असते. याची लागवड बियांपासून वा कलमांनी करतात. उत्तम निचऱ्याची जमीन लागते वेळोवेळी छाटणी व्यवस्थित करावी लागते. द. अमेरिकेत साल व पाने उपदंश व मूत्रकृच्छ्रावर (लघवी करताना वेदना वा त्रास होण्यावर) देतात. पानांचा फांट (काढा) हृद्‌रोगावर देतात व चूर्ण जखमेवर लावतात. सालीचा फांट जखमा धुण्यास वापरतात. लाकूड सुंदर, सुगंधी, मध्यम कठीण, जड व सुबक असून कामाला सोपे असते. हत्यारांच्या मुठी व दांडे करण्यास चांगले. भारतात लाखेचे किडे पोसण्यास हा वृक्ष उपयुक्त आहे. 

जमदाडे, ज. वि.

निळा गुलमोहर : (१) फुलांसह फांदी, (२) फळ.