नवजीवजनन: (निओबायोजेनेसिस). ह्या संज्ञेचा शब्दशः अर्थ नवीन जीवांची उत्पत्ती इतकाच असला, तरी ती वेळोवेळी किंवा वारंवार होण्याची प्रक्रिया (क्रियांची मालिका) असू शकते, असा अर्थ येथे अभिप्रेत आहे. पूर्वी असलेल्या सजीवांपासून किंवा सृष्टीतील निर्जीव पदार्थांपासून भिन्न जीवांची निर्मिती कशी झाली असेल अथवा होत असावी, यासंबंधीची शास्त्रीय विचारसरणी या विषयात अंतर्भूत केली जाते. क्रमविकास (उत्क्रांती) सिद्धांताप्रमाणे सर्व जीवांचे उत्पत्तिस्थान एकच असून ते सर्व सारख्याच पूर्वजापासून अवतरले असल्याने त्यांचे परस्परांशी नाते आहे. जे.बी.एस्. हॉल्डेन (१९२९), जे.डी. बर्नाल (१९५१), ए.आय्. ओपॅरिन (१९५७) इ. शास्त्रज्ञांनी भिन्न कालखंडांत वेळोवेळी जीवांची उत्पत्ती कशी झाली असावी, याबद्दलच्या आपल्या कल्पना जगापुढे मांडल्या आहेत. त्या सर्वानुमते प्रारंभिक सृष्टीतील संबंधित पदार्थांच्या एकीकरणातून प्रथम साध्या व नंतर जटिल (गुंतागुंतीच्या) रासायनिक संयुगांतून नवीन जीव निर्माण झाले. एच्.सी.यूरी, मिलर, फॉक्स, अबेल्सन, ओरो आणि इतर शास्त्रज्ञ याच विचारसरणीचे पुरस्कर्ते आहेत.

अनेक शास्त्रज्ञ प्रारंभिक जीवांच्या निर्मितीची व क्रमविकास सिद्धांतावर आधारलेली पुढील रूपरेषा मान्य करतात : प्रथम अकार्बनी संयुगांपासून साधी कार्बनी संयुगे बनतात त्यांपासून पुढे जटिल कार्बनी संयुगे निर्माण होतात व त्यांच्या समवेत कार्बनी-धातवीय उत्प्रेरकही (रासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणारी द्रव्ये) बनतात. नंतर त्यांपासून प्रथम वाढत्या दर्जाची गुंतागुंत असलेली व परस्परावलंबी अशी अलग अलग पण परस्परसंबंधित प्रतिक्रियांची तंत्रे निर्माण होतात त्यानंतर साध्या सजीव पदार्थांची निर्मिती होते. पहिल्या जीवोत्पत्तीनंतर नवजीवजनन पुढे सतत चालू राहणे शक्य आहे, या अनुमानाला वरील स्पष्टीकरण थोडा फरक करून आधारभूत म्हणून घेता येईल परंतु नवजीवजननाची शक्यता पूर्णपणे नाकारणे समर्थनीय नाही मात्र ती स्वीकारण्यात अनेक अडचणी आहेत, ही गोष्ट खरी आहे.

एच्. एफ्. ब्ल्यूम यांनी (१९५५) ऊष्मागतिकीय दृष्टिकोन [→ ऊष्मागतिकी] विचारात घेऊन त्यातील दुसरा नियम जैव क्रमविकासाला लागू पडतो असे सूक्ष्म परीक्षणान्ती ठरविले. त्यानुसार क्रमविकासाचा प्रवाह पुरोगामी असून त्याविरुद्ध किंवा उलट दिशेने जाणारा नाही. पृथ्वीवर काळाच्या ओघात घडून आलेल्या संपूर्ण घटनांची पुनरावृत्ती करणे किंवा घडून येणे शक्य नाही, हा नियम जैव क्रमविकासाला लागू आहे कारण प्रारंभिक जीवोत्पत्ती व नंतरची अद्ययावत वाटचाल यांच्या पुनरावृत्तीस आवश्यक ती विशिष्ट परिस्थिती पुन्हा मिळणे अशक्य आहे.

नवजीवजननाने निर्माण झालेल्या नवजीवांना आधी भोवती असलेल्या सजीवांविरुद्ध स्वजीवनाकरिता तीव्र स्पर्धा करणे अटळ आहे. आधीचे जीव परिस्थितीशी समरस झालेले असल्याने नवीन जीव तीव्र स्पर्धेमध्ये त्यांच्याशी झुंज देऊन जिवंत राहण्यात कितपत यशस्वी होतील, हे संशयास्पद ठरते.

सर्व सजीवांत रासायनिक दृष्ट्या एकता आहे. जीवसृष्टीतील बहुतेक सर्वांत आढळणारी कार्बनी संयुगे व जीवरासायनिक वाटचाल यांतील साम्य नवजीवजननाच्या पुनरावृत्तीविरुद्ध आहे असे आढळते. सर्वांत पहिली जीवनिर्मिती हा केवळ योगायोग होता. त्यामध्ये विशिष्ट त्रिमितीय समघटक [→ समघटकता] व कार्बनी संयुगे यांचा सहजच अंतर्भाव झाला. त्यानंतर त्यांच्यापासून निर्माण झालेल्या पिढ्यांना तीच संयुगे आत्मसात करणे भाग पडले. याच सजीव पदार्थांवर निर्माण झालेल्या उत्परिवर्तनामुळे (एकाएकी बदलामुळे) संयुगे, वाटचाली व जाती यांच्यात वाढती विविधता आली व त्यांतून नवजीवनिर्मिती होऊ लागली. हे होत असताना अकार्बनी पदार्थांच्या संयोगाने होणाऱ्या कार्बनी पदार्थांच्या उत्पादनाचा वेग कमी होऊन सजीव पदार्थांद्वारे होणाऱ्या कार्बनी पदार्थांच्या निवडक संश्लेषणाचा (घटक द्रव्ये एकत्र येऊन पदार्थ तयार होण्याचा) वेग वाढला. त्यामुळे पूर्वी असलेले कार्बनी पदार्थ खर्च होऊन त्यांच्या जागी दुसरे कार्बनी पदार्थ आले आणि त्यांच्यात महत्त्वाचे आमूलाग्र बदल होऊ लागले. अर्थातच नवजीवजनन झाले असल्यास किंवा व्हावयाचे असल्यास अशा परिस्थितीत व्हावे लागेल.

नवजीवजननास लागणारा काळ विचारात घेता नापीक अशा अकार्बनी वातावरणातून पुरेसे जटिल कार्बनी पदार्थ व त्यांच्या संयोगीकरणातून सर्वप्रथम जीवांची निर्मिती होण्यास लागलेला वेळ हा त्यानंतरच्या जीवनिर्मितीस सोयीच्या असणाऱ्या वातावरणातून नवजीवजननास लागणाऱ्या वेळेहून केव्हाही कितीतरी मोठा असणार.

स्वयंजननाने (आपोआप होणाऱ्या जननामुळे) जीवनिर्मितीची शक्यता नाही, असे लुई पाश्चर यांनी प्रयोगांनी सिद्ध केले असले, तरी त्यामुळे नवजीवजननाची शक्यता नाहीशी होत नाही.

क्रमविकासाच्या आरंभीच्या काळात कार्बनी पदार्थांतून एका मूलभूत ⇨ जीवद्रव्यनामक स्थिर प्रकारच्या पदार्थाची निर्मिती झाली. त्यात जटिल व एकमेकांवर अवलंबित अशा चयापचयी (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींसंबंधीच्या) प्रतिक्रिया व जीवरासायनिक गरजा यांनुसार समघटकांची निर्मिती होऊ लागली. याच प्रकारे वारंवार होणाऱ्या नवजीवजननामुळे उत्पन्न होणारे जीव हे तत्पूर्वी निर्माण झालेल्या व माहीत असलेल्या जीवाप्रमाणे होतील फारच वेगळे व माहीत नसलेले जीव सहसा निर्माण होणार नाहीत. पूर्वनिर्मित व नवनिर्मित यांतील साम्यापेक्षा नवजीवजननाची शक्यता आणि ते पहिल्या जीवनिर्मितीपासून अव्याहत चालू असावे, ह्या कल्पना महत्त्वाच्या आहेत.

चयापचयिक वाटचालीचा इतिहास चिरस्थायी, लांब पल्ल्याचा व जीवसृष्टीच्या उत्पत्तिकालापर्यंत पोहोचणारा आहे पण पुराजीववैज्ञानिक अभिलेख (नोंदी) सुद्धा नवजीवजननावर काही प्रकाश टाकू शकत नाहीत त्याची कारणेही सबळ आहेत. पुराजीवविज्ञानातील पुराव्यातील कमतरता किंवा असांतत्य (खंडितपणा) ही अलगअलग नवजीवजननामुळे असू शकेल या असांतत्याचा परिणाम सध्या उपलब्ध असलेल्या जीवांची, विशेषतः विषाणू (व्हायरस), सूक्ष्मजंतू, शैवले, स्पंज इत्यादींची, वर्गवारी करण्यावर झाला. एकस्रोतोद्‌भव (एकाच उगमातून उद्‌भवले असण्याच्या) गृहीतकावर आधारलेल्या वर्गीकरण तंत्रात त्यांना त्यांची योग्य जागा देण्यात असांतत्यामुळे अडचणी येऊ लागल्या. या सर्व कारणांमुळे वेगवेगळ्या मार्गांनी व भिन्नभिन्न काळी स्वतंत्र नवजीवजननाने क्रमविकासाचे टप्पे गाठले गेले असण्याची शक्यता दिसून येते.

पहा : क्रमविकास जीव जीवोत्पत्ति.

संदर्भ : 1. Bernal, J. D. The Physical Basis of Life, London, 1951.

            2. Blume, H. F. Time’s Arrow and Evolution, Princeton, 1957.

            3. Haldane, J. B. S. The Origin of Life, Rationalist Annual, 1929.

            4. Keosian, J. The Origin of Life, Science 131, 1960.

            5. Oparin, A. I. Trans. Morgulis, S. The Origin of Life, New York, 1957.

चौबळ, पुष्पलता