आ. 1. पित्तपापडा : (1) संयुक्त पान (2)फुलोरा व फळे यांसह फांदी (3) फूल (4) बोंड (5) प्रधान मुळासह खोडाचा भागपित्तपापडा : (हिं. पित्तपापडा क. कल्लुसब्बसिगे गु. पित्तपापडो सं. पर्पट, पर्पटक, अतिसारघ्‍न इं. फ्यूमिटोरी लॅ. फ्यूमॅरिया पार्व्हिफ्लोरा, उपजाती व्हायलॅन्टाय, फ्यू. इंडिका कुल-फ्यूमॅरिएसी). ही पसरट वाढणारी लहान क्षुपीय (झुडपासारखी) वनस्पती शेतात तणासारखी वाढते आणि दख्खन, खानदेश, गंगेचे मैदान ते नेपाळ व येथून निलगिरी पर्वतापर्यंत, सिंध व बलुचिस्तान इ. प्रदेशांत आढळते. हिच्या वंशातील (फ्यूमॅरिया) एकूण ५० जातींपैकी भारतात फक्त २ आढळतात. प्रधान मूळ जाडजूड खोड सु. १५-६० सेंमी. उंच आणि फांद्या गुळगुळीत किंवा काहीशा लवदार पाने साधी, अतिखंडित, आतील (फिकट हिरव्या-करड्या मेणचट पदार्थाचे आवरण असलेली). खंड पसरट, रेषाकृती व सूच्याग्र (सुईसारखे अग्र असलेल्या) फुले द्विलिंगी, लहान, पांढरी किंवा फिकट गुलाबी व टोकास किरमिजी असून विरळ मंजरीत जानेवारीत येतात. संदले फार बारीक व शीघ्रपाती (लवकर गळणारी) छदे पातळ व भाल्यासारखी पाकळ्या चार व सुट्या केसरदले सहा किंजले दोन, ऊर्ध्वस्थ किंजपुटात एकच कप्पा. एका पाकळीस शुंडिका असते [  ⟶ फूल ]. फळ (बोंड) गोलसर व चकाकीत बी एकच. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ फ्यूमॅरिएसी कुलात (पर्पट कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. या वनस्पतीत फ्यूमेरिक अम्‍ल व फ्यूमारीन अल्कलॉइड असते. ती शक्तिवर्धक, कडू, कृमिनाशक, सौम्य रेचक व घाम आणणारी आहे. पानांचा फांट [⟶ औषधिकल्प ] शक्तिवर्धक व मूत्रल (लघवी साफ करणारा) असतो. काळ्या मिरीबरोबर हिवतापावर व काविळीवर या वनस्पतीचा काढा किंवा फांट देतात तसेच त्वचाविकारात रक्तशुद्धीकरिताही तो देतात. शातेरा (फ्यूमॅरिया ऑफिसिनॅलिस इं. कॉमन फ्यूमिटोरी सं. यवनपर्पट) या समवांशिक जातीचा औषधी उपयोग सर्दी, पित्तज्वर, यकृतदोष, गंडमाळा ह्या विकारांत व काही त्वचारोगांत करतात ती मूत्रल व सारक आहे. काहींच्या मते ही व फ्यू. पार्व्हिफ्लोरा या दोन्ही जाती भारतीय नाहीत. प्रथम वर्णन केलेली जाती भारतीय असून तिचे नाव फ्यूमॅरिया व्हायलॅन्टाय असेही आहे बाजारात मिळणारा पित्तपापडा इराणमधून आलेल्या विदेशी (फ्यू. ऑफिसिनॅलिस व फ्यू. पार्व्हिफ्लोरा) सुक्या वनस्पतींचे भाग असतात. भारतीय वनस्पतीपासून मिळणारा माल त्याऐवजी उपयोगात आहे. चरकसंहिता व सुश्रुतसंहिता या दोन्ही जुन्या आयुर्वेदीय ग्रंथांत पर्पटक या नावे ह्या वनस्पतींचा उल्लेख आला आहे.

जमदाडे, ज.वि. परांडेकर, शं.आ.

आ. 2. घाटी पित्तपापडा : (1) फुलोरऱ्यासंह फांदी (2) फुलातील उघडलेला पुष्पमुकुटस (3) संवर्त व किंजमंडल (4) अपक्क ळ (5) तडकलेले बोंड (6) बी (उभा छेद)घाटी पित्तपापडा : (हिं. खारमोर गु. खटसळिओ सं. परपथ लॅ. रंजिया रेपेन्स कुल-अकँथेसी). फुलझाडांपैकी (आवृतबीज, द्विदलिकित) ही औषधी वनस्पती अंशत: जमिनीसरपट वाढून तिच्या काही पेर्‍यांपासून फूटलेली मुळे जमिनीत जातात व उरलेला भाग सरळ वाढतो एकूण खोडांची व फांद्यांची उंची एक मी. पेक्षा जास्त नसते. भारतातील सर्व उष्ण भागांत व श्रीलंकेत ती आढळते. महाराष्ट्रात सर्वत्र, विशेषत: शेतात व कुंपणाकडेने, तणासारखी पावसाळ्यात भरपूर वाढते. फांद्या खोडाच्या तळभागांपासून निघाल्याने वनस्पती पसरट होते. पाने साधी, २.५-५ x १.५ सेंमी. लहान देठाची, भाल्यासारखी, टाेकदार व लहान असून त्यांच्या बगलेत किंवा फांद्यांच्या टोकास सरळ, २.५-६ सेंमी. लांबीचे (कणिश) फुलोरे नोव्हेंबर ते जानेवारीमध्ये येतात. फुले सच्छद व सच्छदक [⟶ फूल ], लहान, १.२ सेंमी. लांब, पांढरी, गुलाबी, पिवळट किंवा निळसर छटांची असून त्यावर गडद ठिपके असतात. फुलांची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ अकँथेसी कुलात (वासक कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. केसरदले फक्त दोन बोंडे आयत-लंबगोल, फार लहान, चपटी बी गोलसर, फिकट तपकिरी व फार लहान असते. वनस्पतीचे चुर्ण ताप, खोकला व कृमी यांवर गुणकारी असून ताजी पाने चुरगळून एरंडेलातून डोक्यास लावल्यास खवडे नाहीसे होतात.

पाटील, शा.दा.