नागदमनी: (नागदवण हिं. पून-चंपा गु. पनगचंपा इं. शेल-फ्लॉवर, लाइट गलंगल लॅ. आल्पिनिया नटान्स, आ. स्पेसिओजा कुल-झिंजिबरेसी). ही सु. २·५–३ मी. उंच बहुवर्षायू (अनेक वर्ष जगणारी) सुंदर ⇨ओषधी असून हिचे मूलस्थान पूर्व हिमालय, ब्रह्मदेश व मलेशिया हे आहे. सामान्यतः ही शोभेकरिता बागेत लावतात. मूलक्षोड (जमिनीतील जाड खोड) ग्रंथिल पाने साधी, ३०–६० X ७–१५ सेंमी., लांबट, हिरवी व आयत-कुंतसम (भाल्यासारखी) फुले काहीशी ऑर्किडसारखी, सुगंधी व लोंबत्या फुलोऱ्यांवर (परिमंजरीत) जानेवारी ते मार्चमध्ये येतात. छदे मोठी, पांढरी, लाल टोकाची असून संवर्त नळीसारखा व त्रिखंडी असतो. पुष्पमुकुट पांढरा आणि त्यावर लालसर छटा असते ओष्ठावर तांबडे पिवळे ठिपके असतात [→ फूल]. बोंड तडकून तीन शकले होतात. फुलांची संरचना व इतर शारीरिक लक्षणे ⇨ सिटॅमिनी गणात (कदली गणात या गणात झिंजिबरेसी कुलाचा समावेश होतो) वर्णिल्याप्रमाणे असतात. हिची नवीन लागवड मूलक्षोडाचे तुकडे लावून करतात. ओलसर हवा, सु. १३° ते १५·५° से. तापमान, दोन भाग दुमट माती, एक भाग पानाचा भुगा व एक भाग सुके शेणखत असलेले मिश्रण आणि भरपूर पाणी हे सर्व हिच्या वाढीला आवश्यक असतात. मूलक्षोडाचे गुणधर्म ⇨ कोष्ट कोळिंजनाप्रमाणे असतात. खोडात सु. ५०% सेल्युलोज असते व त्याचा उपयोग कागदनिर्मितीसाठी होतो.

जमदाडे, ज. वि.