मकळी

मकळी : (शेंगांवरील ढेकूण). या कीटकाचा समावेश हेमिप्टेरा गणाच्या लायजिईडी कुलात करतात. अफॅनस सॉर्डिडस हे याचे शास्त्रीय नाव आहे. ह्या कुलातील कीटक आकाराने लहान व रंगाने गडद तपकिरी असतात. यांच्या सु. २,००० जाती माहीत आहेत. मकळीचा उपद्रव मुख्यतः भुईमूग व तीळ या पिकाना होतो. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, गुजरात व बिहार या राज्यांत या कीटकांमुळे पिकाचे बरेच नुकसान होते. प्रौढ कीटक सु. ८ मिमी. लांब, फार बारीक, फिकट तपकिरी ते गर्द करड्या रंगाचा असतो. याची मादी जमिनीत सुटी सुटी अंडी घालते. अंड्यांचा रंग पांढरा असतो. नुकत्याच बाहेर पडलेल्या अर्भकाचा रंग गुलाबी असतो. याचे संपूर्ण जीवनचक्र पुरे होण्यास सु. सात आठवड्यांचा काळ लागतो. अर्भक व प्रौढ मकळी भुईमुगाच्या कोवळ्या शेंगांतील रस, तसेच पक्व शेंगांतील तेलयुक्त भाग शोषून घेतात.

मकळीचा नाश करण्याकरिता पीक काढण्यापूर्वी खळ्याशेजारी थोडा पालापाचोळा पसरून ठेवतात. त्यात प्रौढ कीटक येऊन लपतात. नंतर हा पालापोचोळा जाळून नष्ट करण्यात येतो, त्या वेळी त्याच्यात लपून बसलेल्या कीटकांचाही नाश होतो. शेंगांचा ढीग जाड ताडपत्रीने किंवा गवताच्या जाड थराने झाकून ठेवल्यास मकळीपासून त्यांचे संरक्षण होते. पिकावर ही कीड आढळल्यास १० टक्के बीएचसी भुकटी किंवा इतर रासायनिक कीटकनाशकेही वापरतात.

जमदाडे, ज. वि.