चमेली, लाल : (विलायती चमेली, रंगूनचा वेल हीं. रंगून की बेल गु. बारमासिनी वेल इ. रंगून क्रीपर, चायनीज हनिसकल लॅ. क्विस्क्वॉलिस इंडिका कुल-काँब्रेटेसी). ही बळकट झुडूपवजा वेल मुळची ब्रह्मदेश व मलाया द्वीपकल्प येथील असून भारतात व इतर कित्येक देशांत बागेत शोभेसाठी लावली जाते. कमानीवर, सज्जावर किंवा इमारतीवर चढवल्यास शोभेत भर पडते. पाने साधी, समोरासमोर, दीर्घवृत्ताकृती, टोकास निमुळती, तळाशी गोल, १० सेंमी. लांब, गर्द हिरवी, वरून गुळगुळीत व खालून केसाळ असतात. पडलेल्या पानांच्या देठांपासून काटे बनलेले आढळतात. फुले लोंबती, सुगंधी व पुष्कळ असून पानांच्या बगलेत किंवा फांद्यांच्या टोकांस मंजरीवर मार्च-ऑगस्ट मध्ये येतात. ती लांब (७.५ सेंमी.) प्रथम पांढरी व नंतर लाल होतात. संदलनलिका बारीक (५–७ सेंमी. लांब), हिरवी आणि प्रदले पाच व सुटी केसरदले दहा, आखूड किंजपुटात एकच कप्पा आणि बीजक एकच असते. [⟶ फूल]. फळ (अश्मगर्भी-आठळीयुक्त-फळाप्रमाणे) लंबगोल, शुष्क, चिवट पंचकोनी व काळे असते. महाराष्ट्र, कर्नाटक व गुजरात येथे फळे फार क्वचित येतात.

अँबोइनात उदरवायूमुळे फुगणाऱ्या पोटावर पानांचा संमिश्र काढा देतात. चीनमध्ये पक्व बिया भाजून अतिसार व तापावर देतात इतरत्र मलायात वगैरे जंतविकारावर बिया मुख्यतः लहान मुलांना सामान्यपणे देतात कारण बियांत सॅंटोनिनासारखे क्रियाशील द्रव्य असते. 

नवीन लागवड फांद्यांची कलमे किंवा मुळांचे तुकडे लावून करतात. सतत पांढरा किंवा लाल रंग टिकून राहणाऱ्या फुलांचे प्रकार उपलब्ध आहेत. 

पहा : काँब्रेटेसी.

जमदाडे, ज. वि.

लाल चमेली : (१) फुलोऱ्यासह फांदी, (२) फुलाचा उभा छेद.